आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्य, शिष्टाईची फडणविशी ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तेमध्ये शिवसेनेला सहभागी होण्यास लावून देवेंद्र फडणवीस सरकारने आपले बूड स्थिर करून घेतले हे महाराष्ट्रासाठी ठीक झाले. अल्पमतातील सरकार चालविणे अशक्य असल्याची कबुली फडणवीस यांनी जाहीरपणे दिली होती व तेव्हापासून शिवसेनेची आक्रमक भूमिकाही नरम होऊ लागली होती. त्यामुळे दोघांचे लवकरच पुन्हा जुळणार हे जनतेने ओळखले होते. जनतेच्या मताची बूज राखावी हे शहाणपण दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दाखविले. भाजप व सेनेतील भांडणापेक्षा भाजपच्या काही अतिशहाण्या नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर सुरू केलेला घरोबा पाहून जनतेचा तीव्र अपेक्षाभंग झाला होता.
निवडणुकीत जनतेचा सर्वाधिक राग राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. निकालातून ते स्पष्ट झाले होते. प्रचारात भाजपचे लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस होते. तरीही निवडणूक निकालानंतर, केवळ शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी भाजपमधील धंदेवाईक नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर सूत जमविण्यास सुरुवात केली. त्याची तीव्र प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटली. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार तरले तरी जनतेमध्ये त्याला किंमत राहणार नाही हे भाजपमधील फडणवीस, तावडे, पंकजा मुंडे अशा नेत्यांना पटले होते. राज्यात युतीचे सरकार यावे, असा निकालाचा अन्वयार्थ असल्याचे फडणविसांनी म्हटले आहे. स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व्हावा, असा निकालाचा एक अर्थ होता. तो जाणून मोदींनी फडणवीस यांची निवड केली होती; पण "युतीचे राज्य' हा निकालाचा अन्वयार्थ मोदी व अमित शहा यांच्या लक्षात आला नव्हता. फडणवीस यांना पाण्यात पाहणा-या पक्षातील काही नेत्यांनी निकालाचा विपरीत अर्थ काढला व सेनेवर तलवार चालविण्यास सुरुवात केली. शहाणपणाने बोलण्यावागण्यासाठी सेना कधीच प्रसिद्ध नसल्याने अरेला कारे होत युतीचे गाडे जागीच बसले. ते पुन्हा उभे करण्यासाठी देवेंद्रांना बरीच फडणविशी करावी लागली, असे दिसते. फडणवीस यांची शिष्टाई कामी आली व सेना सत्तेमध्ये सहभागी होण्यास तयार झाली.

ही शिष्टाई करताना फडणवीस यांनी चातुर्यही दाखविले. दुष्काळासह महाराष्ट्रातील ब-याच प्रश्नांवर फडणविसांवर टीका होत आहे. मात्र, प्रशासकीय अनुभवात कमी असलो तरी राजकीय चातुर्यात आपण कमी नाही हे त्यांनी गुरुवारी दाखवून दिले. युती ही केवळ सरकारपुरती मर्यादित न ठेवता शहर व जिल्हा पातळीवरही ती कायम ठेवण्याचा निर्णय शिवसेनेच्या गळी उतरवण्यात आला आहे. त्यासाठी विधानसभेतील मतसंख्येनुसार जागावाटपाचे सूत्र ठरविण्याच्याही हालचाली आहेत. यावरून वाद होणार असले तरी युती सर्व स्तरांवर कायम ठेवण्याचा फडणविसांचा आग्रह चाणाक्षपणा दाखविणारा आहे. युतीचा पाया व्यापक होईल. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीमधील भांडणाचा लाभ घेण्याची संधी मिळेल. मुख्य म्हणजे सर्वाधिक ठिकाणी सत्तेमध्ये वाटा मिळविता येईल. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदींच्या घोषणेला उपयुक्त ठरेल, अशी ही कृती आहे. भाजपचा विस्तारही त्यातून साधता येईल. नैसर्गिक मित्र म्हणून सेनेला सर्व स्तरांवर बांधून घेण्याचा हा प्रयत्न आहे. पक्षातील फूट टाळण्यासाठी शिवसेनेलाही याचा उपयोग असल्यामुळे स्थानिक कुरबुरीपलीकडे यावर वाद होईल, असे वाटत नाही. फडणवीस सध्या पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील वर्तुळात घेरले गेले आहेत. शिवसेनेशी चांगले जुळले तर पक्षातील त्यांचे स्थान भक्कम होईल.

तथापि, मुख्य प्रश्न सरकार तडफेने चालविण्याचा आहे. भाजप वाढतो की शिवसेना बसते, भाजपने चातुर्य दाखविले की शिवसेनेने लोटांगण घातले हे विषय माध्यमांना चर्वण करण्यासाठी ठीक असले तरी जनतेला त्यामध्ये रस नाही. जनतेचे लक्ष सरकारच्या कारभाराकडे असेल. सरकारचे बूड स्थिर नसल्यामुळे फडणवीस यांना सध्या फार काही करता येत नव्हते; पण आता ती सबब सांगता येणार नाही. फडणवीस यांचा कारभार अजून दिसला नसला तरी त्यांच्या धोरणामध्ये स्पष्टता असल्याचे जाणवते. प्रश्न अंमलबजावणीचा आहे. तेथे भाजप व सेनेतील मंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. अहंमन्य नेत्यांच्या जिभेला आवर घालावा लागेल. खडसेंना खडसावून मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात करून दिली, पण वेळ आली तर सेनेच्या मंत्र्यांनाही काही खडे बोल सुनवावे लागतील. पंधरा वर्षांनंतर सत्ता हाती आल्यामुळे कानात वारे भरल्याप्रमाणे काही सेना नेत्यांचा वारू उधळू शकतो. त्याला लगाम घालण्यात फडणवीस यांची कसोटी आहे. इथे उद्धव ठाकरे यांचीही जबाबदारी वाढते. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात कमळाबाईला चिमटे काढण्यात मातोश्री धन्यता मानत होती व माध्यमेही त्यामध्ये भर घालीत होती. हाच प्रकार पुन्हा झाल्यास १९९९मध्ये युती सरकारचे जे झाले तेच या बहुमतातील सरकारचे होईल. सरकार उत्तम चालावे व महाराष्ट्रातील जगणे अभिमानास्पद व्हावे इतकीच जनतेची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव यांच्याकडेही जाते.