आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक भाष्यकार ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंपरेचा धागा अखंड ठेवून समकालीन घटनांविषयीचे भान जागरूक ठेवणारा भाष्यकार, अशी ओळख असणारे डॉ. सदानंद मोरे ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. यंदाचे संमेलन पंजाबमधील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत आयोजित होणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. मोरे यांची अध्यक्षपदी झालेली निवड अर्थपूर्ण ठरणार, यात शंकाच नाही. सुमारे ३० वर्षे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासलेखनाचा एक वेगळा बाज डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या लेखनातून सातत्याने प्रकट केला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘तुकारामदर्शन’ आणि ‘गर्जा महाराष्ट्र’ हे मोरे यांचे ग्रंथत्रय अभ्यासल्यास हे स्पष्ट होईल. मुळात मोरे यांचा जन्मच मुळी अठरा पिढ्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपणा-या घरातला आहे. त्यामुळे पिढ्यांचे संचित तर त्यांच्यापाशी आहेच, पण त्यांचे वडील श्रीधरपंत हे परंपरेप्रमाणेच आधुनिक शास्त्रांचे जाणकार होते.
तो वारसाही त्यांना लाभला. परिणामी संतसाहित्यासह सर्वच ज्ञानशाखांविषयी आधुनिक अन्वयार्थ शोधण्याचा चिकित्सकपणा त्यांच्यामध्ये प्रारंभापासून जोपासला गेला. स्वत: डॉ. मोरे यांनीही परंपरेचे आणि घराण्याचे हे ऋण मोकळेपणाने मान्य केले आहे. परंपरेची बांधिलकी, आधुनिक ज्ञानशाखांविषयीची स्वागतशील वृत्ती, नवी संशोधनसाधने आपलीशी करण्याचा उत्साह, सतत शोध घेण्याची दुर्मिळ मानसिकता आणि हे सारे लिखित स्वरूपात उतरवण्याची चिकाटी डॉ. मोरे यांच्यापाशी असल्यानेच ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘तुकारामदर्शन’ आणि ‘गर्जा महाराष्ट्र’ हे तीन बृहत्ग्रंथ प्रत्यक्षात आले.

महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक परंपरेचा एक दमदार पण सडेतोड वेध घेऊन, पुढची वाटचाल कशी असावी, याचे स्पष्ट दिग्दर्शन करणारा लेखनव्यवहार, असे डॉ. मोरे यांच्याविषयी म्हणावे लागेल. प्रस्थापितांच्या चुका दाखवतानाच, जनसमूहाच्या आंधळ्या व उदास भूमिकेचाही निषेध करण्याची जागरूकता त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळेच डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या, संमेलन हे रिकामटेकड्यांचे काम आहे, या विधानाचा अर्थ लावताना, ‘साहित्यनिर्मितीसाठी चांगल्या प्रकारचा रिकामटेकडेपणाही आवश्यकच असतो,’ असे डॉ. मोरे म्हणू शकतात. संतसाहित्याचा वारसा मिळाला असला तरी त्यापुरते मर्यादित न राहता, आणि त्याचाच उदो उदो करत न बसता, तत्त्वज्ञान, समीक्षा, लोकव्यवहार, इतिहास आणि आधुनिक संदर्भसाधने यांचा मुक्त वापर करण्याचे औचित्य मोरे यांच्या ठायी पुरेपूर असल्याची साक्ष त्यांच्या लेखनातून मिळते. अन्यथा केवळ वारसाहक्काने ते आधुनिक पद्धतीची ‘महाराजगिरी’ सहज करू शकले असते, पण आपल्याला लाभलेला वारसा त्यांनी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासूनपुसून पाहण्याचा उद्योग सातत्याने सुरू ठेवल्यानेच त्यांच्या संशोधनाने एक विदग्ध रूप धारण केले आहे. माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म, हे कालातीत आणि वादातीत सत्य आहे, हा संतपरंपरेने मांडलेला विचार डॉ. मोरे आपल्या लेखन-संशोधनातून वारंवार अधोरेखित करत आले आहेत. विविध धर्म, पंथ, वर्ग, जात, भाषा यांचे पोटभेद आणि श्रीमंत-गरीब यांतील रुंदावत जाणारी दरी, यामध्ये समाजमन विभागून गोंधळलेल्या अवस्थेत असताना संतपरंपरेचा विचार, तत्त्वज्ञानच मानवी जीवनाला ख-या अर्थाने उत्कर्षाकडे, विकासाकडे नेणारे ठरेल, असा दृढ विश्वास डॉ. मोरे यांनी जपला आहे आणि त्याचे सप्रमाण सादरीकरण ते करत आले आहेत.
लेखन, व्याख्याने, अध्यापन, चर्चा, परिसंवाद असे कुठलेही माध्यम वर्ज्य न मानता त्यांनी हा विचार मांडण्याची खटपट चालवली आहे. ज्याला महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी तुकोबा ही मोक्याची जागा आहे, परवल आहे. डॉ. मोरे यांच्या मते, तुकोबा हा एक सम्यक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आहे. म्हणूनच त्यांच्या व्यक्तित्त्वाचा वेध ज्ञानदेव, पुंडलिकांपर्यंत जसा पोचतो तसाच दुस-या बाजूला शिवकाल, उत्तर मराठेशाही, पूर्वोत्तर पेशवाई आणि अव्वल इंग्रजी काळातील प्रबोधन असे टप्पे ओलांडत थेट वर्तमानाशी नाते जोडतो. त्यामुळेच डॉ. सदानंद मोरे ज्ञानदेवांपासून थेट दि. पु. चित्र्यांपर्यंतचा पैस आपल्या संशोधनाच्या मांडणीतून व्यक्त करतात. भाषा, संस्कृती, तत्त्वज्ञान व जीवन यांच्या संदर्भात तुकोबा समजून घेताना जगातल्या कुठल्याही माणसाला आत्मभान गवसेल, असाच त्यांचा सिद्धांत आहे. आमुचा स्वदेश, भुवनत्रयामाजी वास, असे स्वत: तुकोबाच म्हणून गेले आहेत. त्यांच्या या विधानाचा प्रत्यय जगातल्या प्रत्येक भिन्नतेवरचे उत्तर देणारा आहे. कारण तो विश्वातल्या मानवतेलाच कवेत घेणारा आहे. अभिजात भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्यांचा नवविचार यांच्यामध्ये संतविचारांचे एक स्वतंत्र विश्व आहे आणि हे विश्वच या दोन मुख्य विचारधारांमध्ये समतोल साधणारे आहे, हा विचार डॉ. मोरे यांनी नव्याने मांडला आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सदानंद मोरे आपल्या अध्यक्षीय भाषणात आजवरच्या मनन, चिंतनातून आलेल्या विचारांची मांडणी कशी करतात, हा सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरेल, यात शंका नाही.