आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रखर जाणिवांचा प्रतिभावंत ( अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग हे दु:खी आणि पीडितांचे आहे, हे जवळून पाहता आणि अनुभवता आल्यामुळे सिनेसृष्टीला ग्लॅमर असले तरी त्यात रमलो नाही… चित्रपट हे खूप छोटे आणि खोटे जग आहे, असे सदाशिव अमरापूरकर वारंवार सांगायचे आणि म्हणूनच अमरापूरकर यांचा ओढा हा कायम सामाजिक भान जपण्याकडे होता. अस्सल ताकदीच्या या कलावंताने आयुष्याच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीत कार्यरत राहूनही सामाजिक जाणिवेचा वसा सोडला नाही. एका नटापलीकडे एक सुजाण नागरिक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमरापूरकरांचे रूप विलोभनीय होते. अहमदनगरचा खास देशस्थी काळा-सावळा रंग, बारीक केस, त्या सावळ्या रंगामध्ये उठून दिसणारे डोळे आणि पॉज घेत घेत बोलण्याची पद्धत, इतक्या आयुधांसह अमरापूरकर यांनी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवला. आज हिंदी-मराठी रंगभूमीवर येणारा काळ्या-सावळ्या कांतीचा प्रत्येक अभिनेता स्वत:ला अमरापूरकर समजतो, यातच सारे काही आले.
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या मातीत १९५० मध्ये जन्मलेल्या अमरापूरकरांचे मूळ नाव गणेश नरोडे. रंगभूमीवर काम करता करता सदाशिव या नावाने मुंबईत दाखल झाले. शालेय वयातच नाटकांची आवड कॉलेजमध्ये पक्की झाली. मात्र त्या वेळी क्रिकेट की नाटक, अशा द्विधा मन:स्थितीत ते सापडले होते. शाळेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना अमरापूरकरांनी कुचबिहार करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. मात्र शेवटी त्यांनी नाटकांचाच रस्ता धरला. घरातल्यांचा विरोध असूनही नाटक करतच राहिले. राज्य नाट्य स्पर्धेत ‘काही स्वप्नं विकायचीत’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले आणि त्याला भरघोस पारितोषिके मिळाली. अमरापूरकर यांचे हे लखलखीत यश ही फक्त सुरुवात होती.
व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. मुंबईच्या वातावरणात नवखे असतानाही इंडियन नॅशनल थिएटरच्या मराठी विभागाचे प्रमुखपद त्यांना मिळाले. याच काळात त्यांची ‘छिन्न’, ‘यांत्रिक’, ‘हँड्सअप’ ही नाटकं गाजत असताना गोविंद निहलानींचा ‘अर्धसत्य’ त्यांना मिळाला. विजय तेंडुलकरांनीच निहलानींना रामा शेट्टीच्या भूमिकेसाठी त्यांचे नाव सुचवले. रामा शेट्टी या भूमिकेचे केवळ तीन सीन मिळाले होते; परंतु त्यांचे पडद्यावर येणेच पडदा व्यापून टाकत असे. ‘अर्धसत्य’च्या पुण्याईवर अमरापूरकरांनी अनेक चित्रपट केले. ‘सडक’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘महारानी’ नावाच्या तृतीयपंथी खलनायकाची भूमिका त्यांना पुरस्कार देऊन गेली. चित्रपटात व्यग्र असतानाच अमरापूरकरांनी हेलन केलर हिच्या जीवनावरचे ‘किमयागार’ हे नाटक लिहिले. सातत्याने या विषयाचा मागोवा घेत त्यांनी अखेर मराठी मनाला रुचेल असे हे नाटक लिहिले.

महत्त्वाचे म्हणजे अमरापूरकरांना सामाजिक बांधिलकीचा कधीही विसर पडला नाही. माणसाने माणसाला जगायला मदत करणं, हाच खरा देवधर्म आणि पूजाअर्चा, हा त्यांच्या जगण्याचा सिद्धांत होता. त्यांचे आयुष्याबद्दलचे कुतूहल कायम जागे असायचे आणि हे कुतूहल जेव्हा संपते तेव्हा माणूस मरतो, अशी त्यांची भूमिका होती. या कुतूहलापोटीच त्यांच्या मनातील संवेदनेतून त्यांनी काहीतरी भरीव देण्याचा प्रयत्न केला. मग ते नगरमधील नाट्यसंमेलन असो, नर्मदा बचाव आंदोलन असो, वा अण्णा हजारे यांची चळवळ असो; अमरापूरकर प्रत्येक ठिकाणी असायचे. नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्या मदतीसाठी त्यांनी बॉलीवूडकडून आर्थिक मदत मिळवून दिली. नरेंद्र दाभोलकर आणि अनिल अवचट यांच्या सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी "लग्नाची बेडी' या नाटकाचे राज्यात प्रयोग करून एक कोटीचा निधी जमा करून दिला. पुण्याच्या मुक्तांगण संस्थेच्या व्यसनमुक्ती उपक्रमात त्यांचा सहभाग होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीत अमरापूरकरांचे योगदानही त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. चित्रपटसृष्टीमधील अंधश्रद्धेवर ते कायम प्रहार करत.
अत्यंत असुरक्षित भावनेत वावरत असल्यामुळे येथील चित्रपटसृष्टीत अंधश्रद्धेचे प्रमाण खूपच भयंकर आहे. आजचा हीरो उद्याचा झीरो ठरण्याची भीती असल्याने आघाडीचे अभिनेते देवदेवतांबरोबरच भोंदू बाबांनाही साकडे घालतात, असे त्यांचे निरीक्षण होते. सतत डोळे उघडे ठेवून समाजात वावरणारे स्पष्टवक्ते अमरापूरकर चित्रपटसृष्टीच्या या अंधश्रद्धेवर कायम जाहीर टीका करायचे. आजवरच्या अनुभवाने त्यांच्या स्वभावात ब-यापैकी कडवटपणा आला होता. मात्र तरीही सर्जनशील, प्रयोगशील कलाकृती करणा-यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी अमरापूरकर नेहमीच तत्पर असायचे. कोणत्याही कलाकृतीसाठी थेट भूमिकेत शिरणारे आणि कोणत्याही मुद्द्यावर थेट भूमिका घेणारे सदाशिव अमरापूरकर यांच्या नसण्याने नाट्य-सिनेसृष्टीबरोबरच महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्येही मोठी उणीव जाणवणार आहे.