आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील राष्ट्रध्वज (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय विश्वविद्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याची सूचना स्मृती इराणी यांनी कुलगुरूंच्या परिषदेत केली व त्याला सर्वांनी मान्यता दिली. अशा सूचनांना विरोध होणे वा त्याबद्दल शंका उपस्थित करणे शक्यच नसते. जेएनयूमधील प्रकरण तापलेले असताना असला विरोध करण्याचा वेडेपणा कुलगुरू करणारही नाहीत. कारण देशद्रोहाचा गुन्हा कोणत्या कारणाने लावला जाईल हे सांगता येत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. परिषदेत नसली तरी माध्यमांमधील चर्चेत जरूर शंका उपस्थित केली जाईल. राष्ट्रप्रेमाची सक्ती होत असल्याची टीका होईल. राष्ट्रप्रेमाचे दिखाऊ प्रदर्शन असल्याबद्दल नावे ठेवली जातील. परंतु तरीही राष्ट्रध्वज फडकवण्यास विरोध होणार नाही. तो विरोध टाळून हा संघीय प्रचारनीतीचा भाग असल्याचे म्हटले जाईल. आजही देशातील १० विश्वविद्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो. खरे तर प्रत्येक महत्त्वाच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा संकेत आहे. ते इष्टही असते. राष्ट्रध्वजाकडे पाहून काही चांगल्या ऊर्मी माणसाच्या मनात निर्माण होतात. तरीही एखादे चिन्ह माणसाला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देत असते. त्यासाठी राष्ट्रध्वज हे सर्वसमावेशक असे उत्तम चिन्ह आहे.

तथापि, विश्वविद्यालयांत राष्ट्रध्वज फडकले म्हणजे विश्वविद्यालये उत्तम होत जातील असल्या भ्रमात राहू नये. स्मृती इराणी यांच्याशी आमचा मतभेद इथे आहे. कुलगुरूंच्या परिषदेतून राष्ट्रध्वज फडकवण्याचे ठराव होत असतील तर विश्वविद्यालयांच्या मुख्य कर्तव्याकडे डोळेझाक होते आहे का, अशी शंका येते. राष्ट्रप्रेमाचे घाऊक प्रदर्शन करून विश्वविद्यालये श्रेष्ठ स्तरावर पोहोचत नाहीत. राष्ट्रप्रेमाची महती गाणारी कितीही स्ताेत्रे तेथे लिहिली गेली, राष्ट्रप्रेमाच्या इतिहासावर निबंध लिहिले गेले, राष्ट्रध्वजासमोर रोज तेथे प्रतिज्ञा केल्या गेल्या तरीही विद्यापीठाचा दर्जा त्यावर ठरत नाही. तो ठरतो तेथे होणाऱ्या संशोधनावर. विश्वविद्यालयात कोणत्या दर्जाचे संशोधन होत आहे, ते संशोधन समाजाच्या किती उपयोगी पडत आहे, कोणत्या विद्याशाखा नवीन क्षेत्रात मुसंडी मारत आहेत, नवीन विचार-नवी प्रमेये-नवी गृहितके किती संख्येने मांडली जात आहेत, त्यातील सत्य-असत्य शोधण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत, कोणत्या विश्वविद्यालयातील तरुणांकडे जगातील बहुराष्ट्रीय कंपन्या डोळे लावून बसल्या आहेत, अशा बाबींवर विश्वविद्यालयाची गुणवत्ता ठरत असते. जगातील नामवंत विश्वविद्यालये या कसोटीला उतरतात आणि म्हणून तेथे प्रवेश घेण्यासाठी जगभरच्या तरुणांमध्ये स्पर्धा सुरू असते. तेथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी जगातील अन्य विश्वविद्यालये, कंपन्या, इतकेच काय, प्रत्येक देशातील सरकार तत्पर असते. ऑक्सफर्ड, केंब्रिजमधील पदव्यांना भारतात अजूनही मान मिळतो तो तेथील गुणवत्तेमुळे. ऑक्सफर्ड, केंब्रिजमध्ये ब्रिटनचा ध्वज फडकवण्याचे ठराव होत नाहीत. ब्रिटनच्या ध्वजाला मान मिळतो तो ऑक्सफर्ड, केंब्रिजमधील संशोधनामुळे हे लक्षात घेतले पाहिजे. असाच दर्जा अमेरिकेतील हार्वर्ड, एमआयटी व अन्य अनेक विश्वविद्यालयांनी राखला आहे. अर्थात राष्ट्रप्रेमाचा हा उलटा प्रवास समजून घेण्याची क्षमता आमच्या मंत्र्यांमध्ये आहे की नाही, याची शंका आहे. त्याबद्दल त्यांनाही दोष देता येणार नाही. देशाचे पंतप्रधानच जेथे मूलभूत कामापेक्षा इव्हेंट मॅनेजमेंटला महत्त्व देत असतील तर इराणीबाई तरी काय करणार? अमेरिकेच्या सामर्थ्याचा, वैभवाचा मार्ग तेथील विश्वविद्यालयांतून जातो, असे जाणते विधान बऱ्याच वर्षांपूर्वी पी. चिदंबरम यांनी केले होते. काँग्रेसमधील अनेक नेते हे अशा विश्वविद्यालयांतून शिकले आहेत व त्यातून त्यांचा बराच बौद्धिक विकास झाला आहे. मात्र, ती समज गांधी घराण्यात वा काँग्रेसच्या अन्य नेत्यांमध्ये कधीही झिरपली नाही. परिणामी देशातील विश्वविद्यालयांमध्ये कायम सामान्य व हुजरेगिरी करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले. डाव्या विचारधारेचा विश्वविद्यालयांत प्रभाव राहिला व त्यांना औद्योगिक संशोधन नकोच होते. यामुळे समाजासमोरील व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी विश्वविद्यालयांकडून कधीच प्रयत्न झाले नाहीत. समाज व विश्वविद्यालये एकमेकांपासून फटकून राहिली. चीनमध्येही असेच झाले होते. परंतु डेंग यांनी तेथील विश्वविद्यालयांची वैचारिक वेसण सैल केली व अमेरिकेतील विश्वविद्यालयांशी करार करून चीनमधील विद्यापीठांची गुणवत्ता वाढवली. जागतिक दर्जाचे संशोधन करण्याची सक्ती केली. केवळ गुणवत्ता हाच एकमेव निकष मानला. अर्थनीतीला व्यावहारिक शैक्षणिक नीतीची जोड हे डेंग यांचे मोठे काम आहे व त्यामुळेच चीन आज महासत्ता झाला आहे. राष्ट्रध्वजापेक्षा संशोधनाचे ध्वज फडकले की जग नतमस्तक होते, हे डेंग यांनी ओळखले. त्याची आठवण स्मृतीबाईंनी ठेवावी.