आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छप्पन्न इंची खोट (अग्रलेख )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या छप्पन्न इंची छातीचा भारी अभिमान. या छातीच्या बळावर गुजरात प्रांती गाजवलेल्या खऱ्या-खोट्या पराक्रमाचे गाडाभर पुरावे त्यांनी दीड वर्षापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ओतले. रोग कोणताही असो, रामबाण इलाज एकच. छप्पन्न इंची छातीचे नेतृत्व देशाला हवे. देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच स्वबळावरचे बिगरकाँग्रेसी सरकार सत्तेत आले. मोदींनी स्वत: वर्णिलेल्या प्रतिमेनुसार कणखर, कार्यक्षम, अर्थचतुर, व्यापारप्रेमी, व्यवहारी वगैरे गुणांचे सरकार सत्तारूढ झाले. मात्र, गुजरातचा हाकला तसाच देशाचा कारभारही हाकण्याचा प्रयत्न मोदींनी केला. राष्ट्रीय राजकारणात मोदींना ज्येष्ठ असणारे मंत्रिमंडळातील सहकारी याने दुखावले. या ज्येष्ठांचा अपवाद वगळता लादलेले संघनिष्ठ आणि मित्रपक्षही मंत्रिमंडळात आहेत. मोजक्या मंत्र्यांची गती वगळली तर ‘येड्याच्या गावात, पेढ्याचा पाऊस’ असा आनंद आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह हे संघाने धाडलेले पार्सल. त्यांची वाटचाल नाउमेद करणारी आहे.
सार्वजनिक अन्नधान्य वितरण सांभाळणारे रामविलास पासवान याच माळेतले. राधामोहन-पासवान या ‘बाष्कळ’ बिहारींकडे देशाच्या अन्न-वस्त्राची जबाबदारी असावी, हेच एव्हाना भीतिदायक ठरू लागले आहे. ‘अच्छे दिन’ची द्वाही फिरवून वर्ष व्हायच्या आधीच कांद्याने शंभरी गाठली. कडधान्ये महागल्याने आता डाळ-भातसुद्धा दुर्मिळ झाला. ऐंशी-नव्वद रुपये किलोची तूरडाळ सव्वादोनशे रुपयांनी विकत घेण्याइतकी भक्कम छाती कोट्यवधी गरीब-मध्यमवर्गीयांनी कुठून आणावी? तूरडाळीला सुक्या मेव्याचा दर्जा देण्याची जादू सरकारने साधली. ‘डाळ नाही तर काजू-बदाम खा,’ असा आदेश एखाद्या वाचाळ मंत्र्याने अजून दिला नाही, हेच नशीब. गरिबांच्या ताटातली डाळ गायब झाली असताना, निम्मा देश दुष्काळी छायेत असताना ‘बाष्कळ’ बिहारींची जोडी बिहार निवडणुकीत मश्गूल आहे.
कडधान्ये, तेलबियांच्या बाबतीतले देशाचे परावलंबित्व नवे नाही. उपलब्धता आणि मागणीतली दरी नेहमीची. केवळ वर्षभरात ही तफावत मोदी सरकार भरून काढू शकत नाही, हेही मान्य. म्हणूनच नियोजन, प्राधान्य महत्त्वाचे ठरते. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना आताची सत्ताधारी मंडळी उपाययोजनांची जंत्री सादर करायची. दूध, भाजीपाला, अन्नधान्याची महागाई रोखण्याचे रग्गड फॉर्म्युले सांगायची. कुठे नेऊन ठेवले तेव्हाचे ज्ञान? साखर महागल्यावर पवार आणि ‘साखर लॉबी’ यांच्यातल्या मधुर संबंधांच्या चर्चा रंगायच्या. आता तुरीच्या ऐतिहासिक दरवाढीला कोणाचे साटेलोटे जबाबदार धरावे? खरे तर उत्पादन आणि पुरवठ्याचे गणित जुळवणे म्हणजे ‘रॉकेट सायन्स' नव्हे. मान्सूनचा रागरंग पाहून खरिपाच्या सुरुवातीला संभाव्य पेरण्या आणि उत्पादनाचे अंदाज देणारी यंत्रणा राधामोहन सिंहांच्या अखत्यारीत आहे. राधामोहन-पासवान जोडीची झोपमोड करण्याच्या कर्तव्यात कसूर झाल्याने ही बला मोदींवर ओढवली. पवारांच्या कारकीर्दीत अन्नधान्य उत्पादनाचा विक्रम देश नोंदवत होता, तेव्हाही कडधान्ये, तेलबियांमधली स्वयंपूर्णता साधता आली नव्हती. कारण या पिकांच्या उत्पादनात धोके जास्त. तुलनेने मिळणारी किंमत पुरेशी आकर्षक नाही. डाळ-तेलाची आयात थांबवायची, तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल.
राज्यनिहाय लक्ष्य निर्धारित करून कडधान्ये-गळीत धान्यांचे उत्पादन वाढवणे अशक्य नाही. यासाठी खास पॅकेज देता येईल. पंचावन्न टक्के भारतीयांना काम देणाऱ्या कृषी क्षेत्राला ‘मेक इन इंडिया'त मुख्य स्थान दिल्याशिवाय डाळ-तेलाची स्वयंपूर्णता साधली जाणार नाही. ‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप,' हा मोदींचा नारा डाळ-तेलाची कोठारे भरू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांना नोटांची हमी आणि पाण्याचा आधार द्यायला हवा. हा दूरगामी धोरणाचा भाग आहे. राधामोहन सिंहांनी दाखवलेला आवाका पाहता त्यांच्याकडून का अपेक्षा ठेवाव्या, हाच प्रश्न आहे. पवारांसारख्या चतुरस्र नेत्याने दहा वर्षांत उंचीवर नेऊन ठेवलेल्या कृषी खात्याची परवड मोदींनी तातडीने रोखावी. दोन वेळचे चार घास सुखाने मिळणे हेच निम्म्याहून अधिक भारताचे ‘अच्छे दिन’चे स्वप्न आजही आहे. परकीय गुंतवणूक, गुगल-फेसबुक भेट, शेअर मार्केटमधली तेजी आदींमुळे चित्कारणारे मूठभर एकीकडे आणि ‘रोटी, कपडा और मकान’च्या मूलभूत चिंतांमध्ये गुदमरणारे मणभर दुसरीकडे, हे वास्तव आहे. ‘प्रधानसेवक’ म्हणत देशाची सूत्रे हाती घेताना ‘सब का साथ, गरीब का विकास’ असे मोदी म्हणाले होते. विकास होईल तेव्हा दिसेलच. तोवर दोनवेळची भूक भागेल याची काळजी प्रधानसेवकांनी करावी. तुमची छाती कितीही विशाल असली तरी ऐंशी कोटी शेतकरी, मध्यमवर्गीय, कामगारांची अस्वस्थता ती सामावून घेऊ शकणार नाही. डॉ. मनमोहनसिंगांना ‘दुर्बळ’ म्हणून हिणवणारे मोदी स्वतःच्या मंत्रिमंडळातील नाकर्त्यांपुढे निष्प्रभ ठरताहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे. तडकलेल्या तुरीचा सांगावा इतकाच.