लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मार खाल्ल्यानंतर मनसेमध्ये नाराजी, फाटाफूट, वादंग याचा अध्याय सुरू झाला आहे. कोणताही ठोस कार्यक्रम अथवा विचारधारा नसलेल्या आणि केवळ भावनांचे राजकारण याच पायावर उभ्या असलेल्या पक्षात पराभवाची कारणमीमांसा, चिंतन वगैरे करण्याऐवजी असे होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत
आपटी खाल्ल्यानंतर लगेचच मुंबईत या पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांचे भाजप नेत्यांशी झालेले गुफ्तगू व पाठोपाठ मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या नाशकातील प्रमुख शिलेदार वसंत गिते आणि त्यांच्या समर्थकांनी आपापल्या पदांचा दिलेला राजीनामा यामुळे पक्षांतर्गत खदखद दृश्यरूपात सामोरी आली आहे.
नाशकातील अपयशाचे खापर आता आपल्या माथी फुटू नये आणि पदावरून हटवले गेल्याची नामुष्की पदरी पडू नये यासाठीच गिते यांनी हे पाऊल उचलल्याचेही सांगण्यात येते. अपयशाला कुणी वाली नसतो या उक्तीनुसार हे सारे घडत असले तरी या सा-या घटनाक्रमाचे मूळ सापडते ते पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत. आताची परिस्थिती नेमकी कशामुळे उद््भवली हे जाणून घेण्यासाठी जरा त्याची उजळणी करायला हवी. विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचे सांगून बाळासाहेबांभोवतीच्या कोंडाळ्यावर आरोप करत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज यांना सर्वाधिक समर्थन मिळाले ते मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक या शहरी पट्ट्यात. व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्व यामुळे सुरुवातीला युवावर्ग राजकडे मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झाला. मराठी अस्मिता, भूमिपुत्रांना रोजगार-नोक-या असे मुद्दे ते आक्रमकतेने मांडत होते. त्यांच्या भाषणांना होणारी गर्दी आणि दिवसागणिक वाढणारे ‘फॅन फॉलोइंग’ पाहता बहुसंख्य माध्यमे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तर राज हे त्या वेळी जणू हीरो होते. त्यातून त्यांची आभासी म्हणावी अशी एक प्रतिमा उभी राहिली.
अस्मिता आणि नोक-या अशा भावनिक राजकारणामुळे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे तब्बल डझनभर आमदार पहिल्याच फटक्यात निवडून आले. एवढेच नव्हे तर मनसेने शिवसेना-भाजपच्या अनेक उमेदवारांना पायात पाय घालून पाडले. परिणामी त्या वेळीही जनमानसात काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल प्रचंड असंतोष असूनसुद्धा विरोधी मतांच्या विभाजनामुळे आघाडी पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मनसे हा घटक प्रभावी समजला जाऊ लागला अन् राज यांची प्रत्येक कृती अथवा वक्तव्य हे कोण कौतुकाचा विषय ठरू लागले. पाठोपाठ महापालिका निवडणुकांतही मनसेची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली. नाशिककरांनी तर मनसेला थेट सत्तास्थानीच विराजमान केले. तोपर्यंत यशाच्या या चढत्या आलेखाचे सारे श्रेय राज यांनाच लाभत असल्याने साहजिकच आताच्या अपश्रेयाचे धनीही त्यांनाच व्हावे लागेल हे उघड आहे. कारण यशोशिखराकडे जात असताना राज यांची जी प्रतिमा जनमानसामध्ये निर्माण झाली वा माध्यमांद्वारे उभी केली गेली तिच्याच जणू ते प्रेमात पडले. पक्षाला यश मिळवून देण्यामध्ये राज यांचा व्यक्तिगत करिष्मा कामी आला हे नि:संशय; पण या अल्प-स्वल्प यशाच्या धुंदीत राहिल्याने संघटना बांधणी, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, ठोस कार्यक्रम, धोरण आखणी यासारख्या मूलभूत बाबींचा त्यांना विसरच पडला.
करिष्म्यावर आपण नेहमीच सारे काही निभावून नेऊ असा त्यांचा एकंदर नूर दिसू लागला. मग, कार्यकर्ते तर सोडाच, पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनासुद्धा साहेब वेळ देईनासे झाले. त्यांच्या बोलण्यातील बाणेदारपणाला इतरांप्रति तुच्छतेचा दर्प येऊ लागला. राज यांचे शिलेदारदेखील त्याच तो-यात वावरू लागले. त्यामुळे जेवढ्या लवकर लोक त्यांच्या जवळ आले त्याहून झपाट्याने ते दुरावू लागले. दरम्यानच्या काळात मोदी यांनी सा-या देशाचाच राजकीय आसमंत व्यापून टाकला. ज्या करिष्म्याच्या भरवशावर राज यांचे राजकारण बेतले आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक व्यक्तिगत करिष्मा मोदींनी उभा केला. त्यासाठी त्यांच्या हाती विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ हे खणखणीत नाणे होते. त्याउलट राज यांचे ‘नाशिक मॉडेल’ अगदीच कुचकामी निघाले. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींना पाठिंबा द्यायचा विषय असो की राज्यातला टोलप्रश्न असो, राज यांची भूमिका धरसोडीची राहिली.
नाशिक महापालिकेत दुस-यांदा आपला महापौर करण्यासाठी तर त्यांनी थेट राष्ट्रवादीशीच ‘फिक्सिंग’ केले. दुसरीकडे चिकन सूप आणि तेलकट वड्यांपासून मराठी अस्मिता, भूमिपुत्रांच्या नोक-या, स्वत: विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा या सगळ्या बाबतीत ते केवळ बोलबच्चनगिरी करीत असल्याचे लोकांच्या लक्षात यायला लागले. परिणामी विधानसभा निवडणुकीत अवघा एक उमेदवार निवडून आला आणि त्यांचा मुखभंग झाला. पाठोपाठ आता त्या पक्षात माजलेली बेदिली आणि सुरू झालेली फाटाफूट याला हे सगळे संदर्भ असून एकंदर पाहता येत्या काळात तर मनसेची बहुचर्चित ‘ब्ल्यू प्रिंट’ अधिकाधिक काळवंडत जाण्याची लक्षणे आहेत.