आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅगीची मिजास ( अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या देशाची बाजारपेठ व्यापारासाठी मिळाली की आपल्याला कोणी रोखू शकत नाही, असे वर्तन बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे असते. आपला ब्रँड विश्वव्यापी असल्याने, कोट्यवधी ग्राहकांशी नाते जुळल्याने (क्रेझ असल्याने) वा ग्राहकांपुढे अन्य पर्याय नसल्यामुळे, सर्वच सरकारी यंत्रणांमध्ये पाळेमुळे खोलवर रुतलेली असल्याने कोणाच्याही दबावापुढे आपण सहजपणे झुकू शकत नाही, अशा मिजाशीत या कंपन्या असतात. नेस्ले याला अपवाद नाही. गेले दोन आठवडे मॅगीमधील अपायकारक घटकांवरून देशभरात आंदोलने, प्रसारमाध्यमांतील चर्चा, बंदी-चाचण्या यांना पेव फुटल्यानंतरही नेस्लेचे अधिकारी सोयीस्कररीत्या गप्प बसले होते. उलट हे प्रकरण इतके चिघळत गेले की ज्या मॅगीची जाहिरात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा या बॉलीवूड कलाकारांनी केली होती, त्यांच्यावरच मॅगीविषयी मतप्रदर्शन करण्यासाठी सातत्याने दबाव येत होता. अमिताभ बच्चन यांनी आपली भूमिका मांडली; पण नेस्लेचे पदाधिकारी मात्र ग्राहकांपुढे काय भूमिका घेऊन जायचे, याबाबत वॉररूमध्ये खल करत होते.
अखेर मॅगी बंदीचे प्रकरण थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्याने तातडीने नेस्लेचे पदाधिकारी प्रसारमाध्यमांपुढे उगवले. नेस्लेने देशभरातील बाजारातील मॅगीची पाकिटे परत घेण्याचा निर्णय घेतला आणि आता नेस्लेचे ग्लोबल सीईअो पॉल बल्क यांनी ‘मॅगी खाण्यास अपायकारक नाही व त्यामध्ये शिसे किंवा अजिनामोटोसारखे पदार्थ नाहीत,’ असा खुलासा केला. मॅगीमधील अन्नघटक व त्यांचे प्रमाणीकरण हे जगभरात एकच आहे, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडात विकली जाणारी मॅगी व भारतात विकली जाणारी मॅगी एकच आहे, असा त्यांच्या खुलाशाचा अर्थ होतो. नेस्लेच्या दाव्यात किती तथ्य आहे व सरकारी प्रयोगशाळांमधील चाचण्या सदोष होत्या का, यावर वाद उफाळू शकेल. पण या एकंदरीत प्रकरणात नेस्लेसारख्या बड्या ब्रँडकडून जी त्वरित कारवाईची अपेक्षा होती, ती दिसून आली नाही.
युरोप, अमेरिकेमध्ये अशा घटना घडल्यास तेथे तत्काळ पदार्थ, वस्तू बाजारपेठेतून मागे घेतल्या जातात. तशी कृती नेस्ले भारतात करू शकली असती. पण नेस्लेने भारतीय ग्राहकांना गृहीत धरले. कारण नेस्लेची उत्पादने गेली तीन-चार दशके भारतीय ग्राहकांना सवयीची झाली आहेत. मॅगीच्या चाचण्यांचे प्रत्येक राज्याने वेगवेगळे निर्णय दिल्याने व या गोंधळात ग्राहकच संभ्रमित झाल्याने हा वाद जसा एकाएकी वर आला तसाच तो वेगाने थंड होईल, असे कंपनीला वाटले असावे. पण प्रसारमाध्यमांनी हा विषय तडीस नेण्याचे ठरवल्याने मॅगीची मिजास उतरली. नेस्लेने या प्रकरणी केंद्राच्या प्रयोगशाळेकडून जो निर्णय येईल तो अंतिम असेल, अशी भूमिका घेतली असती तरी कंपनीची विश्वासार्हता अधिक वाढली असती. पण तसे काहीच झाले नाही.

या प्रकरणावरून सरकारी यंत्रणा व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्तन लक्षात आले. जोपर्यंत ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत नाहीत, प्रसारमाध्यमे असे विषय लावून धरत नाहीत, तोपर्यंत या यंत्रणा सुस्त असतात. गेल्या तीन दशकांत देशात खाद्य बाजारपेठ इतकी वेगाने पसरलेली आहे की, खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करण्यासाठी केंद्र किंवा राज्यस्तरावर नव्हे, तर देशातील प्रत्येक मोठ्या शहरांमध्येही प्रयोगशाळा उभ्या करण्याची गरज आहे. नेस्लेला बडगा दाखवला, या आनंदात राहून चालणार नाही. कारण मॅगीसारख्या "रेडी टू ईट' प्रकारातले अनेक खाद्यपदार्थ आज सर्रास खेड्यापाड्यांपर्यंत पसरत चालले आहेत. या पदार्थांचा ग्राहकही आबालवृद्ध असा व्यापक आहे. जे ब्रँडेड उत्पादन बाजारात उपलब्ध असते त्याची नक्कलही सहज मिळत असते. गेल्या काही वर्षांत अनेक मूळ चायनीज पदार्थ सर्रास देशी रूप घेऊन विकले जात आहेत. त्यामध्ये काय अस्सल आहे वा काय नकली आहे याबाबत ग्राहक अनभिज्ञ असतो. दुग्धजन्य पदार्थ, मसाले, अन्नधान्य, सॉस यामध्ये होणारी भेसळही चिंताजनकच आहे. भाज्या-फळांची बाजारपेठही विविध रासायनिक औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे केव्हाच दूषित झालेली आहे. हे आसपासचे वास्तव दिसत असूनही अशा भेसळीबाबत आपला समाजच नव्हे, तर सर्वच यंत्रणा दुर्लक्ष करत असतात. आरोग्याची काळजी ही ग्राहकांची जबाबदारी आहे. आम्ही कोणताही पदार्थ तुमच्या माथी मारू, असेच वर्तन अनेक कंपन्यांचे असते.
खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर आरोग्यासंदर्भात सूचना लिहिल्या की सरकारने आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे पाळली, अशी सहज भूमिका कंपन्यांची असते. पण प्रत्यक्षात संबंधित पदार्थ सर्व चाचण्या पार करून गेला आहे की नाही, याची खात्री ग्राहकाला नसते. खाद्यपदार्थात भेसळ दिसल्यास त्याची दाद कोणाकडे मागायची, याचे साधे प्रबोधनही खाद्यपाकिटांवर नसते. एकंदरीत दोन मिनिटांत तयार होणा-या मॅगीने आपणा सर्वांनाच जागे केले आहे. ती जागरूकता ठेवणे हेच महत्त्वाचे आहे.