आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमोट तर आपल्या हाती! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र विधानसभेसाठी फक्त पंधराच दिवस प्रचार करायचा का, असा प्रश्न पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांना सुरुवातीस पडला होता. मात्र सोमवारी संध्याकाळी जाहीर प्रचाराची अधिकृत सांगता झाली तेव्हा बरे झाले, पंधराच दिवस प्रचारासाठी दिले गेले, असे म्हणण्याची वेळ या सर्वांवर आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत १२ कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र अक्षरशः ढवळून निघाला. गेल्या पंधरा दिवसांच्या प्रचाराच्या गदारोळात मतदार स्पष्टपणे आपले मत ठरवू शकला असता तर ते फार चांगले झाले असते.
मात्र सुरुवातीपासून या वेळचा प्रचार पुन्हा एकदा भावनिक विषयांभोवतीच फिरत राहिल्याने मतदार अधिकच संभ्रमित झाला आहे. त्यात भर घातली ती सोशल मीडियाने. या वेळी सोशल मीडिया प्रचारात जेवढा सक्रिय होता, तेवढा यापूर्वी तो कधीच नव्हता. त्यावर पडणारा मजकूर आणि चित्रांनी या गोंधळात गोंधळ घातला. मतदारांच्या गोंधळाची कारणे समजून घेतली की मतदान का करायचे, कोणाला करायचे आणि लोकशाहीच्या या अपरिहार्य प्रक्रियेला दोष देण्यात धन्यता मानण्यापेक्षा त्यात कसा भाग घ्यायचा, हे स्पष्ट होते. मतदान का करायचे, या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे.
लोकशाही ही सतत विकसित होत गेलेली शासनपद्धती असून तिच्यापेक्षा चांगली पद्धती आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे तिच्यात आज अनेक दोष असले तरी त्या दोषांसह ती स्वीकारण्याशिवाय मार्ग नाही. राजकीय परिवर्तनाने काहीच बदलत नाही, फक्त माणसे तेवढी बदलतात, असे म्हणून मतदान न करणारे नागरिक कमी नाहीत. पण त्यांनी या प्रक्रियेची अपरिहार्यता समजून घेतली पाहिजे आणि तीत भाग घेतलाच पाहिजे. जे उमेदवार उभे आहेत, त्यातील एकही चांगला नाही, असे म्हणतानाही चार वेळा विचार केला पाहिजे. पैशाच्या जोरावर राजकारण भ्रष्ट झाले असले तरी त्याला आव्हान देणारी काही चांगली माणसे रिंगणात उतरली आहेत, त्यांना बळ देण्याचे काम अशा मतदारांनी केले पाहिजे.
राजकीय पक्षांनी केलेल्या प्रचाराच्या अतिरेकावर अनेक मतदार नाराज असतात. मात्र मतदारसंघाचे प्रचंड आकार आणि मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता त्यांच्यापर्यंत पोचण्याचा दुसरा मार्ग नसतो, हेही समजून घेतले पाहिजे. प्रचाराच्या पातळीविषयीचा आक्षेप समजण्यासारखा आहे आणि त्यात सुधारणा झालीच पाहिजे. मात्र ज्याचा आवाज मोठा त्याला मतदान ही मतदारांची मानसिकता त्यासाठी बदलावी लागेल. हा बदल ही एक प्रक्रिया आहे, हे विसरून चालणार नाही.

मतदान कोणाला करायचे, असा पेच निर्माण होण्याचे काही कारण नाही. पुढील पाच वर्षे महाराष्ट्र कोणाच्या हाती सोपवला तर या राज्याचा विकास होईल, या प्रश्नाचे जे आपल्या मनातील उत्तर आहे, त्या पक्षाला मतदान करणे, एवढे आपण करू शकतो. अगदी पक्षीय निकषांवर उमेदवार निवडणे शक्य नसल्यास आपल्या मतदारसंघातील कोणता उमेदवार चांगला आहे, हे तर निश्चितच ठरवता आले पाहिजे. कोणत्या पक्षाने कोणासोबत राहावे, युती आणि आघाडी टिकावी की नाही, हे काही मतदाराचे प्रश्न नाहीत. खरे म्हणजे युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत, ही खरे तर संधीच म्हटली पाहिजे.
देश असो की राज्य, आता आपल्याला पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन आणि भेदभावमुक्त चांगल्या प्रशासनाची गरज आहे. ही गरज जो पक्ष पूर्ण करू शकेल, असे मनापासून वाटते त्याला मतदान करणे, हेच तर मतदार म्हणून आपले कर्तव्य आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या जीवनात जी विसंगती आपल्याला पाहायला मिळते, ती खरे तर आपल्या समाजातील विसंगती आहे, हेही आता सुजाण मतदार म्हणून समजून घेण्याची गरज आहे. ती एकदा घेतली की त्यावर केवळ ताशेरे ओढत बसण्यापेक्षा त्यातील चांगल्याला बळ देण्यासाठी आपण मतदान करतो. महाराष्ट्रासमोर नेमके कोणते प्रश्न आहेत आणि त्यावर कोणत्या पक्षाकडे काय उत्तर आहे, याची पुरेशी चर्चा गेल्या महिनाभरात झाली आहे. लोकशाही शासनपद्धती ही विशिष्ट जात, धर्म, भाषा अशा भेदभावांवर सक्षम होऊ शकत नाही, त्यासाठी विकासप्रक्रियेत सर्वांना सहभागी होण्याची संधी मिळणे, एवढा एकमेव निकष घेऊन तिला पुढे जावे लागणार आहे. त्यासाठी लागतो तो प्रगल्भ, सुजाण असा मतदार. तो मतदार आज आपल्याला व्हावयाचे आहे.
अनेक क्षेत्रांत देशाचे नेतृत्व केलेल्या या पुरोगामी महाराष्ट्रात असा मतदार निश्चितच तयार झाला आहे. नेत्यांचा रिमोट पक्षश्रेष्ठींच्या हातात असतो; पण त्या पक्षश्रेष्ठींचा आणि एकूणच राजकारणाचा रिमोट आपल्या हातात आहे, हे दाखवून देण्याची एक चांगली संधी आज महाराष्ट्र घेणार आहे. अशा सर्व सव्वाआठ कोटी मतदारांना पवित्र आणि बहुमूल्य मतदान करून लोकशाही सशक्त करण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’ करत आहे.