आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनही विळख्यात ? ( अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी विकसित म्हटल्या जाणा-या केवळ एक कोटी लोकसंख्येच्या ग्रीसमध्ये गंभीर आर्थिक पेच निर्माण झाला तेव्हा सारे जग हादरून गेले. कारण संपूर्ण जग आता आर्थिक व्यवहारांनी असे काही जोडले गेले आहे की जगाच्या एका टोकाला काहीतरी होते आणि त्याचे पडसाद जगभर उमटतात. जगातील दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या (१३६ कोटी) असलेल्या अक्राळविक्राळ चीनमध्ये गेले काही दिवस जे घडते आहे, त्यामुळे जगात धरणीकंप होतो आहे, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. असा आणखी एक धरणीकंप बुधवारी चीनच्या ड्रॅगनने घडवून आणला आहे.

तेथील शांघाय शेअर बाजार तब्बल ८ टक्क्यांनी कोसळला. नोव्हेंबर २०१४ पासून ११० टक्के वाढ नोंदवणारा शेअर बाजार गेले काही दिवस दररोज कोसळतो आहे. ज्या भांडवली व्यवस्थेत जग आज व्यवहार करते आहे, तीत शेअर बाजार हे त्या देशाचे नाक मानले जाते. स्वत:ला कम्युनिस्ट म्हणवून घेणारा चीनही त्याला अपवाद नाही. शेअर बाजार सारखा कोसळतो आहे, हे लक्षात आल्यावर चीन सरकारने त्याला सावरण्याचे प्रयत्न सुरू केले, तरीही त्याने दाद दिली नाही. एवढेच नव्हे तर ४३ टक्के बाजारमूल्य असलेल्या १२४९ कंपन्यांवर आपले बाजारातील व्यवहार थांबवण्याची नामुष्की आली. शेअर बाजारात नव्याने पैसा यावा यासाठी तेथील विमा कंपन्या आता ५ ऐवजी १० टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवू शकतील, असा फतवा सरकारने काढला आहे. मात्र चीनच्या जनतेत आज इतकी घबराट पसरली आहे की चीनच्या बाजाराला २००८ नंतरची सर्वात मोठी घसरण पाहावी लागली. अगदी दीड महिन्यापूर्वी असलेल्या पातळीचा विचार करावयाचा तर चीनचा बाजार ३० टक्क्यांनी खाली आला आहे. म्हणजे ३.२ ट्रिलियन डॉलरने तो गरीब झाला आहे. भारताशी तुलना करायची तर ही रक्कम म्हणजे भारतीय बाजाराच्या एकूण मूल्याच्या दुप्पट इतकी प्रचंड आहे ! त्यामुळेच जगाचे गेले एक दशकभर आर्थिक इंजिन झालेल्या चीनमधील ही पडझड जगात पसरण्यास वेळ लागला नाही. पडझडीचे हे लोण भारतासह जगातील सर्वच शेअर बाजारांत पोहोचले. ग्रीसची दिवाळखोरी नजरेआड करणारा भारतीय शेअर बाजार ४८३.९७ अंशांनी कोसळला, तर जपान, हाँगकाँग अशा सर्वच आशियाई बाजारांनीही मान टाकली. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावरील आर्थिक क्षेत्रात काहीशी खळबळ माजणे स्वाभाविकच होते. उद्भवलेल्या या परिस्थितीचा अर्थतज्ज्ञ आता अदमास घेत आहेत.

चिनी ड्रॅगनला हा विळखा आणखी किती काळ राहील आणि त्याचे जगावर किती विपरीत परिणाम होतील, हे आज कोणीच सांगू शकत नाही. चीनची अर्थव्यवस्था उत्पादनावर आधारित आहे. त्यामुळे भांडवल बाजारातील चढउताराचा तिच्यावर मोठा परिणाम होणार नाही, अशी मांडणी काही तज्ज्ञ करतात. पण ते हे विसरतात की गेले काही दिवस तांबे, कोळसा, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किमती खाली येत आहेत. त्याचे कारण चीनमधील मागणी सातत्याने कमी होते आहे. २००७ ला विक्रमी १४ टक्के असलेला चीनचा विकासदर ७ टक्क्यांवर घसरला आहे. इंजिनाचाच वेग कमी झाला तर डबे कसे पळणार? चीनची जागा आता भारताने घ्यावी अशी जगाची इच्छा आहे. त्यामुळेच सा-या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे, असे सातत्याने म्हटले जाते आणि त्यात तथ्यही आहे. भारतातील मध्यमवर्ग आता ३० कोटींच्या घरात गेला असून दुसरे ३० कोटी मध्यमवर्गात येण्यास आतुर झाले आहेत. त्यांची क्रयशक्ती वाढली की भारत हाच जगाचे इंजिन होणार हे ठरलेले आहे. पण त्यासाठी आर्थिक सुधारणांना वेग देणे ही अट आहे. त्याविषयीची सहमती भारतात होऊ शकली तर या विळख्यातून सुटून पुढे जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

भांडवली बाजाराच्या चढउतारांवर देशाच्या आर्थिक स्थितीविषयी बोलणे, हा एकेकाळी थट्टेचा विषय होता. मात्र आज जगात या बाजारांत इतका पैसा खेळतो आहे की त्याला कोणीच नाकारू शकत नाही. चीनच्या कंपन्यांनाही त्याच मार्गाने भांडवल उभारणी करावी लागली आणि भांडवली बाजारात खेळणा-या पैशांवर चीनमध्येही एक वर्ग तयार झाला, ज्याने मागणी वाढवून अर्थव्यवस्थेला बळ दिले. भांडवली बाजार अखेर सेवा आणि वस्तूंच्या बाजाराकडे वळला तरच आभासीकडून वास्तव बाजारमूल्याकडे वळणे शक्य आहे. नाही तर जग जागतिक महामंदीकडे चालल्याची भाकिते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अनेक तज्ज्ञ करतच आहेत. भारत, चीन आणि सा-या जगाला आज नाही रे वर्गाची क्रयशक्ती वाढवण्याची गरज आहे. त्यासाठीचे प्रयत्न न करता अशीच आभासी श्रीमंती जग भोगत राहिले तर मंदीचे भोग अपरिहार्य आहेत. आधी ग्रीस, आता चीन आणि त्याच रांगेत असलेल्या अनेक देशांची दिशा त्यासाठी बदलावी लागेल. चीनचा ड्रॅगनही या दुष्टचक्रात सापडू शकतो, हा जगाला पुढील दिशा ठरवण्यासाठीचा धडा ठरू शकतो!