सचिन तेंडुलकर हा तसा मितभाषी माणूस. पण ग्रेग चॅपेलबद्दल त्याने हातचे काही राखलेले नाही. प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेलच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना त्याने शैलीदार स्ट्रेट ड्राइव्ह मारले आहेत. ग्रेग चॅपेल यांच्या दोन-अडीच वर्षांच्या कारकीर्दीत भारतीय क्रिकेटने अनेक कटू प्रसंग अनुभवले. खरे तर अजित वाडेकरांच्या नंतर विंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम चॅपेल यांच्या कारकीर्दीतच भारतीय क्रिकेट संघाने केला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये
टीम इंडियाची कामगिरी फारशी खालावलेलीही नव्हती. तरीही चॅपेल हा अस्तनीतील निखारा निघाला. आज इतक्या वर्षांनंतरही त्या दिवसांच्या आठवणी काढताना द्रविड, सचिन, लक्ष्मण अशा सद्गुणी खेळाडूंचा चेहराही कडवट झाला. चॅपेल यांच्याविरुद्ध त्या वेळी अवाक्षरही न काढणा-या सचिन तेंडुलकरला आताच
आपल्या जुन्या प्रशिक्षकामधील उणिवा का जगासमोर मांडाव्याशा वाटतात, स्वत:चे आत्मचरित्र खपवण्यासाठी हे उद्योग केले जात आहेत काय, असा कुत्सित सवाल केला जात आहे. मात्र ज्याला सचिन या क्रिकेटपटूची लोकप्रियता माहीत आहे आणि त्यापलीकडे, सचिन या व्यक्तीचा सरळ, स्वच्छ स्वभाव माहीत आहे, त्याला असले भिकारडे प्रश्न पडणार नाहीत.
प्रसिद्धीसाठी सनसनाटी निर्माण करण्याची गरज सचिनला कधी पडली नाही व यापुढेही पडणार नाही. त्याच्या सहीचे कोरे पुस्तकही धबाधबा खपले असते. सचिन हे पाणीच वेगळे आहे. शतकातच एखाद्याच्या वाट्याला येणारे भाग्य घेऊन जन्माला आलेला तो क्रिकेटपटू आहे. दैवाची कृपा असलेला व या कृपेबद्दल कायम मनात नम्रतेची भावना बाळगणारा सचिन केवळ प्रसिद्धीसाठी ग्रेग चॅपेलवर आडून टीका करण्याचा मार्ग धरेल हे पटणारे नाही. सचिन त्या वेळी का बोलला नाही, या प्रश्नाचे उत्तर त्याच्या स्वभावातच आहे. तो केवळ यशस्वी क्रिकेटपटूच नाही, तर शिस्तप्रिय क्रिकेटपटू आहे. व्यावसायिक जीवनाइतकीच शिस्त तो व्यक्तिगत जीवनातही पाळतो आणि म्हणूनच तो महान फलंदाज झाला. त्या वेळी ग्रेगबद्दल बोलून संघाचे अधिक नुकसान करणे त्याला योग्य वाटले नाही व तो गप्प राहिला. तथापि, ग्रेग चॅपेलबद्दलचे त्याचे मत हे व्यक्तिगत नव्हते तर त्या वेळी भारतीय क्रिकेटला शिखरावर नेणा-या
सौरभ गांगुली, लक्ष्मण, द्रविड या सर्वांचेच होते.
‘ड्रेसिंग रूममधील पॉझिटिव्ह एनर्जी गायब झाली होती, असे मत त्या वेळची आठवण सांगताना प्रत्येकाने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना कधीही भारताबद्दल आस्था नव्हती. इयान व ग्रेग चॅपेल तर भारतीयांचा दुस्वास करीत. सचिनने आरशात आपले तोंड बघावे, असा वाह्यात सल्ला इयान महाशयांनी दिला होता. त्यानंतर सचिनने अनेक विक्रम केले, तेव्हा स्वत:चा चेहरा पाहण्याची वेळ इयान चॅपेलवर आली. सचिन कधीही कोणाबद्दल कडवट बोललेला नाही. पण चॅपेल बंधूंबाबत त्याने स्वत:वरील लगाम कमी करून घेतला. यातच चॅपेल बंधूंची लायकी काय आहे ते कळते. भारतीय संघाला शिस्त लावण्यासाठी ग्रेग चॅपेल यांनी काही चांगले प्रयत्न केले असले, तरी अनेक चांगल्या खेळाडूंना त्यांनी जगातून उठवले हेही नाकारता येत नाही.
खेळपट्टी सोडल्यास सचिन क्वचितच आक्रमक होतो. इथे तसा तो झाला. साहजिकच पुस्तक प्रकाशित करणा-यांनी या गोष्टीचा अचूक लाभ घेतला. मात्र यापेक्षाही अनेक माेठी वादळे सचिनच्या कारकीर्दीत आली होती. त्या सर्व घटनांचा समावेश या पुस्तकात आहे का, ते पाहणेही आैत्सुक्याचे ठरेल. वादग्रस्त प्रकरणांच्या समावेशामुळे प्रकाशकाचा माल खपतो. असे जरी असले तरीही सचिनसारख्या क्रिकेटमधील महान फलंदाजाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी या पुस्तकाने दिली तर ते पुस्तकाचे यश ठरेल.
सचिन व त्याचा भाऊ अजित हे क्रिकेटमधील अद्वैत होते. इतके की मैदानावर मी थकलो की घरात अजितही थकलेला असतो, असे उद्गार सचिनने पुस्तक प्रकाशनाच्या वेळी काढले. असे अद्वैत ही ग्रेग चॅपेलच्या आकलनाबाहेरची गोष्ट होती व आजही आहे. या अद्वैतावर या पुस्तकात प्रकाश पडला असेल तर सचिनच्या चाहत्यांसाठी ती पर्वणी ठरेल. सचिन हा एकटा घडला नाही. त्याला अनेकांनी घडवले आणि या अनेकांचे स्मरण सचिनने कायम ठेवले. सचिन नावाचे अजब रसायन घडवणा-या या अनेकांबद्दल या पुस्तकाने काहीतरी सांगितले पाहिजे. शिस्त, संयम, संस्कार, हे सचिनचे गुण जगाला माहीत आहेत; पण या गुणांपलीकडचा सचिन आता लोकांना पाहायचा आहे. परिस्थिती कशीही असो, तू तुझ्या स्वभावानुसार खेळ, असे रवी शास्त्रीने त्याला वयाच्या १६व्या वर्षी सांगितले होते. सचिन तसाच जगला. प्लेइंग इट माय वे हेच त्याचे जीवनसूत्र राहिले आणि कोणत्याही यशस्वी व समाधानी माणसाचे तेच सूत्र असते.