आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमुक्ती दूरच ( अग्रलेख )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या मे महिन्यात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा नरेंद्र मोदींचा भाजप दिल्लीमध्ये तीन जागांवर आला. याची कारणे अनेक आहेत. जे सांगितले ते केले नाही हे साधेसरळ कारण आहे. मते विकासासाठी दिली आणि कारभार 'घरवापसी'चा सुरू झाला. ना रोजगार वाढला, ना महागाई कमी झाली. विकासाचा दर वाढला असला तरी सुबत्ता येत असल्याचा किंचित आभासही गेल्या नऊ महिन्यांत झाला नाही. उलट सामाजिक अशांतता उभी राहते काय, अशी शंका मध्यमवर्गालाही येऊ लागली.
आर्थिक सुधारणांची वाट पाहून उद्योगपती कंटाळले, स्वस्ताईची वाट पाहून महिला कंटाळल्या. मध्यमवर्गाला नैतिकतेचे धडे मात्र रोज दिले गेले. रोजच्या यातायातीमध्ये काही फरक पडत नसल्याने 'मन की बात' आणि 'चाय पे चर्चा' यातील नावीन्य संपले. जनता कंटाळली व कार्यकर्ते दुरावले. मंत्र्यांना स्वत:चा आवाज राहिला नाही. कारकुनापेक्षा वाईट अवस्था त्यांची झाली. कार्यकर्ते दूर राहिले, बड्या नेत्यांनाही स्वत:चा कारभार हाकता येईना. वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खाणारे बाजूला फेकले गेले व मुख्यमंत्री हवाई छत्रीतून उतरवले गेले. बहुराष्ट्रीय कंपन्यांना साजेशी प्रचार यंत्रणा उभी राहिली. मंत्री, खासदार, आमदार एका शिस्तीत गल्लीबोळातून फिरू लागले, पण त्यांचा प्रचारात जोश नव्हता. पक्षातच परके ठरलेले नेते व कार्यकर्ते जनतेला काय विश्वासाने सांगणार? शिस्तबद्ध पण संशयग्रस्त अशी फौज भाजपने उभी केली. ही फौज लोकांची मने जिंकू शकली नाही. जिंकणे शक्यही नव्हते; कारण उसनवारीवर आणलेल्या या फौजेचा स्वत:वरच विश्वास नव्हता. आणि समोरचा भिडू छोटा असला तरी बाणेदार होता. त्याला शहरी नक्षली म्हणून हिणवले. पण लोकांना नक्षलीच हवा होता; कारण भाजपच्या बोर्डरूम पॉलिटिक्समुळे शहरातील स्थिती सुधारलेली दिसत नव्हती.
केजरीवाल हा मुळात दिल्लीकरांचा आपला माणूस होता. सत्ता सोडण्याची चूक त्याने केली असली तरी त्याच्या सचोटीवर कुणाची शंका नव्हती. सचोटीचे हे माप इतके मोठे होते की दोन कोटी रुपये भलत्या मार्गाने घेतल्याचा आरोप होऊनही केजरीवाल यांच्यावर संशयाचे बोट उठले नाही. या आरोपानंतर 'आप'च्या अन्य नेत्यांनी दिलेली सफाई ही खरे तर लाजिरवाणी होती व त्याचा समाचार आम्हीही घेतला होता. मात्र हे नेते व केजरीवाल यांच्यात जनतेने फरक केला. मते फक्त केजरीवाल यांनाच मिळाली. सत्ता व ऐश्वर्याच्या बाजारू प्रदर्शनापुढे मफलरचा फेटा दिल्लीकरांना आपलासा वाटला. गरीब आधीच साशंक होते. 'घरवापसी', 'लव्ह जिहाद', चर्चवरील हल्ला यामुळे अल्पसंख्य दुरावले. स्वस्ताई दूर राहिली, दिल्लीतील प्रवासही असुरक्षित झाल्याने महिला चिडल्या, आर्थिक सुधारणा लांबल्याने मध्यमवर्ग नाराज झाला. याचा एकत्रित परिणाम केजरीवाल यांना पाशवी बहुमत मिळण्यात झाला. हे बहुमत पाशवी झाले; कारण लोकसभेत भाजपकडे वळलेले लोक एकगठ्ठा 'आप'कडे वळले आणि त्यांनी भाजपच्या काही मतांनाही ओढून नेले.
भाजपचा पाया ढासळला नसला तरी तडे नक्कीच जाऊ लागले. या निकालांमधील ही विशेषता आहे. 'काँग्रेसमुक्ती'चा नारा अमित शहा व मोदी यांनी दिला. पण बारकाईने पाहिले तर काँग्रेसी विचारांचा आधार असलेली व्होट बँक अजून शाबूत आहे. तिचे व्यासपीठ बदलले. काँग्रेसकडून ते 'आप'कडे गेले. बारकाईने पाहिले तर केजरीवाल व राहुल गांधी यांची भाषा एकच आहे. फक्त केजरीवालांकडे असलेली सचोटीची तिखट ताकद राहुलबाबापाशी नाही. डावीकडे झुकणारी मध्यममार्गी विचारधारा ही काँग्रेसची ताकद. ही विचारधारा मानणारा मोठा वर्ग आजही देशात आहे आणि मोदींवर विश्वास टाकणारेही या विचारधारेकडे पुन्हा आकर्षित होऊ शकतात हे या निवडणुकीने दाखवले. काँग्रेसचा पार पराभव दिल्लीत झाला असला तरी देशपातळीवर काँग्रेसला निराश होण्याचे कारण नाही. योग्य नेतृत्व मिळाले तर काँग्रेस पुनरुज्जीवित होऊ शकते. एकामागून एक राज्ये मिळाली म्हणजे देश काँग्रेसमुक्त झाला या दिवास्वप्नात राहू नका, हे या निवडणुकीतून मोदी-शहांनी शिकावे. देशासाठी हे योग्यच आहे. एकमेकांना लगाम घालणा-या दोन सशक्त विचारधाराच लोकशाहीला बलवान करतात. अर्थातच या निकालाचे दूरगामी अन्य परिणाम आहेत.
आर्थिक सुधारणांना खीळ बसण्याची धास्ती आहे, परकीय गुंतवणूकदार हात आखडता घेण्याची शक्यता आहे. श्रीमंत राष्ट्रांमध्ये मोदींनी भारताबद्दल जो विश्वास निर्माण केला होता त्याला तडा बसणार असल्याने मोदींना पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. केजरीवाल यांचे सचोटीचे शस्त्र आत्मघातकीही ठरू शकते. कारण कोणत्याही गुणाचा अतिरेक - मग तो सद्गुण असला तरी - आत्मघातकीच होतो, अशी इतिहासाची शिकवण आहे. मोदींनी भाजपला एकखांबी बनवले तशीच अवस्था केजरीवाल यांच्या 'आप'ची आहे. 'आप' हा रचनाबद्ध पक्ष नाही. त्यामध्ये उत्स्फूर्तता अधिक आहे. ही उत्स्फूर्तता मोहवणारी असली तरी कारभाराला मारक ठरते. सर्वच यंत्रणांबद्दल शंका व कटकारस्थानाची आशंका यामुळे फक्त दोष दाखवता येतात, सुधारणा घडवता येत नाहीत. तरीही हा निकाल लोकशाहीवरील विश्वास वाढवणारा आहे. कारण सत्ताधा-यांना हा चाबूक हाणणारा आहे व पाशवी बहुमत देऊन नव्या सत्ताधा-यांनाही धाकात ठेवणारा आहे.