आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा मोदींच्या ‘घरवापसी'ची! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारो वर्षांची संस्कृती लाभलेला आपला देश हा महान आहे, यात कुणालाही शंका येण्याचे कारण नाही. मात्र, सध्या सत्तेच्या गुलाबी थंडीने सुखावलेला संघ परिवार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्याद्वारे या देशाच्या महान संस्कृतीला आणखी ‘महान' बनविण्याचे काम करीत आहे. आता अशा धर्मकृत्यांविरुद्ध या देशातले पाखंडी लोक कर्कश स्वरात आरडाओरडा करणारच! भारतीय संस्कृतीचे जे कोणी संरक्षक आहेत त्यांना या देशातील वेद, पुराणे वगैरेंचा भारी अभिमान असतो.
आपल्याकडची पुराणे कमी थोर नाहीत. त्यांच्यातही भविष्यकाळातले बरेच दाखले सूचकरीत्या दर्शविलेले आहेत, असे जाणकार सांगतच असतात! कल्पना करा, आजपासून दोन हजार वर्षांनी या भरतखंडात काही पुराणे प्रचलित होतील. त्यातील एक असेल ‘नरेंद्रपुराण.' ‘२०१४ मध्ये यूपीए नामे उन्मत्त झालेल्या दैत्याचे मोदी उपनामे नरेंद्राने लोकसभा निवडणुकीच्या रणांगणी घनघोर लढाईत पारिपत्य केले व भरतभूमीचे हे नरेंद्र पंतप्रधान जाहले' अशी नोंद या नरेंद्रपुराणात ठळकपणे केली जाईल! या पुराणात मोदींच्या शूरकथांचीही रसभरीत वर्णने असतील! नरेंद्रपुराणाची भविष्यवेधी कल्पना अनेकांना रुचणार नाही, मात्र सध्याच्या संस्कृतिरक्षक सरकारची सारी वाटचाल भविष्यात अशी पुराणे रचण्याच्या दृष्टीनेच सुरू आहे.
‘अच्छे दिन आने वाले है' ही मोदींनी दिलेली घोषणाही भविष्यवेधीच होती. फक्त ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा सवाल मात्र कुणीही त्यांना विचारायचा नाही, एवढीच त्यामधील एक गोम आहे. मोदी सरकारला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरही या सरकारने देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने काही भक्कम पावले टाकली आहेत, असे क्वचितच बघायला मिळत आहे.
आगामी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक सुधारणांना वेग मिळावा म्हणून काय काय करणार आहोत याची भलीमोठी जंत्री केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जंगी मुलाखतींद्वारा दिली आहे. मात्र, देशातील ४० कोटींहून अधिक संख्येचा मध्यमवर्ग नाराज होईल, अशी कोणतीही पावले उचलणे भाजपला परवडणारे नाही, इतकी अंतर्ज्ञानी दृष्टी सत्तानरेंद्रास आहे. मध्यमवर्गातील बहुतांश लोक भाजपचे कट्टर समर्थक असून त्यांनीच जर पुढच्या लोकसभा निवडणुकीत पाठ फिरविली तर आपला पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची अजिबात शक्यता नाही हा साक्षात्कार मोदींना झालेला आहे. देशाचा विकास उत्तम रीतीने करण्यासाठी भाजपला केंद्रात जनतेने निवडून दिले आहे, याचा त्या पक्षाची प्रतिपाळक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासही साफ विसर पडलेला दिसतो. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून संघाच्या संस्कृतिरक्षकांनी व त्यांच्या मोदी मंत्रिमंडळातील चेल्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा मोदी अडचणीत आलेले आहेत. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी रामजादे व हरामजादे यांच्यातील फरक समजावून सांगणारे जे वक्तव्य केले त्यामुळे संसदेत खूप मोठा गदारोळ माजला. सामोपचाराच्या काही तडजोडी होऊन त्या आघाडीवर काही सामसूम होत नाही तोच रा. स्व. संघ व बजरंग दलाने आग्रा येथे २०० मुस्लिमांचे धर्मांतर करून त्यांना हिंदू करून घेतले.
अधिकाधिक मुस्लिम व ख्रिश्चनांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचा आमचा अजेंडा असल्याचे संघाने म्हटले आहे. या मुस्लिमांना काही प्रलोभने दाखवून हिंदू धर्मात पुन्हा आणले गेल्याच्या प्रकारामुळे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकडे लक्ष वेधत काँग्रेसादी विरोधकांनी संसदेत गदारोळ केला असता नरेंद्र मोदी सरकारने हात झटकून हा प्रश्न उत्तर प्रदेश सरकारकडे टोलविला. धर्मांतर हा अत्यंत नाजूक विषय असून त्याला अनेक कंगोरे आहेत. आग्रा येथील धर्मांतर असो वा साध्वी निरंजन ज्योतींची भडक वक्तव्ये अशा कोणत्याच प्रकरणात मोदी सरकार कसलीही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला तयार नाही.

धर्मांतरासाठी संघाचा लाडका शब्द आहे ‘घरवापसी'. आग्रा येथील २०० मुस्लिम धर्मांतरित होऊन आपल्या पूर्वजांच्या म्हणजे हिंदूंच्या घरी पुन्हा परत आले, असा त्याचा अर्थ सांगितला जात आहे. देशाच्या विकासासाठी ज्यांना निवडून दिले ते नरेंद्र मोदी सरकारमधील काही शूरवीर देव-धर्म-संस्कृतीच्या गप्पा मारण्यातच दंग आहेत. त्यातूनच भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून
जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. देशाच्या विकासाला गती देण्याकरिता अबकारी करापासून ते पतयोजनांमध्ये अनेक सुधारणा मोदी सरकारने कराव्यात, अशी मागणी उद्योगक्षेत्रातील सीआयआय या महत्त्वाच्या संघटनेने केली आहे; पण संस्कृती(हिंदू) रक्षणापुढे सारे काही गौण आहे, असे दर्शनी व वर्तनी दाखविणारे मोदी सरकार देशविकासाच्या मूळ कार्यापासून ढळले आहे. आर्थिक विकासाच्या मूळ कामाकडे मोदींची ‘घरवापसी’ होणे गरजेचे आहे.