आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराकभाऊंचा सल्ला (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बराक ओबामा यांनी जाता जाता भारताला चार शब्द सुनावले. राज्यघटनेतील २५व्या कलमाची आठवण करून दिली. त्याचबरोबर सहिष्णुतेचे आवाहन त्यांनी केले. शाहरुख खानपासून स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत नावे घेत ओबामा यांनी आधी टाळ्या मिळवल्या आणि नंतर उपदेशाचे डोस पाजले. ओबामांच्या भेटीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे सुखावलेले भाजपचे नेते ओबामांच्या या पवित्र्यामुळे एकदम बुचकळ्यात पडले. ओबामा शाळासोबती आहेत अशा थाटात मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा एकेरी उल्लेख केला होता.
अनौपचारिकता हे अमेरिकेचे वैशिष्ट्य असले तरी राष्ट्राध्यक्षाबाबत काही संकेत पाळले जातात. मोदींनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस दाखवत परस्परांतील मैत्रीचे प्रदर्शन केले. बुश व मनमोहनसिंग यांच्यातही दाट मैत्री होती, पण दोघेही संकेताला धरून असत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तसेच वागणे योग्य असते. स्वत:चे नाव गोंदवून घेणारा मोदींचा पोशाखही शोभणारा नव्हता. नाटकीपणा, पैशाचे, ताकदीचे प्रदर्शन व आक्रमकता हे मोदी-शहा जोडगोळीचे विशेष आहेत. प्रदर्शनाचा हा हव्यास या दोघांमधील चांगल्या गुणांवर काजळी धरतो. महात्मा गांधींच्या वागण्याबोलण्यात, आंदोलनाच्या पद्धतीत नाटकीय अंश असले तरी साधेपणाचा गुण त्यावर मात करीत असे. गांधींचे नाव घेणारे मोदी इथे त्यांचे अनुकरण करीत नाहीत.
मोदींनी दाखवलेल्या सलगीने भाजपला आलेला चेव ओबामा यांनी दोनच दिवसांत उतरवला. मोदींच्या स्तुतीने सुरू झालेला दौरा कानपिचक्या देत संपला. हा फरक इतका होता की समारोपाचे भाषण हे अमेरिकेच्या अध्यक्षांचे आहे की सोनिया गांधींचे, असा प्रश्न पडावा. ओबामांच्या वागणुकीत दुसऱ्या दिवशीच फरक पडत असल्याचे लक्षात येत होते. उद्योगक्षेत्राबरोबर संवाद साधताना त्यांनी परस्परसंबंधांत भारत नेमका कोठे आहे या वास्तवाची जाणीव स्पष्ट शब्दांत करून दिली. आशियात सत्तासमतोल साधून चीनला आव्हान देण्यासाठी भारताच्या मैत्रीची अमेरिकेला गरज आहे असे म्हटले जाते. त्यामध्ये तथ्य नाही असे नाही. परंतु हे तथ्य अद्याप बरेच दूर आहे. भारत-अमेरिकेचा व्यापार जेमतेम १०० अब्ज डॉलर्सची वेस ओलांडण्याची धडपड करीत असताना चीनबरोबरचा व्यापार ६८० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे, याची जाणीव ओबामा यांनीच करून दिली. अमेरिकेच्या एकूण आर्थिक उलाढालीत भारताचा सहभाग जेमतेम एक टक्का इतकाच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. बड्या राष्ट्रांच्या पंक्तीत तुमची जागा कोठे आहे हे आकडेवारीतून ओबामा दाखवून देत होते. याच स्तंभात दोन दिवसांपूर्वी म्हटल्याप्रमाणे अमेरिका हा व्यवसायवादी देश आहे. जिकडे पैसा, तिकडे बैसा हे त्यांचे धोरण. मात्र मोदींची मोहिनी ओबामांवर मात करून गेली अशा भ्रमात भाजप होता.
आपल्यावर कोणाची मोहिनी पडलेली नाही हे ओबामा यांनी लक्षात आणून दिले आणि आमच्या सोयीने कारभार होणार असेल तरच भारताबरोबर व्यवसायवाढ होईल हे स्पष्टपणे सांगितले. याचाच दुसरा टप्पा म्हणजे ओबामा यांनी केलेला धार्मिक फाटाफुटीचा उल्लेख. असा उल्लेख करण्यामागे चर्चच्या हितसंबंधांसह अन्य काही गोष्टी असल्याचे म्हटले जाते. हे काही प्रमाणात खरे आहे. मात्र चर्चच्या हितसंबंधांपेक्षा गुंतवणुकीच्या संरक्षणाची ओबामांना चिंता आहे. धार्मिक तंट्याच्या अशांत वातावरणात धंदा करण्याची इच्छा कोणालाच होणार नाही. मोदींनाही हे कळते, पण कडव्या संघटनांविरुद्ध बोलण्याची त्यांची तयारी नाही. काही खासदारांना त्यांनी झापले असले तरी या नेत्यांचा हिंदुत्वाचा ज्वर कधी उफाळून येईल हे सांगता येत नाही. त्यातच गेल्या आठ महिन्यांत थक्क करून टाकावी अशी कोणतीही कामगिरी मोदी यांनी देशांतर्गत व्यवस्थेत केलेली नाही. परराष्ट्रीय राजकारणात त्यांनी मुसंडी मारली असली तरी जोपर्यंत रोजगारवाढ होत नाही तोपर्यंत देशातील कोट्यवधी जनतेला त्यामध्ये रस नाही. धार्मिक उद्रेकाच्या घटना संख्येने मोठ्या नाहीत, पण अशा ठिकाणी आकडेवारीपेक्षा माध्यमांतून पुढे येणारी प्रतिमा महत्त्वाची असते व ही प्रतिमा काळवंडलेली आहे. धार्मिक समतोलाबाबत अमेरिकेतील कारभार काही धुतल्या तांदळासारखा नाही. सहिष्णुतेचा उच्चार अमेरिकेने करावा यासारखा विनोद नाही. परंतु आज भारताला गुंतवणुकीसाठी अमेरिकेची व अमेरिकेच्या कलाने वागणाऱ्या बड्या राष्ट्रांची गरज आहे. धर्मवेड्या, कर्मकांडी प्रवृत्तींच्या वक्तव्यांमुळे परदेशी गुंतवणूकदार बिचकत असतील तर त्यांची धास्ती दूर करण्याची जबाबदारी मोदी यांच्यावरच पडते. अशा विघ्नसंतोषी लोकांना थारा मिळणार नाही हे ठोसपणे सांगा असे आधी देश म्हणत होता, आता जगही तेच सांगत आहे. देशातील काही जाणत्या मंडळींनी मोदींना सूचना करून पाहिली. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता त्यांचे परममित्र असलेल्या बराकभाऊंनी दिलेला सल्ला तरी ते मानतात का पाहायचे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कडव्या धर्माभिमान्यांना रोखणे आवश्यक आहे.