आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकारीला लगाम! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्यंत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता सलमान खान याने २८ सप्टेंबर २००२ रोजी मुंबईतील वांद्रे येथे मद्यधुंद अवस्थेत आपली लँड क्रूझर गाडी बेदरकारपणे चालवून पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीचा बळी घेतला व चार जणांना जखमी केले होते. या खटल्याचे कामकाज तब्बल तेरा वर्षे सुरू होते. काही साक्षीदारांनी आपल्या मूळ जबानीपासून घूमजाव केले. वांद्रेच्या घटनेप्रसंगी सलमान नव्हे, तर आपण गाडी चालवत होतो, असेही त्याचा गेली चोवीस वर्षे सेवेत असलेला वाहनचालक अशोक सिंग याने न्यायालयाला सांगितले.
सलीम-जावेदच्या एखाद्या रोमांचकारी चित्रपटाच्या पटकथेसारखा हा खटलाही अनेक वळणे घेत होता. मात्र, सरकारी पक्षाने सलमान खानच्या विरोधात इतके सबळ पुरावे सादर केले होते की, शिक्षा सुनावली जाण्यापासून सलमानची सुटका नव्हतीच! प्रसारमाध्यमांनीही या खटल्याचे प्रकरण सातत्याने लावून धरले. सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा बुधवारी सुनावली व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा हंगामी जामीन मंजूर केला. मात्र, अनेक वर्षांनी लागलेला हा निकाल ‘देर से आए दुरुस्त आए’ अशा धाटणीचा आहे. सलमान खानचा खटला जसा वर्षानुवर्षे रेंगाळला तसेच लाखो खटले देशातील न्यायालयांत तुंबून असतात. या खटल्यांचे निकाल जितक्या लवकर लागतील तेवढीच त्याद्वारे सुनावण्यात येणा-या शिक्षेची परिणामकारकता अधिक असेल. सलमानचा वाहनचालक अशोक सिंगने त्याचे पाप आपल्या माथी घेण्याचा केलेला प्रयत्न ही एक प्रकारे खोटी साक्ष देण्याचा प्रकार असू शकतो. त्याची नीट छाननी करून आवश्यकता वाटल्यास भविष्यात अशोक सिंगवरही कारवाई होणे आवश्यक आहे.
वांद्रे प्रकरणात सलमान खान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, अशी साक्ष त्याचा पोलिस अंगरक्षक रवींद्र पाटील याने न्यायालयासमोर दिली होती. मात्र, २००७ मध्ये रवींद्रचा मृत्यू झाल्याने या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षी-पुराव्याची बाजू लंगडी पडते की काय, अशी भीती वाटू लागली होती. दुर्घटनेनंतर मद्यधुंद सलमानच्या करण्यात आलेल्या रक्तचाचणीमध्ये अल्कोहोलचा अंश सापडला होता. ही रक्तचाचणीही चुकीची ठरवण्याचा प्रयत्न सलमानच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. मात्र, न्यायदेवता या कशालाही बधली नाही!
वांद्रे येथे गाडीखाली एकाला चिरडल्यामुळे २००२ मध्ये काही दिवसांसाठी अटक केलेल्या सलमान खानची त्यानंतर जामिनावर मुक्तता झाली होती. ते अगदी या खटल्याचा निकाल येईपर्यंत त्याचे सगळे बरे चालले होते. त्याची भूमिका असलेले, त्याने निर्मिलेले चित्रपट गाजत होते. कोट्यवधी रुपयांचा गल्ला गोळा होत होता.
प्रेक्षक त्यांच्या ‘सल्लूभाई'वर फिदा आहेत. मात्र, हे प्रेम आंधळे आहे. सलमान खान कितीही लोकप्रिय असला तरी त्याच्या गुन्हेगारी वर्तनाचे गांभीर्य त्यामुळे अजिबात कमी होत नाही. त्यामुळे एखाद्या सामान्य माणसाला जो न्याय, तोच सलमान खानलाही लावला गेला पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असला तरी काही जण कायद्याहून अधिक मोठे होऊ पाहतात. त्यासाठी नाना उचापती करतात. सत्र न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावून अशा प्रवृत्तींचे हवेत उडणारे विमान जमिनीवर आणून ठेवले आहे. सलमान खान किती सहृदयी आहे याची हृदयाला पाझर फुटतील अशी वर्णने अधूनमधून येत होती. सलमान खानने आपल्या बीइंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेमार्फत काही समाजकार्य सुरू केले होते. गंभीर गुन्हे केल्याबद्दल त्या वर्तनाची वाटलेली लाज व त्यातून झालेली उपरती या दृष्टीने जरी सलमान खानच्या समाजसेवेकडे बघितले तरी त्याची एक गुन्हेगार म्हणून असलेली काळी प्रतिमा मनाच्या पटलावरून हटत नाही. वांद्रे प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या सलमान खानवर अजून दोन खटल्यांची टांगती तलवार आहेच.
१९९८ च्या आॅक्टोबर महिन्यामध्ये सलमानसह काही तारे-तारकांनी राजस्थानमध्ये काळविटांची शिकार केली होती. तीही बेकायदेशीररीत्या बाळगलेल्या शस्त्रांनी...या प्रकरणातही सलमान खानच्या विरोधात भक्कम पुरावे असून त्यांचे निकाल त्याच्या अडचणींत भरच घालणार आहेत. सलमानला सत्र न्यायालयाने बुधवारी शिक्षा सुनावताच बाॅलीवूडमधील भल्याभल्यांना गहिवरून आले; पण यामागे स्वार्थी व्यावसायिक हेतूच लपलेला आहे! सलमान सध्या ‘बजरंगी भाईजान’, ‘प्रेम रतन धन पायो’ असे दोन चित्रपट करत असून त्यामध्ये निर्मात्यांची सुमारे २५० कोटींची गुंतवणूक आहे. सलमान तुरुंगवासात गेल्यानंतर या चित्रपटांचे भविष्य अधांतरी असणार हे निर्मात्यांनाही माहिती होते. असे असूनही चित्रपटसृष्टीतील मंडळींनी आपल्या संभाव्य नुकसानीची जी आपमतलबी ओरड सुरू केली तिच्याकडे कोणीही लक्ष देण्याचे कारण नाही. ‘हम करे सो कायदा’ अशा धाटणीने वागणा-या दबंग सलमानला चित्रपट व जीवनपट यामध्ये वास्तवाचे भान उरले नाही. बेदरकार वर्तनाचे फळ कठोर शिक्षा हेच असते. ते सलमानला मिळाले आहे!