आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहारे आणणारी बांधिलकी ( अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान याला उच्च न्यायालयात जामीन मिळणार यात शंका नव्हती. सत्र न्यायालयाने दिलेली सजा सात वर्षांहून कमी असल्यामुळे त्याला जामीन मिळणे क्रमप्राप्त होते. सलमान खानचे अपील आता जुलैमध्ये सुनावणीस येईल. ते किती काळ चालेल हे सांगता येत नाही. त्यापुढे सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढण्याची मोकळीक सलमान खान याला असेल. म्हणजेच हा खटला आणखी काही वर्षे सुरू राहील व त्यानंतरच सलमान खान दोषी की निर्दोष हे सिद्ध होईल. हे सर्व भारतीय न्यायप्रक्रियेला अनुसरून होत असल्याने त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. जनतेला आश्चर्य वाटत आहे ते एक-दोन दिवसांचा तुरुंगवास टाळण्यासाठी ‘दबंग’ सलमानने केलेल्या धडपडीचे व ती धडपड सफल झाल्याचे. अशी सफलता सामान्य माणसाच्या वाट्याला येत नाही. हुशार वकिलांमुळे हे जमले की सेलिब्रिटी स्टेटस कामी आले? सलमानच्या वकिलांनी न्यायालयीन डावपेचांची उत्तम आखणी करून त्वरेने त्याची अंमलबजावणी केली हे त्यामागील सूत्र असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटले ते खरे आहे. पण सामान्यांच्या हे अावाक्याबाहेरचे असते. बड्या वकिलांकडून धूर्त सल्ला मिळवण्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे नसतो, माध्यमे त्यांच्यासाठी वेळ काढीत नाहीत. परिणामी तुरुंगात खितपत पडणे त्यांच्या नशिबी येते. म्हणून सलमान खानसारखी वेगवान न्यायप्रक्रिया अशा सामान्यांच्या वाट्याला कधी येणार, हा कळीचा प्रश्न आहे.
मात्र, या खटल्याच्या निमित्ताने गेल्या तीन-चार दिवसांत भारतातील उच्चभ्रूंचे, विशेषत: सेलिब्रिटी तारे-तारकांच्या स्वभावाचे झालेले दर्शन उद्वेग निर्माण करणारे होते. समाजात मिरवणा-या या लोकांची बौद्धिक कुवत आणि अप्पलपोटेपणा उबग आणणारा होता. सलमानला शिक्षा हा समाजातील चांगुलपणावर अन्याय असल्याची ओरड या मंडळींनी सुरू केली. गंगाधर गाडगीळ यांच्या ‘किडलेली माणसे’ या कथेची आठवण यावी अशी दृश्ये दोन दिवस विविध वाहिन्यांवर दिसत होती. सेलिब्रिटी म्हणून सलमानला जादा शिक्षा होऊ नये, असे त्याचे मित्र एका बाजूने म्हणत होते आणि त्याच वेळी त्याने केलेल्या समाजकार्याची यादी देऊन शिक्षा कशाला, असा सवाल करीत होते. सलमानला सामान्य नागरिकाप्रमाणे न्यायालयाने वागवावे, अशी अपेक्षा होती तर त्याने केलेल्या कामाची जाहिरात करण्याचे कारण नव्हते. हा दांभिकपणा होता. अर्थात असल्या दांभिकपणासाठी बॉलीवूड प्रसिद्ध आहे. ‘सत्यमेव जयते’च्या नावाने जाहिरातबाजी करणारा अामिर खान या सलमानच्या भेटीला जाण्यात आघाडीवर होता. सलमानशी असलेल्या मैत्रीचे जाहीर प्रदर्शन करण्याची काय जरूर होती? फोनवरही त्याच्याशी बोलता आले असते. समाजाला शहाणे करण्याची शेखी मिरवणा-या अामिरकडून प्रगल्भ वागणुकीची अपेक्षा होती. अामिरपाठोपाठ बॉलीवूडच्या ता-यांची रीघ लागली. गर्दी जमवून प्रथम जनमानस व त्यामार्फत न्यायालयावर दबाव टाकण्याची खेळी त्यामागे होती. लोकप्रियतेची ढाल पुढे करून आपल्या गुन्हेगारी वागणुकीवर पडदा टाकण्याचे उद्योग केवळ नेतेच नव्हे, तर सेलिब्रिटीही करतात, ही चिंतेची बाब आहे. परदेशातही सेलिब्रिटींवर खटले होतात, त्यांना शिक्षा होते; पण असले ओंगळ प्रदर्शन तेथे होत नाही. सज्जनपणाची कितीही कामे केली असली तरी दोषी सिद्ध झाल्यावर गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणूनच वागणूक मिळते. प्रगल्भ समाजाचे ते एक लक्षण आहे. याउलट सलमानकडे लागलेली रीघ हे बॉलीवूडमधील बांधिलकीचे उदाहरण असल्याचा डांगोरा पिटण्यात आला. असली गुन्हेगारी बांधिलकी अंगावर शहारे आणते. असल्या बांधिलकीची बाधा समाजाला होत असेल तर भारतीय लोकशाहीचे लक्षण ठीक नाही. सलमान खरोखर सज्जन असता तर झालेली चूक त्याने पहिल्या टप्प्यातच कबूल केली असती व मिळालेली शिक्षा मुकाट भोगली असती. जेमतेम तीन वर्षांची कोठडी त्याला झाली असती. सलमानने तसे केले नाही. उलट स्वत:ला वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी आपल्या ड्रायव्हरला पुढे केले. हे कोणत्या सज्जनपणात बसते? जखमींच्या नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात अडकली आहे हे कळल्यावर अन्य मार्गाने जखमींना मदत करणे सलमानला शक्य होते. ते त्याने का केले नाही? उलट अपघातात जखमी व मृत झालेल्यांची साधी चौकशीही त्याने कधी केली नाही. वेळ आली की आपण सर्व जण बचावासाठी नाना प्रयत्न करतो, मग सलमानचे काय चुकले, असाही प्रश्न केला जाईल. हा प्रश्न फसवा आहे. एक तर बहुसंख्य नागरिकांना बचावाची अशी संधी वा ताकद नसते आणि अन्य सामान्यांप्रमाणेच सलमान वागत असेल तर त्याच्या तथाकथित दातृत्वाची जाहिरात करीत तो ‘लाखात एक’ असल्याचे ढोल पिटता कशाला? शिक्षा टाळण्याचा आटापिटा पाहता सलमानच्या दबंगगिरीचे वासे पोकळ असल्याचे सिद्ध झाले. तरीही त्याच्यावर बहुसंख्य फिदा असावेत, हे देशाचे दुर्दैव.