आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकडे शेपूट! ( अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची या महिन्यात जी भेट झाली, त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, जेव्हा जेव्हा या दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट होणार असते त्याच्या आगेमागे पाकिस्तानातील दहशतवादी भारतात घुसखोरी करून भीषण रक्तपात घडवतात, असा आजवरचा इतिहास आहे. १९९९ मध्ये नवाझ शरीफ व वाजपेयी यांची भेट झाली त्या वेळी दुस-या बाजूला पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी सैनिकांची कारगिलमध्ये घुसखोरी घडवून भारताशी युद्ध छेडण्याचे डावपेच आखत होते. भारताशी पाकिस्तानचे संबंध सुधारू नयेत, अशी पाकिस्तानी लष्कर व त्या देशाची गुप्तहेर संघटना आयएसआयची इच्छा असते. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सोमवारी जे मृत्यूचे तांडव मांडले त्या घटनेकडे बघितले तर अनेक पदर उलगडू लागतात.
गुरुदासपूरमध्ये ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ला झाला नेमके त्याच पद्धतीचे हल्ले जम्मूच्या सीमावर्ती भागातही याआधी झाले आहेत. पाकिस्तानात सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तय्यबा किंवा जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनांनी गुरुदासपूरचा हल्ला केल्याचा भारतीय गुप्तहेर संघटनांना संशय आहे. उघड मैदानात चीतपट करता येत नसल्याने पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसून भारताशी छुपे युद्ध सुरू केले. काश्मीर प्रश्नावरून सातत्याने कुरापती काढून त्या राज्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गेल्या तीन-चार दशकांत मोठा हिंसाचार घडवलेला होता; पण मागील पाच-सहा वर्षांत काश्मीरमध्ये पूर्वीच्या तुलनेत दहशतवादी कारवायांना प्रभावी आळा घालण्यात सुरक्षा दलांना यश आल्याने पाकिस्तान अस्वस्थ होणे साहजिकच होते. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतातील पंजाबमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यात एक गोष्ट स्पष्ट आहे की, भारतातील राष्ट्रविघातक प्रवृत्तींनी मदत केल्याशिवाय पाकिस्तानी दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह पंजाबमध्ये घुसखोरी करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे हे घरभेदी हस्तक कोण आहेत याचा शोध भारतीय तपास यंत्रणांना घ्यावा लागेल. पाकिस्तानातील दहशतवादी भारतात असे हल्ले अधूनमधून करत असल्याने दोन्ही देशांतील संबंध एकदम ताणण्याइतपत टोकाला जाण्याचे कारण नाही, असे काही जणांना वाटत असते; पण गुरुदासपूरच्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी विचारांच्या पुनरुज्जीवनाच्या खुणा दिसत असून ती गोष्ट खूपच गांभीर्याने घेण्यासारखी आहे.

खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेला गाडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने जून १९८४मध्ये अमृतसरमधील सुवर्णमंदिरात भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम पार पाडली. त्यामुळे दुखावलेल्या खलिस्तानवादी प्रवृत्तींनी इंदिरा गांधी यांची हत्या घडवून आणली. या घटनांनंतर मात्र पंजाबमधील दहशतवादी चळवळींचा जोर संपत गेला आणि गेल्या वीस वर्षांत पंजाबमध्ये ब-यापैकी शांतता नांदते आहे; परंतु खलिस्तानवादी काही शीख नेते पाकिस्तान तसेच कॅनडासारख्या अन्य देशांत अजूनही सक्रिय असून त्यांना पंजाब धगधगता ठेवायचा आहे. तसा अन्योन्यसंबंध दर्शवणा-या घटना गेल्या दोन महिन्यांत जम्मू व पंजाबमध्ये घडल्या होत्या. गुरुदासपूर येथे झालेल्या हल्ल्यावरून देशातील राजकारणही तापले. शिरोमणी अकाली दल व भाजप हे पंजाब व केंद्रातील सत्तेत एकत्र आहेत. दहशतवाद्यांबाबत केंद्राकडून आम्हाला निश्चित कोणत्याही सूचना मिळालेल्या नव्हत्या, असा आरोप पंजाब सरकारने करून मोदी सरकारलाच अडचणीत आणले. जम्मू-काश्मीरमध्येही जेकेपीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती महंमद सईद यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने आघाडीचे राज्य सरकार गेल्या मार्चमध्ये स्थापन केले तेव्हापासून पुन्हा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढू लागल्या आहेत. सईद यांच्यामुळे भाजप काही वेळा तोंडावर आपटलेला आहे. दुस-या बाजूस अल कायदाचा जोर ओसरल्यानंतर इसिस ही संघटना सर्व मुस्लिम दहशतवादी संघटनांना आपल्या पदराखाली घेऊ पाहत आहे. इसिसने दक्षिण आशियात कारवाया वाढवल्या आहेत. त्यासाठी पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबासह सर्वच दहशतवादी गटांना इसिसने हाताशी धरले आहे. भारत हा इसिसच्या डोळ्यात सातत्याने खुपत असतो. गुरुदासपूरमधील हल्ल्याचा कट इसिस, खलिस्तानवादी प्रवृत्ती व आयएसआय या तिघांनी एकत्रितपणे शिजवल्याचीही शक्यता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ नाकारत नाहीत. हे सर्व पाहता पाकिस्तानविषयी कायमच ममत्वाने बोलणा-या भारतातील काही बुद्धिमंतांचे डोळे आता तरी उघडायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाची गरज म्हणून पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवणे आवश्यकच आहे, मात्र वेळप्रसंगी पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ करण्याची धमकही भारताने दाखवायलाच हवी.