आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलाजरा पाकिस्तान! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावरमध्ये तहरीक-ए-तालिबान या संघटनेच्या दहशतवाद्यांनी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये घुसून तेथील १३२ विद्यार्थ्यांसह १४१ जणांना गोळ्या घालून ठार मारले. शेवटच्या दहशतवाद्याचा खात्मा होईपर्यंत पाकिस्तानचा दहशतवाद विरोधातील लढा सुरूच राहील, अशी भीमगर्जनाही पेशावर हत्याकांडानंतर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली. मात्र, त्यांची घोषणा किती दांभिक आहे हे कुख्यात दहशतवादी झकी ऊर रहमान लख्वी याला पाकच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी मंजूर केलेल्या जामिनावरून ढळढळीतपणे समोर आले आहे.
मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला करून दीडशेच्या वर माणसांचे बळी घेतले. हा हल्ला करणा-या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत हाती सापडल्याने पाकचा क्रूर चेहरा जगासमोर आला. मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारामध्ये झकी ऊर रहमान लख्वी हाही आहे हे स्पष्ट होताच त्याला आपल्या ताब्यात देण्यात यावे, ही भारताने केलेली मागणी पाकने धुडकावली होती. पाकिस्तानी भूमीचा आश्रय घेऊन अनेक दहशतवादी भारतामध्ये घातपाती कारवाया घडवून आणत असतात. मुंबईमध्ये दाऊदला हाताशी धरून आयएसआय या गुप्तचर संघटनेने भीषण बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
खलिस्तानची चळवळ वा काश्मीरमध्ये होणा-या घातपाती कारवाया, त्यामागे पाकचा हात असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी झकी ऊर रहमान लख्वीसह लष्कर-ए-तोयबाच्या सात दहशतवाद्यांना पाकिस्तानने पकडून गेली पाच वर्षे तुरुंगात डांबले होते. पेशावर येथील हिंसाचाराला दोन दिवसही उलटत नाहीत तोच लख्वीची गुरुवारी जामिनावर मुक्तता करून पाकने भारताच्या जखमेवर मीठ चोळले आहे. एकीकडे बळी पडलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहण्यात तेथील न्यायाधीश, वकील, राजकारण्यांपासून सारेच सामील झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले.

दुस-या बाजूला सबळ पुराव्या अभावी लख्वीला जामीन मिळेल अशीही व्यवस्था राज्यकर्त्यांनी केली. लख्वीला जामीन देऊ नका, असे पाकच्या सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले, हा तोंडदेखला कायदेशीर उपचार होता. कारण मुळातच पुरावाच कमकुवत देण्यात आला. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान अस्तित्वात आला. भारतद्वेषावरच पाकची निर्मिती झालेली असल्याने त्याच्या गुणसूत्रांतील हा अवगुण आजवर वेळोवेळी दिसून आलेला आहे. भारतद्वेषावरच पाकिस्तानातील राजकारण, न्याययंत्रणा, लष्कर, पोलिस तसेच अन्य वर्गही पोसले गेले आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानात खुलेआम फिरत असतानादेखील त्यांना हात लावण्याची हिंमत पाक राज्यकर्त्यांना लष्कराच्या दबावामुळे होत नाही.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आणलेल्या दडपणामुळे व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानला उघडे पाडल्यानेच झकी ऊर रहमान लख्वीला जेरबंद केले. मात्र, तुरुंगात तो व त्याचे साथीदार ऐषारामात जगत होते. त्यांना तुरुंगाबाहेरच्या जगाची कोणतीही कमतरता जाणवणार नाही याची काळजी घेण्यात पाकचे राज्यकर्ते गुंतलेले होते. मुळात मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर आपल्या देशात खटला चालवण्यासाठी पाकने पहिल्यापासूनच उदासीनता व दिरंगाई दाखवलेली होती.
गेल्या मार्चमध्ये इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयांवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर सुरक्षेचे कारण दाखवून मुंबई हल्ला प्रकरणाचा खटला चालवण्यास दहशतवादविरोधी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असमर्थतता व्यक्त केली होती. आता सर्व काही सुरळीत झाले असे वाटत असतानाच लख्वीला जामीन मंजूर झाल्याने मुंबई हल्ल्याचा खटलाच कमजोर झाला आहे. मुंबई हल्ल्याच्या कटातील सूत्रधारांपैकी एक असलेला हाफिज सईद हा दहशतवादीही पाकमध्ये मोकाट फिरतो आहे. पेशावरच्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात असून त्याचा सूड घेतला जाईल, अशी धमकीही हाफिज सईदने दिली आहे. पूर्वानुभव लक्षात घेता भारतानेही या धमकीस अत्यंत गांभीर्याने घेतले. पाकिस्तान यापुढे चांगला व वाईट तालिबानी असा फरक करणार नाही, अशी पोकळ भूमिका तेथील राजकीय पक्षांनी ‘एकमता'ने घेतली आहे. मात्र, भारताविरुद्ध कारवाया करणारा तालिबानी ‘चांगला' ही विषारी भूमिका पाकिस्तानी राजकारण्यांच्या मनात आहे.
पेशावरमधील हल्लेखोरांबद्दल बोलताना तालिबानचे नावही इम्रान खानने घेतले नाही. त्याचा पुळका आलेल्या अनेक बुद्धिमंतांनी आपल्या मेंदूला आलेला गंज आता तरी खरवडून काढावा! हाफिज सईद असो वा जामीन मिळाल्याने त्याला आता सामील होणारा झकी ऊर रहमान लख्वी असो, हे गणंग आपल्या ताब्यात मिळण्यासाठी भारताने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणून पाकची कोंडी करण्याचे कसून प्रयत्न करावेत. पाकिस्तानला फक्त दबावाची भाषा कळते.