आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य न्याय! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत १९९३ मध्ये घडवलेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील सूत्रधारांपैकी एक असलेला याकूब मेमन याची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम राखली हे अत्यंत न्याय्यच आहे. त्याने याआधी केलेला दयेचा अर्ज महाराष्ट्राच्या राज्यपालांनी फेटाळला. अयोध्येत बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांनी आपल्या पाकिस्तानच्या साहाय्याने आरडीएक्ससारखी घातक स्फोटके भारतात आणून त्याकरवी
मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. त्यामध्ये पावणेतीनशेहून अधिक लोक ठार, तर शेकडो लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटांच्या आगेमागे दाऊद व त्याचे साथीदार पाकिस्तानात पळून गेले. त्यात याकूब मेमनही होताच.
बॉम्बस्फोट मालिकेच्या संपूर्ण कटात याकूब हा पूर्णपणे शुद्धीत राहून सहभागी झाला होता. आपण भयंकर देशद्रोह करतो आहोत याची त्याला संपूर्णपणे जाण होती. त्यामुळे त्याच्या गैरकृत्यांना कोणतीही माफी मिळणे अयोग्यच होते. नेमका हाच विचार करून विशेष टाडा न्यायालयाने २७ जुलै २००७ रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षे वरिष्ठ न्यायालयांमध्ये त्याचे या शिक्षेच्या निकालाविरोधात दाद मागणे सुरू होते.
आपल्या प्रकरणात सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन नीट झाले नसल्याची तक्रार याकूब मेमनने सर्वोच्च न्यायालयासमोर ताज्या फेरविचार याचिकेत केली होती. हा धादांत खोटेपणा झाला. टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूबला वरिष्ठ न्यायालयांमध्ये आपली बाजू पूर्णपणे मांडण्याची संधी भारतीय न्यायव्यवस्थेने दिलेली होती. त्याला कायदेशीर मदत मिळण्यास कोणतही आडकाठी आणण्यात आली नव्हती.
नेमके हेच लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फेरयाचिकेतील सारे मुद्दे खोडून काढले. न्यायव्यवस्थेतील काही त्रुटींमुळे आपल्याकडे दाव्यांचे निकाल प्रदीर्घ काळानंतर लागतात. ही उणीव मान्य केली तरी निरपराध माणसाला न्यायदेवतेने डोळे झाकून शिक्षा सुनावली आहे अशी प्रकरणे फारशी घडलेली नाहीत. त्यामुळे याकूब मेमनबाबतही पक्षपाती न्याय झाला, असा दावा जे करतात तो मूर्खपणाचा आहे.

भारतातील मुस्लिमांवर नेहमीच अन्याय होत असतो, असे सांगणारा एक वर्ग भारतात व परदेशातही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्यांना नेहमी काही ना काही प्रकरणे हवीच असतात. गेल्या काही दिवसांपासून याकूब मेमनच्या फेरविचार याचिकेचे कोलीत त्यांच्या हाती लागलेले होते. याकूब मेमन हा गुन्हेगार असण्यापेक्षा तो मुस्लिम असल्यामुळे त्याच्यावर कसा अन्याय होतो, असा जातीय प्रचार करण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली
होती. या उथळ मंडळींच्या अपप्रचाराला देशातील प्रसारमाध्यमांनी, विशेषत: वृत्तवाहिन्यांनी उचलून धरले होते. विवेक हरवलेली प्रसारमाध्यमे आणि तथाकथित मेमनप्रेमी बुद्धिमंत बेतालपणे आपले विचार मांडत होते. हे सारेच विलक्षण किळसवाणे होते. पाकिस्तानात पळून गेलेल्या याकूब मेमनचे आयएसआयशी धड जमेना म्हणून तो कराचीमार्गे काठमांडूला येऊन आपले नातेवाईक व कायदेशीर सल्लागाराला भेटला. याकूब शरण आल्यानंतर
त्याला भारतात परत आणण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘रॉ'चे तत्कालीन अधिकारी बी. रामन हे अलीकडे खूपच बोलके झाले होते. याकूबला फाशी देऊ नये, हे मत ते सातत्याने मांडत होते. मुळात मुंबई बॉम्बस्फोटांचा तपास हा ‘रॉ’ने नव्हे, तर मुंबई पोलिस व त्यानंतर सीबीआयने केलेला होता. या बॉम्बस्फोटांतील सर्व आरोपींविरोधात सज्जड पुरावे गोळा करूनच त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. याकूब पाकिस्तानला पळून गेला त्याच काळात हा सारा तपास सुरू होता. याकूब भारतात परत अाल्यानंतर
त्यानेही बॉम्बस्फोटांतील सूत्रधारांबद्दलचे अनेक पुरावे दिले, असे सांगितले जात आहे. पण तपासकामातले एक महत्त्वाचे तत्त्व असे आहे की, आरोपीने दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही तपास यंत्रणा कधीही विश्वास ठेवत नाही. कोणत्याही प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करून तपास यंत्रणांना सबळ पुरावे गोळा करावे लागतात आणि हेच पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जातात. त्यामुळे याकूबने भारतात येऊन कर्णाच्या दानशूरवृत्तीने काही पुरावे दिले असे भासविणे हे अत्यंत निरर्गल आहे. बॉम्बस्फोटांच्या देशद्रोही कृत्यात सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मेमन कुटुंबीयांतील काही सदस्यांची न्यायालयाने पुरेसे पुरावे न मिळाल्याने निर्दोष मुक्तताही केली होती. हा इतिहास माहिती असूनही एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांवर अन्याय होतो, असा कांगावा केला. अशा घटनांचा वापर धार्मिक फूत्कार टाकण्यासाठी कोणीही करणे हाही अक्षम्य गुन्हाच आहे. शरण
आलेल्या याकूबला भारतीय तपास यंत्रणांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले होते; पण तुझी सुटका होईल, असे आश्वासन मात्र कोणीही दिलेले नव्हते. हे सगळे तपशील लक्षात घेऊनच याकूबला झालेल्या फाशीकडे पाहिले पाहिजे.