आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फुल्लिंग विझले ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतभूमीत सुप्तपणे वसत असलेल्या अफाट क्षमतांवर मनापासून श्रद्धा असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नावाचे स्फुल्लिंग अचानक विझून गेले आहे. भूतकाळाचे ओझे झुगारून देऊन भविष्याची शास्त्रीय स्वप्ने पाहण्याची सवय या परंपराप्रिय देशाला लागावी यासाठी या शास्त्रज्ञाने अथक प्रयत्न केले. राष्ट्रपती म्हणून त्यांचे सर्वात मोठे कार्य कोणते असेल तर ते हेच. देशाला, विशेषत: तरुणांना नव्या दिशेने विचार करायला लावायचे अद्भुत सामर्थ्य या माणसाकडे होते. हे सामर्थ्य आले ते विज्ञानावरील श्रद्धेमुळे आणि तळमळीमुळे. कलाम यांची तळमळ लोकांना आकृष्ट करीत होती. त्यांच्या प्रेरणास्रोतामागील ऊर्जा स्तिमित करणारी होती. झेप घेण्याची अनावर आकांक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत प्रगट होत असे. पण ही आकांक्षा व्यक्तिगत नव्हती. किंबहुना कलाम यांच्यासाठी कोणतीच बाब व्यक्तिगत नव्हती. जे काही होते ते सर्व भारतभूचे होते. मातृभूमीला प्रगतिपथावर कसे नेता येईल हाच विचार त्यांचा प्रत्येक श्वास करीत होता. महासत्ता बनणे भारताला सहज शक्य आहे, फक्त विचारांची दिशा बदलली पाहिजे, असे त्यांना वाटत असे. महासत्ता हे त्यांच्यासाठी दिवास्वप्न नव्हते. महासत्तेपर्यंत जाण्यासाठी लागणा-या पाय-या त्यांना स्पष्टपणे दिसत होत्या. त्या त्यांनी ग्रंथबद्धही करून ठेवल्या. लहानसहान समस्यांवर उत्तरे शोधण्यात त्यांना कमीपणा वाटत नव्हता. समस्या पाहताच निराश होणारा हा माणूस नव्हता, तर समस्यांवर तोडगा शोधण्याचे आव्हान त्यांना सतत नवी ऊर्जा मिळवून देत असे. सामर्थ्यशाली भारत हे त्यांचे स्वप्न होते. जगाला सामर्थ्याची भाषा कळते, असे ते म्हणत आणि मातृभूमीला ते सामर्थ्य विज्ञान व तंत्रज्ञानातून प्राप्त व्हावे म्हणून अथक प्रयत्न करीत. त्यांच्या स्वप्नांना कल्पनांचा नव्हे, तर शास्त्राचा पाया होता व हेच त्यांचे वेगळेपण होते.

‘पीपल्स प्रेसिडेंट’ असे त्यांचे वर्णन सर्व जण करीत आहेत. कलामांइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही राष्ट्रपतीच्या वाट्याला आली नसेल. समाजातील लहानथोर सर्वांपर्यंत सहज पोहोचण्याची किमया त्यांच्या स्वभावात होती. खरे तर शास्त्रज्ञ हे समाजापासून फटकून वागणारे असतात. आपल्या विषयात मग्न असतात. तथापि, वर म्हटल्याप्रमाणे ‘स्व’चा विलोप झालेल्या कलामांसारख्या व्यक्ती या सहजच समाजात मिसळू शकतात. राष्ट्रपतिपदाची झूल त्यांनी उतरवली नसली तरी मिरवलीही नाही. या न मिरवण्यामध्ये नाटकीपणाही नव्हता. अंतर्बाह्य साधेपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. तो त्यांच्या प्रसन्न चेह-यावर प्रतीत होत असे. शास्त्रज्ञाला आवश्यक असणा-या अमाप कुतूहलाने भरलेल्या त्यांच्या डोळ्यांमध्ये मिश्किलीचीही झाक होती. निरागसता हा त्या डोळ्यांचा प्राण होता. म्हणूनच ते मुलांमध्ये सहज मिसळत आणि मुलेही या आजोबांवर खुश असत. त्यांचा स्वभावधर्मच बालकासारखा होता, पण हे बालक ज्ञानाने प्रगल्भ होते. पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षा ज्ञानाचा अहंकार फार मोठा असतो. या अहंकाराचा वारा त्यांना कधीही लागला नाही. ते जातिवंत अभ्यासक होते. अभ्यासामुळे त्यांच्यातील विनय जागृत झाला, अहंकार नव्हे. अहंकाराचा वारा लागलेला नसल्यामुळे राष्ट्रपती भवनातही ‘उपभोगशून्य राष्ट्रपती’ म्हणून ते वावरले. एक बॅग घेऊन राष्ट्रपती भवनात गेलेला हा माणूस तीच बॅग घेऊन पाच वर्षांनंतर बाहेर पडला. खरे तर त्यांना आणखी एक संधी मिळायला हवी होती; पण तितके शहाणपण काँग्रेसी नेत्यांकडे नव्हते. राष्ट्रपती भवन सुटले तरी लोकांसाठी कलाम हे राष्ट्रपतीच राहिले. मतदान घेतले असते तर लोकांनी कलाम यांना तहहयात राष्ट्रपतिपद दिले असते. माजी राष्ट्रपती म्हणून ते अधिकच लोकांच्या जवळ गेले. आपले ज्ञानसत्र त्यांनी सुरू ठेवले. कित्येकदा विद्यमान राष्ट्रपतींपेक्षा कलाम यांचे कार्यक्रम अधिक असत. गरिबीशी झगडून अथक मेहनत घेत त्यांनी शिक्षण पुरे केले असले तरी कष्टाच्या करुण कहाण्या सांगत सहानुभूती मिळवण्याचा वा जात, पंथ, धर्म यांच्या ढाली उभ्या करण्याचा उद्योग त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्याकडेही कुणी या चष्म्यातून पाहिले नाही. राष्ट्रपतिपद सर्वांच्या पलीकडे असावे, अशी अपेक्षा असते. कलाम यांचे व्यक्तिमत्त्वच सर्वांच्या पलीकडे जाणारे आणि म्हणूनच सर्वांना सहजतेने जवळ करणारे होते. यामुळेच पुन्हा संधी मिळाली नाही याची कटुता त्यांच्या मनात नव्हती.
जो निरागसपणा राष्ट्रपतिपद स्वीकारताना होता तोच राष्ट्रपतिपद सोडताना कायम राहिला. कलामांनी कधी अध्यात्म सांगितले नाही, पण त्यांची जीवनशैली अाध्यात्मिक होती. त्यामध्ये लोकांबद्दल कणव होती. शास्त्राचा ध्यास होता. सौंदर्याबद्दल आस्था होती व संगीताचे प्रेम होते. सतारवादक कलामांचे जीवनाशी सूरही उत्तम जमलेले होते. जीवनाशी असे सूर जुळल्यामुळेच हा शास्त्रज्ञ असंख्य जिवांचे स्फुल्लिंग चेतवत राहिला. स्फूर्तिदायी विचारांचे अग्निकुंड आज सायंकाळी स्फूर्ती देतादेताच अचानक निमाले. असा मृत्यू हेही भाग्याचे लक्षण आहे. उपभोगशून्य कर्मयोगी कर्म करीत असतानाच आपल्यातून निघून गेला. हे दु:ख पचविणे कठीण आहे.