आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजफगडचा नवाब (अग्रलेख )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलामीच्या फलंदाजीची ज्याने व्याख्या बदलली तो 'नजफगडचा नवाब', प्रिन्स नव्हे, 'मुलतानचा सुलतान' वीरेंद्र सेहवाग आता निवृत्त झाला. चेंडू फटकावण्यासाठीच टाकला जातो, हे फलंदाजीचे सूत्र त्याने कायम जपले. पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत २९४ वरून षटकार मारून त्रिशतक करण्याचे धाडस, बेदरकारी व आत्मविश्वास दाखवणारा लाखो क्रिकेटरसिकांचा त्यावेळी आवडता फलंदाज होता आणि आहे. त्याचे डोळे भेदक होते, हातांमध्ये चपळाई होती ती त्याच्या बॅटमधून दिसायची. वडिलांची पिठाची गिरणी होती. सदैव नशेत राहणाऱ्या वडिलांना मुलाच्या डोळ्यातील चमक कधीच दिसली नाही. ती चमक शर्मा नामक एका क्रिकेट प्रशिक्षकाने पाहिली. इंग्लंडविरुद्ध दिल्लीतील एका सराव सामन्यात सचिन तेंडुलकरने त्याच्यातील गुणवत्ता हेरली. सचिन त्या वेळी म्हणाला, ‘अॅव्हरेज’ क्रिकेटपटूंपेक्षा हा चांगला आहे. ज्या सचिन तेंडुलकरला तो आदर्श मानायचा त्याच्या प्रशस्तिपत्रकानंतर सेहवागसाठी भारतीय संघाचे दार उघडले गेले. आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीची करामत श्रीलंकेत दाखवून त्याने सचिनच्याच जागेवर बदली खेळाडू म्हणून स्थान मिळवले, त्या वेळी 'प्रतिसचिन' म्हणून तमाम विश्वाने त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. त्याच वेळी सेहवागने मात्र विनम्रपणे सांगितले, मी सचिनच्या बुटाची लेस बांधण्याच्या योग्यतेचाही नाही. मात्र जेव्हा सचिन-सेहवाग जोडगोळी एकत्र खेळू लागली, त्या वेळी त्याने सचिनलाही झाकून टाकले. मुलतान कसोटीत २९४ वर आल्यावर एकेरी धाव काढत त्रिशतक पूर्ण कर असा सल्ला सचिनने त्याला दिला. त्याच सचिनच्या समोर त्याने षटकाराने त्रिशतक पूर्ण केले. 'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तरच्या गोलंदाजीची मनसोक्त पिटाई केली त्याच वेळी त्याला 'सुलतान ऑफ मुलतान' हा किताब क्रिकेटरसिकांनी बहाल केला. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीयांनी अधिक नांगी टाकली, पण सेहवाग त्याला अपवाद ठरला. त्याने सर्वाधिक धावा, शतके त्यांच्याविरुद्धच कुटली.

स्फोटक फलंदाजीच्या शैलीला साजेसा असा स्पष्टवक्तेपणा असलेला हा दिल्लीचा महान खेळाडू योग्यता, समज, धाडस असूनही भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान बनू शकला नाही. सीनियर खेळाडूंना इतरांपेक्षा अधिक मानधन हवे हे भारतीय क्रिकेट बोर्डाकडे सांगण्याचे धाडस एकट्या वीरूने दाखवले. त्याची किंमत त्याला कायम मोजावी लागली. फलंदाजीत बचाव कोण करतो, ज्याच्याकडे फटके नसतात तो, असा त्याचा दावा होता. त्याच्या फटकेबाजीमुळे भारतीय गोलंदाजांना प्रतिस्पर्ध्यांचे डाव गुंडाळण्यासाठी अधिक वेळ व षटके मिळाली. २००० नंतरच्या भारतीय क्रिकेटच्या यशात सेहवागचा वाटा महत्त्वाचा व निर्णायक आहे. वैयक्तिक शतके आणि विक्रम यापलीकडे जाऊन क्रिकेट खेळणारा तो आजच्या पिढीचा आदर्श होता. धोनीने कप्तानपदाचा संभाव्य अडसर म्हणून त्याला दूर करताना अनेकदा राजकारण केले. एकदा तर त्याला वगळण्याचे कारण, "फिट' नाही असे दिल्यानंतर सेहवागने स्वत: प्रसिद्धिमाध्यमांसमोर आपल्याला ‘ड्रॉप’ केले असे स्पष्टपणे सांगितले. असा स्पष्टवक्ता आणि सच्चाईसाठी लढणारा खेळाडू आजच्या मतलबी युगात आदर्श ठरू शकला नाही. तो चांगला ऑफ स्पिनर होता. चांगला क्षेत्ररक्षक होता. पॉइंट आणि कव्हर्समधून कितीही क्षेत्ररक्षक लावले तरीही चेंडू ड्राइव्ह करण्यात वाकबगार होता. त्याचा तो ‘ट्रेडमार्क’ फटका होता. सचिन तेंडुलकरचा तो आदर करतो. खुल्या दिलाचा होता. जशी फलंदाजी तसाच स्वभाव. मधल्या फळीचा फलंदाज म्हणून आला. ब्लूमफौंटेन (दक्षिण आफ्रिका) येथील पदार्पणाच्या कसोटीत ६ व्या क्रमांकावर खेळून शतक ठोकले. त्यानंतर त्याला सलामीला ढकलण्यात आले. तेथे त्याने त्या जागेची व्याख्याच बदलली. त्याच्या बॅटीत गोलंदाजांची कत्तल करण्याची क्षमता होती, पण क्रूरता नव्हती. तो चौकार अधिक मारायचा. मैदानाच्या सभोवताली फटके मारण्याइतपत त्याचा फलंदाजीचा भाता समृद्ध होता. सचिन तेंडुलकरलाही जमले नाही ते त्याने केले. २३ शतकांमध्ये दोन त्रिशतके व सहा द्विशतके अशी त्याची जबरदस्त कामगिरी होती.
एकदिवसीय सामन्यातही सर्वप्रथम द्विशतक त्यानेच झळकावले. त्याची फलंदाजी आकडेवारीचा साज चढवण्यासाठी नव्हती. त्यात लयबद्धता होती. याचे एकमेव कारण म्हणजे तो हिंदी गाण्यांचा, प्रामुख्याने किशोरकुमार यांच्या गाण्याचा दिवाणा आहे. तो स्वत: भजनेही सुंदर गातो. शंकराची, माताजींची भजने हा त्याचा राखीव प्रांत आहे. फलंदाजी करताना समोरून गोलंदाजाने चेंडू टाकायला धाव घेतली की तो गाणी गुणगुणायचा. त्याच्या डोक्यात त्या वेळी क्रिकेट नव्हे तर संगीत असायचे. त्या धुंदीतच तो फटके मारायचा. अन्य छंदाप्रमाणे त्याला गाण्याचा छंद आहे. तेच त्याच्या बॅटीमधून क्रिकेटच्या रूपात, चौकार-षटकारांच्या आकारात प्रतिबिंबित होत होते. क्रिकेटच्या मैदानावरच्या संगीताची ही अशी एक दुर्लभ मैफल आता अनुभवता येणार नाही.