आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कट्टरपंथाचा उन्माद माणसाला किती नीच बनवू शकतो हे जगाने मंगळवारी पाहिले. सुडाच्या भावनेने पेटलेल्या तालिबान्यांनी पेशावरमधील कोवळ्या मुलांनाही सोडले नाही. समर्थांच्या शब्दात, पाप इतके झाले की शुभ व अशुभाचा विवेकही उरला नाही. हा यातील अतिशय लाजिरवाणा व धोकादायक भाग आहे. पाषाणालाही लाजवील असे कृत्य करणारी कट्टरता त्यांच्या अंगात भिनवली गेली होती.
वर्षानुवर्षे द्वेषाचे धर्मकारण व राजकारण केले की काय वाट्याला येते याचा अनुभव सध्या अनेक देश घेत आहेत. मंगळवारी पाकिस्तानात जे घडले, त्याचा पूर्वरंग ऑस्ट्रेलियाने दोनच दिवसांपूर्वी अनुभवला. ऑस्ट्रेलियातील अतिरेक्यांची तयारी तालिबान्यांइतकी नव्हती म्हणून तेथील ओलीस बचावले. पण कट्टरता दोन्हीकडे सारखीच होती. पाकिस्तानने तर गेली कित्येक वर्षे कट्टर धर्मांधतेला आपलेसे केले आहे. अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने अफगाण तालिबान्यांना पोसले. तालिबान्यांनी भारताचे विमान पळवले तेव्हा अमेरिकेने बोटचेपी भूमिका घेतली होती. अमेरिकेचा पैसा व शस्त्रे वापरून पाकिस्तानने नवे तालिबानी घडवले आणि त्यांचा भारताविरुद्ध वापर सुरू केला. पुढे हे अस्त्र अमेरिकेवरच उलटले आणि बुश यांना अफगाणिस्तानवर हल्ला करावा लागला. तेथील तालिबान सरकारचा पराभव झाला असला तरी त्यांना हुसकावून लावणे अमेरिकेला जमले नाही.
पाकिस्तानने ते होऊही दिले नाही. कारण भारताविरुद्ध पाकला हेच अस्त्र वापरायचे होते. अफगाणिस्तानात शहाणी राजवट आणणे अमेरिकेला जमले नाही व ओबामा यांनी तेथून सैन्य काढून घेण्यास सुरुवात केली. त्याबरोबर पुन्हा तालिबान्यांनी डोके वर काढले. पाकची त्याला फूस होती. दहशतवादाचे हे अस्त्र पाकिस्तानवर यापूर्वी दोन-तीन वेळा उलटले आहे, पण तेथील राज्यकर्ते शहाणे होण्यास तयार नाहीत. याला कारणे दोन. मुळात त्या देशाची घडणच द्वेषावर झाली असल्याने अन्यधर्मीय राष्ट्रांशी मोकळ्या परस्परसंबंधांचा पाकला तिटकारा आहे आणि भारताप्रमाणे प्रगतिशील नेतृत्व व विचारधारा तेथे कधीच रुजलेली नाही. अमेरिकेने स्वार्थ साधला हे खरे; पण स्वार्थी धर्मांधांची फौज उभी करण्याचे प्रयत्न पाकिस्तानात सातत्याने सुरू राहिले, त्याला सामाजिक अटकाव झाला नाही, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. जपान, जर्मनीसारखी राष्ट्रे अमेरिकी पैशावर मोठी झाली, पाकिस्तानला तसे का जमले नाही याचे उत्तर त्या राष्ट्राच्या संस्कारामध्ये आहे. यामुळे आजही तेथे कोवळी मुले बळी पडली असली तरी परिस्थिती फारशी बदलणार नाही.
इम्रान खानसारख्या नेत्याने तर तालिबानचे नाव घेण्याचे टाळले. यावरून तेथील परिस्थितीचा अंदाज येईल. लष्करी तळावर थेट हल्ला करण्यापेक्षा शाळेवर भेकड हल्ला करून पाकिस्तानी लष्कराला इंगा दाखवण्याचा डाव तालिबानी खेळले. यामुळे पाक लष्कराचे डोळे उघडून तेथे दहशतवादाविरुद्ध मोहीम सुरू होईल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मानवी जीवनाची किंमतच जेथे शून्य आहे तेथे असे कितीही हल्ले झाले तरी राज्यकर्ते फारसे बदलत नाहीत. समाजात थोड्या लाटा उठल्या तरी त्या लवकरच विरून जातात व पुन्हा एकदा जगात, विशेषत: भारतात, दहशतवाद फोफावण्याचा विडा उचलणारे नवे तरुण घडवले जातात.

हे वास्तव लक्षात घेऊन भारताला वाटचाल करावी लागेल. लष्कराला अद्ययावत करणे ही पहिली पायरी. सोनिया गांधींच्या काळात सर्वाधिक दुर्लक्षित क्षेत्र लष्कराचे राहिले व पाकिस्तानही आपल्याप्रमाणेच दहशतवादाचा बळी ठरत असल्याचा कळवळा शर्म-ए-शेखमध्ये मनमोहनसिंग घेत राहिले. असल्या रोमँटिक कल्पनांना मोदी बळी पडत नाहीत हे चांगले आहे व लष्करी खरेदीला सुरुवातही झाली आहे. तथापि, त्याहून महत्त्वाची बाब आहे ती अंतर्गत सुरक्षा, म्हणजेच पोलिस यंत्रणा, अतिशय सक्षम व कर्तव्यदक्ष करण्याची. इसिस या धोकादायक संघटनेची पाळेमुळे भारतात वेगाने पसरत आहेत व सिमीप्रमाणे या संघटनेचे अनेक सिक्रेट सेल्स गावोगाव तयार होतील. त्यांना रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणेवर खर्च करून अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल.
मुंबईवरील हल्ल्यासाठी आपण पाकिस्तानला जबाबदार धरू शकलो ते अमेरिकेने पुरवलेल्या तंत्रज्ञानामुळे. त्याचबरोबर दहशतवादाला धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण करण्याचा घातक खेळ सर्व पक्षांनी थांबवला पाहिजे. मोदी यांच्या विजयामुळे अस्वस्थ झालेल्या राजकारणी व बुद्धिमंतांबरोबर हिंदुत्ववादीही हा खेळ खेळत आहेत. मोदींनी त्यांना वेसण घातली पाहिजे. तंत्रज्ञानातील अद्ययावतता व अखंड सावधता याच दोन शस्त्रांनी दहशतवादाशी लढता येऊ शकते ही मन की बात मोदींनी देशाला समजावण्याची गरज आहे. फुटकळ विषयांवर बोलणे त्यांनी सध्या बंद करावे.