आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासनना पायबंद! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटची विश्वासार्हता, नैतिकता आणि क्रिकेट रसिकांच्या संशयाला पुष्टी देणा-या एका गहन प्रश्नाची गुरुवारी उकल झाली. आयपीएलमधील सट्टेबाजीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुनाथ मयप्पन (चेन्नई सुपरकिंग्ज) आणि राज कुंद्रा (राजस्थान रॉयल्स) यांना दोषी ठरविले. त्यामुळे गेली कित्येक वर्षे पदाधिका-याच्या विविध रूपात बीसीसीआयवर असलेल्या आणि बीसीसीआयच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आर्थिक हितसंबंध जपणा-या एन. श्रीनिवासन यांना पायबंद घातला गेला आहे. पदाधिका-यांना बीसीसीआयच्या आर्थिक कुरणामध्ये मुक्त संचार करण्याची मुभा देणारे कलम ६.२.४ हेच न्यायालयाने रद्दबातल ठरविले. तसे करताना येत्या सहा आठवड्यांत निवडणुका घेण्याचे आदेश देत अशा प्रकारचे कोणतेही हितसंबंध असणा-यांना निवडणूक प्रक्रियेपासून हद्दपार करण्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले.
तसे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीला विळखा घालून बसलेल्या नारायण स्वामी श्रीनिवासन यांनाही भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा चेन्नई सुपरकिंग्ज व अन्य आर्थिक लाभाची कुरणे यापैकी एकाच गोष्टीची निवड करा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सहा आठवड्यांच्या मुदतीत श्रीनिवासन यांना
बीसीसीआयचे पाश तोडून टाकणे सहज शक्य होईल. मात्र, त्यांनी चेन्नई सुपरकिंग्जपासून फारकत घेण्याचे ठरविल्यास त्या प्रक्रियेला वेळ लागेल. चेन्नई सुपरकिंग्ज ही फ्रँचायझी इंडिया सिमेंट कंपनीच्या आर्थिक रसदीवर अवलंबून आहे.
त्यामुळे इंडिया सिमेंटच्या शेअरधारकांना विश्वासात घेऊन रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्यास बराच कालावधी लागू शकेल. या गदारोळात मुद््गल समितीच्या बंद लिफाफ्यातील १३ संशयित क्रिकेटपटूंचे काय झाले ते स्पष्ट झालेच नाही. फ्रँचायझींचे मालक आणि बीसीसीआयचे दुहेरी हेतूने काम करणारे अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर न्यायालयाचा आसूड कडाडला खरा; परंतु क्रिकेटमधील सट्टेबाज, निकाल निश्चितीत गुरफटलेले क्रिकेटपटू यांच्यासंदर्भातील गोष्टी अद्याप स्पष्ट व्हायच्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे, लाभाच्या हेतूने विविध क्रीडा संघटनांवर ठाण मांडून बसणा-या अन्य खेळांतील क्रीडा संघटकांनाही वेसण बसणार आहे.
बीसीसीआयपुरता विचार केल्यास न्यायालयाने श्रीनिवासन यांना दूर केल्यापासून क्रिकेटच्या हिताची अनेक कामे रखडली होती. निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाने श्रीनिवासन यांच्याकडून हिरावून घेतला होता तरीही पडद्यामागून सारी सूत्रे श्रीनिवासन हेच हलवत असल्याचे वारंवार जाणवत होते. बीसीसीआयच्या सभा मुक्तपणे होत नसाव्यात. कारण महत्त्वाचे निर्णय घेतले जातच नव्हते. शेवटी शेवटी तर श्रीनिवासन यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बैठकांमध्ये बसण्याचा प्रमाद केला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच श्रीनिवासन यांचा परतीचा मार्ग खडतर केला आहे. याचा अर्थ गेंड्याच्या कातडीचे श्रीनिवासन बीसीसीआयवर पुन्हा येणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.
खरं तर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या बोहल्यावर पुन्हा चढण्यासाठी त्यांनी आतापासून मोर्चेबांधणीस सुरुवातही केली असेल. पूर्व विभागातील संघटनेचा अध्यक्षपदाचा क्रम या वेळी आहे. श्रीनिवासन यांनी पूर्व विभागाच्या सर्वच्या सर्व सदस्यांची अनुकूलता यापूर्वीच घेऊन ठेवली आहे. चेन्नई सुपरकिंग्जशी संबंध ते किती झटपट आणि कसे तोडून टाकतात यावरच पुढची रणनीती अवलंबून आहे. मात्र, श्रीनिवासन आणि त्यांच्या कट्टर समर्थकांशी मात्र टक्कर देण्याइतपत क्रिकेट प्रशासक भारतात आहेत का? या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जपासून सहा आठवड्यांत दूर होण्यात श्रीनिवासन यांना यश आले नाही तर एखादा पूर्व विभागातील उमेदवार निवडून आणून पुन्हा एकदा बीसीसीआयचा रिमोट आपल्या हाती ठेवण्याची चालही ते खेळू शकतात. ७-८ महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा निवडणुका
लढवून निवडून येण्याची क्लृप्तीदेखील ते लढवू शकतात. श्रीनिवासन यांना यापुढे मनमानी कारभार करता येणार नाही.
न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीला, जनतेच्या हिताच्या दृष्टीने बीसीसीआयच्या घटनेवरही नजर ठेवून योग्य ते बदल करण्याचे अधिकार दिले आहेत. दोषी व्यक्तींना बीसीसीआयच्या वतीने शिक्षा ठोठावण्याचेही अधिकार दिले गेले आहेत. निवडणुकांमध्ये व कारभारात पारदर्शकता यावी यासाठीही नियम, अटी यात बदल सुचवण्याचे सांगण्यात आले आहे. क्रिकेटमधील निकालनिश्चितीची कीड उपटून काढण्याची उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जगातील सर्वाधिक उत्पन्न असणा-या बीसीसीआयच्या शुद्धीकरणाचे कार्य या त्रिसदस्यीय समितीला सहा महिन्यांत पार पाडायचे आहे. श्रीनिवासन यांच्या समर्थकांकडून या समितीला कसे व किती सहकार्य मिळते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका मोठ्या साफसफाई अभियानाला सुरुवात झाली आहे!