आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांची वंदावी पाऊले ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा' असा अपार भक्तिभाव मनात बाळगून आषाढी यात्रेनिमित्त आपले परमदैवत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारक-यांची पाऊले पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असे ज्याचे वर्णन संतमहंतांनी केले आहे. त्या विठ्ठलाचे चरण हे कोणत्याही वारक-यासाठी सर्वोच्च आत्मिक समाधान, संतोष देणारे पवित्र स्थान आहे. आज आषाढी एकादशीच्या दिवशी तो सावळा विठुराय व रखुमाईच्या चरणी आपला माथा टेकून वारकरी धन्य होणार आहेत. ज्यांना साष्टांग प्रणिपात घालावा असे पाय समाजात आजकाल फारसे दिसत नाहीत असे म्हटले जाते. मात्र अशी नकारात्मक विधाने करणा-यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या व विधायक कामे करणा-या लोकांना धुंडाळले तर त्यांना या माणसांतही परमेश्वराचे दर्शन होऊ शकेल. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे संतवचन सार्थ ठरविणारी मोजकी का होईना पण आदर्श माणसे आपल्यातच आहेत. ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी अखंड जपतप करणारे बरेचजण असतात. पण ब-याचदा ते कर्मकांड ठरते. या जगात देव आहे की नाही हा बौद्धिक चिकित्सेचा व स्वतंत्रपणे मांडण्याजोगा विषय आहे. ज्या साधकांना कायम मोक्ष तसेच स्वर्गप्राप्तीची आस लागलेली असते त्यांचे आजच्या ऐहिक, भौतिक जगाकडे अंमळ दुर्लक्षच होते याचे अनेक दाखले संतसाहित्यात पाहायला मिळतात. स्वर्ग वगैरे कल्पना जरा बाजूला ठेवू. पण आपण जे रोजचे जीवन जगतो ते सुखकर होण्यासाठी, निसर्गाने माणसाला जे भरभरून दान दिले आहे ते सगळेच न ओरबाडता पुढील पिढ्यांपर्यंतही संक्रमित व्हावे म्हणून चांगले कार्य करणे हाही भक्तिभावाचाच एक अाविष्कार आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होणा-यांपैकी लाखो वारक-यांनी पर्यावरणरक्षणासाठी जागोजागी उत्तम उपक्रम हाती घेतले होते. पाण्याचा सगळ्यांनीच काटेकोरपणे वापर करावा यासाठी जनजागृती मोहिमाही वारीच्या काळात राबविण्यात आल्या. वारकरी पंथाने समाजाला जोडण्याचे काम नेहमीच केलेले आहे. त्याचेही प्रत्यंतरही यंदा दिसून आले.
भीमा नदीचे पाणी आणखी प्रदूषित होऊ नये म्हणून चंद्रभागेच्या पात्रामध्ये वारक-यांच्या राहुट्या उभारू न देण्यावर कज्जेदलालीही झाली. मात्र स्वच्छतेसंदर्भात पालिका, राज्य सरकारच्या यंत्रणेने कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व दक्षता घ्यावी याबद्दलचे आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने अखेर राहुट्या उभारण्यासाठी परवानगी दिली. या सगळ्याचे चांगले फलित हाती आले ते म्हणजे महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित होऊ नयेत म्हणून सामान्यजन, सरकार सजग होत चालले आहेत हे प्रकर्षाने जाणवले. वारी असो वा अन्य कोणताही उत्सव आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा हा नेहमीच दुय्यम मानला जातो. पंढरपूरमध्ये मलनि:सारण व सांडपाणी निच-याची व्यवस्था अजूनही पुरेशी कार्यक्षम नसावी हे लज्जास्पद आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कायद्याने बंदी असलेली हाताने मानवी मैला उचलण्याची प्रथा आजही पंढरपुरात थोड्याफार प्रमाणात का होईना टिकून आहे. अशा प्रकारचे सामाजिक कलंक नष्ट करावे हेच तर अखिल संतसाहित्याचे सांगणे आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी वारक-यांची पावले ज्या अावेगाने पंढरीच्या दिशेने पडत असतात तशीच समाजमनाची पावलेदेखील सुधारणा घडविण्याच्या दृष्टीने वेगाने पडायला हवीत.

अशाच प्रेरणादायी व्यक्तींपैकी एक म्हणजे वेंकटरामन रामकृष्णन हे शास्त्रज्ञ. मोलेक्युअर बायोलॉजिस्ट असलेल्या रामकृष्णन यांना त्यांच्या योगदानासाठी २००९ मध्ये रसायनशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जगद्विख्यात रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे ते येत्या डिसेंबर महिन्यात स्वीकारणार आहेत. केंब्रिज विद्यापीठातील लॅबोरेटरी ऑफ मोलेक्युलर बायॉलॉजीमध्ये ज्येष्ठ संशोधक म्हणून सध्या कार्यरत असणारे रामकृष्णन पर्यावरण रक्षणाबाबत केवळ भाषणे देऊन थांबले नाहीत तर त्यांनी स्वत:चे आचरणही त्या अनुषंगानेच राखले आहे. आपले घर ते कामाचे ठिकाण हा प्रवास ते सायकलनेच करतात. खासगी गाडी न बाळगता सार्वजनिक वाहतूक सेवासाधनांचा ते आपल्या प्रवासासाठी अग्रक्रमाने वापर करतात. पूर्वी मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चेंबूर हा प्रवास ते लोकल गाडीच्या दुस-या दर्जाच्या डब्यामधूनच आवर्जून करत असत. आयुष्यात प्रचंड यश मिळवूनही इतक्या साधेपणाने आयुष्य व्यतित करणारी माणसे पाहिली की, संतमहंतांनी मनुष्यकल्याणासाठी सांगितलेले अध्यात्म ख-या अर्थाने याच माणसांना कळले आहे हे प्रकर्षाने जाणवते. पर्यावरणरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाय काय करावे याचे अचूक मार्गदर्शन रामकृष्णन रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदावरून भविष्यात करतीलच. मात्र अशी समाजजागृती करणा-या आदर्श व्यक्तींचे विचार प्रमाण मानून त्यानुसार आपले वर्तन राखणे हाच अाधुनिक जगातला खरा भक्तिमार्ग आहे. त्यातील वारक-यांची संख्याही अगणित वाढणे हे समाजहितासाठी आवश्यक आहे.