आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नि:शब्द आणि स्तब्ध! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"कॉ मन मॅन' सोमवारी नि:शब्द आणि स्तब्ध झाला. कॉमन मॅनच्या अवखळ, मार्मिक दृष्टीतून जग पाहणारा आणि गवसलेले सत्य व्यंगचित्राच्या खिडकीतून सा-या जगाला दाखवणारा त्याचा निर्माता काळाच्या पडद्याआड गेला. कसं बोललात, अशी दाद देण्याचे दिवस संपले. सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या घडामोडींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण भाष्य करीत त्या वेळी "कसं बोललात' असेच सहजोद्गार कुणाच्याही मुखातून येत. "टाइम्स ऑफ इंडिया'तील त्यांची व्यंगचित्रे व महाराष्ट्र टाइम्समधील त्याच्या सुयोग्य भाषांतराने मन प्रसन्न होण्याबरोबरच अंतर्मुखही होत असेे.
लक्ष्मण यांचा कॉमन मॅन मूकच होता, पण त्याच्या चेहऱ्यावरील भाव कोट्यवधी भारतीयांची मार्मिक टिप्पणी होती. ती शैलीदार, शालजोडीतील, हलकेच पण सप्पकन वार करणारी टिप्पणी काळाच्या पडद्याआड गेली. पं. जवाहरलाल नेहरूंचे ते चाहते होते. चीनसमोरचा पराभव हे नेहरूंच्या कारकीर्दीतील सर्वात मोठे अपयश होते. त्या वेळच्या घडामोडींवर खोचक भाष्य करताना लक्ष्मण यांचा कुंचला हा कधीही भाला झाला नाही तसेच त्यांनी नेहरूंना खलनायक म्हणून चितारले नाही. सभ्यतेचे सारे निकष पाळून सुसंस्कृत चित्रशैली व भाषेत आपल्या व्यंगचित्रपात्रांची खिल्ली उडवणे हा आर. के. लक्ष्मण यांचा सहजस्वभाव होता. इंदिरा गांधी यांचे व्यंगचित्र रेखाटताना त्यांच्या नाकाला लक्ष्मण यांनी पक्ष्याच्या चोचीसारखा टोकदार आकार दिला होता. एका समारंभात लक्ष्मण यांची भेट झाली असता इंदिरा गांधी यांनी आपले नाक त्यांना दाखवून ते खरेच चोचीसारखे दिसते का, अशी हसत हसत विचारणा केली होती! राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव यांची व्यंगचित्रे काढताना त्यांची शारीरवैशिष्ट्ये टिपताना आर. के. लक्ष्मण यांची रेषा इतकी सूक्ष्म व्हायची की एकदा नरसिंह राव यांनी म्हटले होते की, आम्ही राजकीय नेते लोकांना कसे दिसतो हे पाहायचे असेल तर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे पाहा! सशक्त रेखाटन हे त्यांच्या व्यंगचित्रांचे बलस्थान होते. व्यंगचित्र काढणे ही साधना आहे. जगात नेमके काय बदल होत आहेत त्याचे अचूक भान येण्यासाठी वृत्तपत्रे, सर्व साहित्यप्रकारातील उत्तमोत्तम पुस्तकांचे दांडगे वाचन आवश्यक असते. हा मंत्र आर. के. लक्ष्मण यांना माहीत होता. त्यामुळे त्यांचे कोणतेही व्यंगचित्र हे त्या विषयाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भांचा अर्क घेऊन अवतरत असे. पंतप्रधान बनण्यासाठी कायम रांगेत असलेले व रथयात्रेमुळे वादग्रस्त ठरलेले लालकृष्ण अडवाणी यांचे व्यंगचित्र चितारताना लक्ष्मण कायम अडवाणींच्या डोईवर मुकुट व कपाळावर गंधाचा टिळा काढायचे! त्यामुळे अडवाणींच्या राजकीय कारकीर्दीचे गमक नेमके कशात आहे हे वाचकांना ते पाहताक्षणीच लक्षात यायचे.

आर. के. लक्ष्मण यांची सारी कला महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईच्या बहुपेडी वातावरणात फुलली. लक्ष्मण यांचेच समकालीन असलेले बाळासाहेब ठाकरे यांचीही व्यंगचित्रकला मुंबईतच बहरली. "फ्री प्रेस जर्नल' या वृत्तपत्रात ठाकरे व लक्ष्मण हे सहकारी होते. कालौघात दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. "मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक असलेल्या बाळासाहेबांची व्यंगचित्रकला पुढे कमी झाली असली तरी त्यांच्या सशक्त रेषेचे व ठोस राजकीय भाष्याचे लक्ष्मण चाहते होते. लक्ष्मण यांच्या कुंचल्याच्या फटक्यातून ठाकरेही सुटले नाहीत, पण कलेची समज असणाऱ्या ठाकरेंनी लक्ष्मण यांच्यावर कधीही पंजा उगारला नाही. लक्ष्मण व्यंगचित्रकाराच्या भूमिकेतच आयुष्यभर वावरले. त्यांच्या लेखणीतूनही तशीच शब्दचित्रे अवतरली. ब्रिटिश व्यंगचित्रकार सर
डेव्हिड लो हे लक्ष्मण यांना गुरुस्थानी होते. पंच, स्ट्रँड, बायस्टँडर, वाइड वर्ल्ड, टिट-बिट्स या नियतकालिकांमध्ये डेव्हिड लो यांच्या प्रसिद्ध होणाऱ्या व्यंगचित्रांचा लक्ष्मण यांनी एकलव्याप्रमाणे अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी स्वत:ची व्यंगचित्रशैली विकसित केली. या शैलीचा लक्ष्मण यांना सार्थ आत्मविश्वास होता व जगाला तो मान्य होता.

सामान्य भारतीय माणसाचे प्रतीक असलेला कॉमन मॅन आपल्या व्यंगचित्रांचा केंद्रबिंदू ठेवून त्यांनी भारतीय मातीशी नाळ जोडली. प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण हे त्यांचे थोरले बंधू. नारायण यांच्या कथांवर आधारित "मालगुडी डेज' या दूरदर्शन मालिकेसाठी आर. के. लक्ष्मण यांनी चितारलेली चित्रे त्या काळात विलक्षण गाजली होती. लक्ष्मण हे सृष्टिप्रेमी होते. मुंबईतील कावळे हा त्यांच्या खास निरीक्षणाचा विषय होता. त्यांच्या व्यंगचित्रांत कावळे हमखास दिसायचेच; पण कावळ्यांची त्यांनी काढलेली खास व्यंगचित्रे हाही त्यांच्या कलादृष्टीचा एक निराळा आयाम होता. आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रकलेतील अजोड कामगिरीसाठी केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते. मात्र सामान्य माणसाने लक्ष्मण यांना मनोमन दिलेला "व्यंगचित्रकलाभूषण' हा बहुमानही तितकाच तोलामोलाचा आहे! कारण लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सामान्य माणसांच्या भावनांचा हुंकार होता. या प्रामाणिक हुंकाराला आता सशक्त रेषेचा आधार मिळणार नाही. या महान व्यंगचित्रकाराला "दिव्य मराठी' परिवाराची श्रद्धांजली.