आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन मिनिटांचा बडगा? ( अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूंच्या घरात दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी आरोग्याला अपायकारक असल्याच्या बातम्या ऐकून कोणालाही धक्का बसू शकतो. मात्र, लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सरकारने मॅगीवर केलेल्या कारवाईचे समर्थन करण्यापासून ते "अशा कारवाईमध्ये केवळ मॅगीच का? अन्य फास्ट फूड, दुग्धजन्य, हलवायाचे खाद्यपदार्थ का नाहीत?' असे प्रश्न विचारणा-यांची संख्याही काही कमी नाही. लष्कराने मॅगीवर तूर्त बंदी घातली असली तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये मॅगीवरील बंदीबाबत एकसूत्रता नाही. गोव्याने बंदी घातलेली नाही. महाराष्ट्रात यावर अद्याप एकमत झालेले नाही. उत्तर प्रदेश वगळता हिमालय रांगांमध्ये वसलेल्या जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यापासून पूर्वेकडील राज्यांनी त्यावर बंदी आणलेली नाही. दक्षिणेतही असेच चित्र आहे. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश व श्रीलंकेमध्येही हा ब्रँड लोकप्रिय आहे. पण या देशांमध्ये या पदार्थाविषयी वाद निर्माण झालेला नाही. हे प्रकरण अजून काही दिवस प्रसारमाध्यमांतून चघळले जाईल. बड्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या व सरकार यामधील नवा संघर्षही त्या निमित्ताने पाहायला मिळेल. कदाचित न्यायालयीन लढायाही होतील. त्यातून लोकांच्या आरोग्यासाठी सरकारी यंत्रणा झटत आहेत, असे चित्रही दिसेल; पण त्यावरून ग्राहकांचा कंपनी किंवा सरकारी यंत्रणांच्या कारभारावर विश्वास बसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

गेली तीन दशके मॅगी देशात विकली जात आहे; पण हा पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक आहे, असा वाद आजपर्यंत एकदाही उफाळून आलेला नव्हता. ८० च्या दशकात देशात फास्ट फूडचे आगमन झाले, तेव्हापासून झटपट नूडल्सचे अनेक प्रकार बाजारात येऊन गेले; पण मॅगी नावाच्या ब्रँडला आजपर्यंत धक्का बसलेला नाही. आजची नोकरी व करिअर करणारी आधुनिक स्त्रीही आपल्या लहान मुलाला वेळप्रसंगी झटपट मॅगीच करून देते. जे पट्टीचे खवय्ये आहेत त्यांनी मॅगीचे भारतीयीकरण केव्हाच केले आहे. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा हे आघाडीचे बॉलीवूड स्टार या पदार्थाची जाहिरात करतात, यावरून मॅगी या ब्रँडचे भारतीय जनमानसावरचे गारूड किती मोठे आहे, हे लक्षात यायला हरकत नाही. मॅगी आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य व सवयीचा पदार्थ झाला आहे, हे स्वीकारायला हवे. एकंदरीत हा पदार्थ उद्या आपल्या खाद्यसंस्कृतीतून हद्दपार झाल्यास हळहळणा-यांची संख्या कोट्यवधींच्या घरात असेल. जगाची खाद्यबाजारपेठ अधिक विस्तारित करणारा स्वित्झर्लंड देशातल्या नेस्ले कंपनीचा हा ब्रँड आज १३० देशांत खपत असून भारतात मॅगीची उलाढाल नेस्ले कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ३० टक्क्यांच्या आसपास आहे. यावरून मॅगीची बाजारपेठ कशी देशव्यापी पसरलेली आहे, हे लक्षात येते.
केंद्र सरकारने मॅगीतील अपायकारक घटकांच्या कारणावरून नेस्लेसारख्या बड्या कॉर्पोरेट कंपनीला शिंगावर घेतले असले तरी या घटनेमुळे फास्ट फूड विक्री करणा-या अनेक बड्या कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्याचा काळ असा आहे की, खाद्यपदार्थाच्या एका जरी पॅकेटमधील पदार्थ खराब निघाल्यास त्यावर सोशल मीडियातून गदारोळ सहजपणे पसरू शकतो. मध्यंतरी कॅडबरीत अळ्या सापडल्या होत्या. मॅकडोनाल्ड, पेप्सी, कोक या कंपन्यांच्या उत्पादनातही त्रुटी आढळल्या होत्या. पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग अशा पाश्चात्त्य खाद्यपदार्थांतही उणिवा आढळल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण त्या वेळी सरकारने अशी व्यापक कारवाई हाती घेतली नव्हती. देशातली "रेडी टू ईट' बाजारपेठ झपाट्याने वाढत असताना खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणा-या सरकारी यंत्रणा अपु-या आहेत, याकडे सरकारचे लक्ष नाही. मेंदूवर सतत आदळणा-या आकर्षक जाहिराती, रंगीबेरंगी वेष्टनं व सेलिब्रेटींच्या जाहिरातबाजीला भुलून सारासार विचार न करता वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक लक्षावधी आहेत, पण अशा वस्तूंना सरकार मंजुरी कोणत्या निकषावर देते येथपासून त्या विक्रीस येतात कशा, याबाबत कसलेच विश्वासार्ह चित्र ग्राहकापर्यंत पोहोचत नाही. भारतीय बाजारपेठेत पाश्चात्त्य पदार्थ विक्रीस येत असल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय मानके लावावीत की देशी मानके लावावीत, हा वादाचा विषय असतो. पण त्यावर सर्वमान्य तोडगा दिसत नाही.
परदेशी खाद्यपदार्थ भारतीय जीवनशैलीला उपकारक ठरतील का, हाही वेगळ्या चर्चेचा विषय आहे. ज्या आयुर्वेदाची बाजारपेठ देशभर पसरली आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते, त्या आयुर्वेद औषधांमध्येही शरीराला अपायकारक असणारे अनेक घटक असतात, पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वस्तूंचे अनाहूतपणे सेवन होत असते. मॅगीवरील कारवाईचा निकाल काहीही लागो; पण या निमित्ताने धडक कारवाईचा बडगा अन्य देशी-परदेशी वस्तूंवरही उगारल्यास सर्वसामान्यांना हायसे वाटेल. नाही तर अज्ञानात सुख मानणा-यांची संख्या कमी नसते.