आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतयुद्धाचा गोड शेवट ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोबळ अर्थाने १९४५ ते १९९० हा शीतयुद्धाचा काळ. जग अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमध्ये विभागलेले होते; पण १९८९ मध्ये बर्लिनची भिंत कोसळली व पुढे १९९१ मध्ये युरोप ते आशिया असा आकाराने प्रचंड असलेल्या सोव्हिएत युनियनची १५ देशांत शकले झाली. हे स्थित्यंतर इतके ऐतिहासिक होते की या दोन घटनांमुळे जगाची केवळ भौगोलिक रचनाच बदलली नाही तर त्याचे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक संदर्भही बदलले. जगाला जागतिकीकरणाला गती मिळाली. जे देश (क्युबा सोडून) शीतयुद्धाच्या दाट छायेखाली होते ते जागतिकीकरणात वेगाने ओढले गेले.
जग निओ लिबरल भांडवलशाहीकडे वाटचाल करू लागले. या व्यवस्थेत लष्करशाही-घराणेशाहीऐवजी आर्थिक घडामोडींना प्राधान्य होते. एकमेकांच्या विरोधात शेकडो वर्षे संघर्ष करणारे देश व्यापार व सौहार्दाचे संबंध स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू लागले. विविध वांशिक, आर्थिक प्रश्नांनी ग्रस्त झालेला युरोप एक सामायिक चलनाची मागणी करू लागला. चीन-भारतासारखे देश आर्थिक सत्ता म्हणून उदयास आले. तरीही क्युबा हा आंतरराष्ट्रीय राजकीय रंगमंचावर असा एकमेव असा देश होता की ज्याचे अमेरिकेशी असलेले कटुतेचे संबंध कायम राहिले होते. अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्या कारकीर्दीपासून क्युबाविरुद्ध कटुता निर्माण झाली होती ती जॉन एफ. केनेडी यांच्या काळात शिगेला पोहोचली होती. १९६२ मध्ये क्युबन मिसाइल क्रायसिसच्या काळात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आले होते; पण सुदैवाने जग या युद्धज्वरातून बाहेर आले होते. तरीही पुढे केनेडींनंतरच्या सर्व अमेरिकी अध्यक्षांनी क्युबासंदर्भातील आपल्या राजकीय-आर्थिक भूमिकेत एक इंचही बदल केला नव्हता. सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या फिडेल कॅस्ट्रो राजवटीचा अमेरिकेला धोका आहे, या गृहीतकावर अमेरिकेच्या सत्ताधा-यांमध्ये इतका संशय होता की, त्या दृष्टिकोनातून अमेरिकेने क्युबा उद्ध्वस्त होण्यासाठी त्यांच्यावर कठोर आर्थिक-राजकीय निर्बंध लादले. तसेच अमेरिकेने सीआयएच्या माध्यमातून कॅस्ट्रोंच्या हत्येचे अनेक कट आखले. पण त्यात त्यांना यश आले नाही. कॅस्ट्रो राजवटही अमेरिकेच्या दादागिरीपुढे झुकली नाही. त्यांच्या दृष्टीने हा संघर्ष जसा क्युबन अस्मितेचा होता तसा तो भांडवलवाद विरुद्ध साम्यवाद अशा वैचारिक संघर्षाचाही होता. पण शेवटी जागतिकीकरणाच्या काळात असे शत्रुत्व-संघर्ष किती काळ टिकणार ? अमेरिकेने काळानुरूप आपल्या राजकीय भूमिकांमध्ये लवचिकता आणत रशिया, चीन, व्हिएतनाम आणि इराणशी जुळवून घेतले; पण क्युबाशी संबंध कटुतेचे राहिले. आता या संघर्षाला कायमची मूठमाती अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.
"आजपर्यंतची अमेरिकेची क्युबाविषयीची भूमिका उभय देशांच्या दृष्टीने फायद्याची वा व्यवहार्य नव्हती. अमेरिकेची क्युबाविषयीची दशकानुदशके असलेली ताठर भूमिका कालसुसंगत नव्हती व या पाच दशकांत दोन्ही देशांनी काहीच साध्य केले नाही,' असे मत ओबामा यांनी मांडले आहे. त्यांचे हे मत प्रदर्शित करताना त्यांनी वास्तववाद दाखवला आहे ही कौतुकास्पद बाब आहे. ओबामा यांनी क्युबापुढे केलेला मैत्रीचा हात हा केवळ अपरिहार्यतेतून आलेला नाही, तर ती अमेरिकेने क्युबाविषयी चुकीच्या परराष्ट्र धोरणाची दिलेली कबुली आहे. तशी भूमिका क्युबानेही दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कटुता मिटावी म्हणून पोप फ्रान्सिस यांनी प्रयत्न केले आहेत. व्हॅटिकनच्याच पुढाकाराने क्युबा-अमेरिका मैत्री प्रस्थापित व्हावी या दृष्टीने कॅनडात गुप्तपणे बैठका सुरू होत्या. गेल्या काही वर्षांत व्हॅटिकनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता नांदावी म्हणून जे काही प्रयत्न सुरू होते त्याला मिळालेले हे यश आहे.

वास्तविक अमेरिका व क्युबाच्या सीमांमध्ये केवळ ९० किमी अंतराचा समुद्र आहे; पण या देशांनी वैर इतके उरापाशी जपले होते की क्युबाच्या आर्थिक विकासाचा पुरता बो-या वाजला होता. कॅस्ट्रो पितापुत्रांच्या काळात सामान्य नागरिकाच्या दैनंदिन गरजाही भागू शकलेल्या नाहीत. विकासाचे प्रश्न इतके गंभीर आहेत की साखर उत्पादनाशिवाय अन्य उद्योग या देशात सुरू झालेले नाहीत. कारखानदारी, परकीय गुंतवणूक, वित्तीय संस्थांची वानवा यामुळे क्युबन समाज गरिबीने वेढला आहे. आर्थिक विकासाचा दर जेमतेम दीड टक्क्याच्या आसपास आहे. जी काही बाहेरून आर्थिक मदत मिळते ती जवळच्या व्हेनेझुएला या समाजवादी देशाकडून; पण याही देशाचे तेलाच्या किमती घसरल्याने दिवाळे वाजण्याची वेळ आली आहे. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या क्युबावरचे आर्थिक निर्बंध हटल्याने अमेरिकेतील मोठे भांडवलदार, पर्यटन उद्योग, व्यावसायिक तेथे गुंतवणूक करण्यास मोकळे होतील. क्युबाचे साम्यवादी रूप आता काही वर्षांत पालटलेही जाईल. क्युबा-अमेरिकेची मैत्री ही या वर्षातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. एका शीतयुद्धाचा शेवट गोड झाला, असे म्हणावयास हरकत नाही.