आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच पळापळ ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर सध्या एकच पळापळ सुरू आहे आणि त्यामुळे मतदारांचे भरपूर मनोरंजन होते आहे. बारा कोटी जनतेचे भवितव्य ठरविणा-या निवडणुका हा मनोरंजनाचा विषय खरे तर होऊ नये, मात्र दुर्दैवाने तो तसा झाला आहे. एकप्रकारे आपल्यासमोरील राजकीय पक्षांनी आता योग्य त्या निर्णयाची जबाबदारी मतदारांवर सोपविली आहे. जेव्हा सर्व पर्याय सारखेच वाटू लागतात, तेव्हा मतदारांच्या मनात प्रचंड संभ्रम निर्माण होतात.
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हा संभ्रम अधिकच वाढला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान तो कमी होईल, असे वाटत होते, मात्र मतदान आठ दिवसांवर येऊनही तो कमी होण्याचे नाव घेत नाही. या संभ्रमाचे कारण रिंगणातील पक्षांविषयी मतदारांना त्यांनी केलेल्या कामांविषयी काही ठोसपणे काही म्हणायचे असते तर तो समजण्यासारखा होता, मात्र संभ्रम यामुळे वाढला आहे की, उडदामाजी काळे-गोरे, काय निवडावे, अशी मतदारांची अवस्था झाली आहे. वर्तमानपत्रे आणि टीव्ही, रेडिओवर प्रसारित होणा-या जाहिरातींत राजकीय पक्षांनी आपण केलेली कामे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र सर्वच ज्येष्ठ नेते राजकीय सभांमध्ये जी भावनिक विधाने करत आहेत, ती चक्रावून टाकणारी आहेत.

शिवसेनेने आपला प्रचार महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला आहे, मात्र ती म्हणजे काय, हे शिवसेनेला सांगता येत नाही. म्हणूनच आताआतापर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपवर ती तुटून पडली आहे आणि त्या पक्षाच्या प्रचाराची तुलना अफझलखानाच्या स्वारीशी केली जाते आहे. आणि असे असताना शिवसेना केंद्रात सत्तेत सहभागी आहे! इतकी वर्षे सोबत राहिलेला भाजप एकदम गुजरातचा पक्ष झाला आहे. त्या पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारालाच येऊ नये, अशी अपेक्षा केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर तालुक्याच्या गावी मोदी का सभा घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गुजरात मॉडेलचे कौतुक करणारे राज ठाकरे यांना आता मोदींच्या प्रचारात आपला पक्ष टिकाव धरू शकेल काय, अशी भीती वाटू लागल्याने त्यांनी मोदींवर टीका सुरू केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या अस्मितेवर आपले पक्ष चालविले आहेत, मात्र आता हा मुद्दा नेमका कोणाचा, असा पेच निर्माण झाला आहे. बरे, मुंबईची अस्मिता, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे काय, या प्रश्नाला आज समाधानकारक उत्तर मिळेनासे झाले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीला गेल्या १५ वर्षांचा हिशेब विचारण्याऐवजी आता मुंबईहून उद्योग गुजरातेत जातील, मुंबईचे महत्त्व कमी होईल, महाराष्ट्राचे तुकडे होतील, या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित होतो आहे. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या पक्षांना तर आपण परवापर्यंत एकत्र सरकार चालवत होतो, याचेही भान राहिलेले नाही.
एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून काही नेत्यांना तुरुंगात पाठविण्याची भाषा केली जाते आहे; पण हा भ्रष्टाचार दिसत असताना सरकारमध्ये राहून आपण नेमके काय केले, या प्रश्नाला काही उत्तर नाही. राज्यातील सहकारी संस्था आणि बँकांना उद्ध्वस्त करणा-या प्रवृत्तीपासून वाचवा, असे एक विधान शरद पवार यांनी केले आहे. वास्तविक या संस्थांचा ठेका राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वर्षानुवर्षे घेतला असून त्यात त्यांना मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या संस्था हातात ठेवून महाराष्ट्रात राजकारण कसे विशिष्ट कुटुंबांभोवती फिरत राहिले, हे आता जनतेला नवे राहिलेले नाही. निवडून येणे, एवढाच निकष समोर ठेवून या पक्षांच्या अनेक नेत्यांना पक्षात घेऊन भाजपने आपणही या कुरघोडीत कोठे कमी नाही, हे दाखवून दिले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन महिन्यांत दाखविलेला झंझावात तेवढा भाजपच्या बाजूने आहे आणि त्यामुळेच मोदी यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात सुरू आहे. एक पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राची जी वेगळी ओळख आहे, ती मात्र या निवडणुकीत फारशी कोठे दिसत नाही. महाराष्ट्रातील मतदार हा भावनिक मुद्द्यावरच मतदान करणार, असे जणू या राजकीय नेत्यांनी गृहीत धरले आहे. याचा अर्थच असा की, पुन्हा एकदा मतदारांची जबाबदारी वाढली आहे. मुंबई वेगळी होईल का, विदर्भ वेगळा होईल का, हा निवडणुकीचा मुद्दाच नसून राजकीय पक्षांनी आपल्या कारकीर्दीत आणि कार्यक्षेत्रात कसे काम केले, हा तो मुद्दा आहे. तो सर्वांनाच गैरसोयीचा असल्याने सर्वच राजकीय नेते पळवाटा शोधून भावनिक मुद्दे मोठे करण्याचे प्रयत्न करत आहेत. आता मतदारांनीच हा डाव उधळून लावला पाहिजे.