आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेच्या धोरणाचे 'मंगल' सूत्र बनावे ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम जिल्ह्यातील सायखेडा या खेड्यात राहणारी संगीता नारायण आव्हाळे ही एक मध्यमवर्गीय महिला. तिने अख्ख्या राज्याचे लक्ष एका सामाजिक संदेशाच्या कार्यामुळे वेधून घेतले. घराचे लाखो रुपयांचे बांधकाम सुरू असताना एक खोली कमी बांधा पण घरात शौचालय बांधा, ही तिची साधी मागणी. पण तिच्या मागणीकडे तिच्या नव-यासह सासरच्यांनी दुर्लक्ष केले. गावातल्या सगळ्या बायका उघड्यावर शौचास जातात, असे पुरुषी मानसिकेतेचे उत्तर तिला नव-याकडून मिळाले. पण संगीता आपल्या भूमिकेवर ठाम होती. शासकीय योजनेतून शौचालयासाठी निधी मिळतो, तो आणा, असा तगादा तिने लावला.
जिल्हा परिषदेत स्वत: चकरा मारल्या, पण तिथून तिला नकाराचे उत्तर मिळाले. घर होतेय, पण घरात शौचालय नाही या कल्पनेने व्यथित झालेल्या संगीताने आपली मुलगीही मोठी होत आहे, तिचा तरी विचार करा हेही पटवण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. शेवटी शौचालय पैशाअभावी होत नाही हे पाहून तिने थेट सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र विकून सर्वांनाच धक्का दिला. तिने यापुढे जात आपल्या संघर्षाची आपबीती जिल्हा परिषदेला कळवली. तेव्हा तिची पुरुषी मानसिकतेविरोधातील बंडखोरी जगापुढे आली. संगीताची ही बंडखोरी थोडीथोडकी नाही तर तिच्या या कृतीतून खूप मोठा सामाजिक संदेश देशापुढे आला आहे. "दिव्य मराठी"ने तीन नोव्हेंबरच्या अंकात संगीताच्या बंडखोरीची पहिली बातमी दिली होती व तिला जिल्हा परिषदेकडून कशी उत्तरे मिळाली हेही पुढे आणले होते.

देशात सध्या स्वच्छता मोहिमेवरून वातावरण ढवळून निघालेले आहे. देशात रोज कुठे ना कुठे स्वच्छतेच्या संदर्भातील उपक्रम आयोजित केले जात आहेत. देशात उघड्यावर शौचासाठी जावे लागण्याची मोठी समस्या आहे. त्याबद्दलही मोठी जनजागृती सुरू आहे. उघड्यावर शौचास जावे लागल्यामुळे साथीचे आजार पसरतात. शिवाय महिलांची मोठी कुचंबणाही होते. यात ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या मोठी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील ५६ टक्के कुटुंबे शौचालयाचा वापरच करत नाहीत, ही धक्कादायक बाब समोर आली. ताज्या आकडेवारीतही फारशी सुधारणा नाही. अज्ञान, बेताची आर्थिक परिस्थिती, अपुरी जागा आणि पाणीटंचाई ही त्यामागची प्रमुख कारणे समोर आली. तशी शौचालय ही केवळ शहरातील लोकांचीच गरज आहे, आपली नाही, अशी मानसिकताही याला कारणीभूत आहे. त्यामुळेच शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही हागणदारीमुक्तीचे लक्ष्य गाठता आलेले नाही. परिणामी ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे.
सौभाग्याचे लेणे विकावे लागणे ही चांगली बाब नसली तरी संगीताने उचललेले पाऊल फोटो, टीव्ही कॅमे-यांसाठी हातात झाडू धरणा-या नेतेमंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. तिच्या धाडसीपणाचे कौतुक करावे तितके कमी आहे. कारण तिच्या या धडपडीतून ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीचा मार्ग मिळाला आहे. देशासाठी प्रेरणादायीही आहे. शिवाय तिने नव्या सरकारने ग्रामीण विकासासाठी काय करावे, याची दिशाही दाखवली आहे. चार दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारणा-या राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तिच्या कार्याची दखल घेतली. तिला मंगळसूत्र विकावे लागले म्हणून स्वखर्चाने दुसरे मंगळसूत्र भेट देऊन तिचे प्रोत्साहन वाढवले. अशा संगीता गावोगावी घडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करताना शौचालय बांधकामापूर्वीच अनुदान दिले जावे यासाठी पुढाकार घेऊ, ही मंत्री झाल्यानंतरची पहिली घोषणाही त्यांनी केली.
संगीताला या मोहिमेचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ही केले जात आहे. तिच्यामार्फत हा संदेश आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करायला हवा. यापुढे गरिबी, पुरुषी मानसिकता, प्रशासकीय अनास्था या किंवा अशा कोणत्याही कारणांमुळे देशातील कोणत्याही संगीताला आपले मंगळसूत्र विकण्याची वेळच येऊ नये, हे महत्त्वाचे. यासाठी सरकारने ठोस कार्यक्रम आखणे, तो राबवणे गरजेचे आहे. शौचालय बांधण्यासाठी शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना अनुदान देते, ते संगीतासारख्या असंख्य महिलांना मिळाले पाहिजे. आपल्या समाजाची शौचालयांबाबतची मानसिकता ही प्रमुख अडसर आहे. ती कशी दूर करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढवण्याचे अनेक प्रयत्न झाले. या योजनांचे पैसे, अनुदान, प्रचार हवेत केव्हाच विरला आहे. पण आता संगीताच्या बंडखोरीने जागृती आली आहे. नाही तर संगीताने घेतलेल्या धाडसी निर्णयाची सरकारने दखल घेऊन तिला तिचे सौभाग्यलेणे परत मिळवून दिले, यापलीकडे हा विषय जाणार नाही.