आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आप'मधील ताप! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आप' पक्षाला संपविण्यासाठी पत्रकार व प्रसारमाध्यमे सुपारी घेत असल्याचा अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केलेला आरोप तसेच त्यांचे विश्वासू सहकारी कुमार विश्वास यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका कार्यकर्तीने केलेला लैंगिक छळवणुकीचा आरोप या घटना आम आदमी पक्षातील ताप वाढत चालल्याच्या निदर्शक आहेत. देशामध्ये किमान चार वर्षांपासून क्रांतिसदृश वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल, अण्णा
हजारे व त्यांच्या सहका-यांनी चालविला होता. सध्या अस्तित्वात असलेले सगळे राजकीय पक्ष, प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचाराने किडलेली असून ती जनलोकपालाच्या आधारे बदलण्याचा विडा या मंडळींनी उचलला होता; पण मुळात हे लोक करू पाहत असलेली क्रांतीच दिशाहीन होती.
भ्रष्टाचाराविरोधातील चळवळ ही एखादा राजकीय पक्ष स्थापन करून चालवावी की ती राजकारणापासून मुक्त ठेवावी याविषयी प्रचंड तंटे होऊन अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांचे मार्ग स्वतंत्र झाले. अरविंद केजरीवालांनी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी आम आदमी पक्षाची (आप) स्थापना केली व ते उघडपणे राजकारणाच्या आखाड्यात शिरले. आपली स्थिती बदलण्यासाठी भारतीय जनमानसाला कायम एका देवदूताची गरज असते. अरविंद केजरीवाल यांनी "आप'च्या माध्यमातून इतकी भरमसाट आश्वासने दिली होती की ती ते पूर्ण करू शकतील का, याचा विचार न करता मतदार त्यांच्यावर हुरळले. परिणामी २०१३ मध्ये दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे २८ आमदार निवडून
आले.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काँग्रेसप्रणीत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून मतदारांची सहानुभूती मिळवणा-या अरविंद केजरीवाल यांनी त्याच काँग्रेसचा पाठिंबा घेऊन दिल्लीमध्ये सरकार स्थापन केले. मात्र, त्यांच्याकडे स्थिर राजकीय बुद्धीचा अभाव असल्याने ४९
दिवसांनंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने उत्तम मुख्यमंत्री मिळाला, अशी आशा लागलेल्या मतदारांचा त्यामुळे काही काळ भ्रमनिरास झाला होता; पण त्यानंतर याच केजरीवाल यांना संपूर्ण बहुमत देऊन स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची संधी दिली तर ते निश्चितच अधिक उत्तम कामगिरी करू शकतील, असाही विचार त्याच वेळी दिल्लीच्या मतदारांच्या मनामध्ये रुजला होता. ‘अच्छे दिन आएंगे'चा नारा देत काँग्रेसप्रणीत यूपीएला लोकसभा निवडणुकीत हरवून केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लवकरच एक वर्षपूर्ण होईल. या कालावधीत ते फारशी चमकदार कामगिरी करू शकलेले नसल्याने मोदींविषयी जनतेत नकारात्मक भावनाच उमटू लागली आहे.
काँग्रेस लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर इतकी हतबल झालेली आहे की तिच्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष बनण्याचे त्राणही उरलेले नाही. या सगळ्यात जरा बरा पर्याय म्हणून दिल्ली विधानसभेच्या यंदा झालेल्या निवडणुकीत मतदारांनी अरविंद केजरीवाल यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदावर बसविले.

मात्र, मागच्या चुकांपासून काही शिकावे हा अरविंद केजरीवाल यांचा स्वभाव नाही. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा वारू आपण अडविला, या उन्मादात धुंद असलेल्या केजरीवालांचे सगळे राजकारण हे व्यक्तिकेंद्री स्वरूपाचे बनलेले आहे. पर्यायाने "आप'मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीविषयी पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत बैठका किंवा जाहीर सभांमध्ये बोलणे हेही महापाप बनले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर "आप'च्या एकखांबी तंबूची
सारी मदार टिकून आहे. "आप' स्थापन झाला तेव्हा स्वप्नाळू डोळ्यांचे अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक या कुंभमेळ्यात सामील झाले होते. तीनच वर्षांचे वय असलेल्या "आप'मध्ये लोकशाही संस्कृती अजून पुरेशी रुजलेली नाही. काँग्रेस, भाजप या पक्षांपेक्षा "आप'ही फार वेगळा उरलेला नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची आपमधून अरविंद केजरीवालांच्या समर्थकांनी हकालपट्टी केली त्या वेळी या दोघांनी "आप'मधील सावळ्या गोंधळाचे अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यालाही केजरीवालांनी केराची टोपली दाखविली. याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील नेत्या मेधा पाटकर "आप'मधून बाहेर पडल्या. या सगळ्या घटनांमागील नेमकी वस्तुस्थिती दाखवून
प्रसारमाध्यमांनी टीका केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या अंगाचा तिळपापड होतो. दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांची कायद्याची पदवी बनावट आहे, अशा आशयाचे वृत्त झळकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा संयम अाता पुरता सुटला. तोमर प्रकरण उजेडात येत नाही तोच कुमार विश्वास यांच्यावरही आरोप झाले. "आप'चे सरकार दिल्लीत दुस-यांदा सत्तेवर येऊनही ते अद्याप फारसा उजेड पाडू शकलेले नाही. आपली कामगिरी का उंचावत नाही याचे केजरीवालांनी आत्मपरीक्षण केले तरच त्यांना या पक्षाचे अस्तित्व भविष्यात टिकवता येईल. नपेक्षा 'आप'मधील ताप असाच वाढत राहील!