आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी : इतिहास घडेल? (अग्रलेख )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची उमेदवारी निश्चित झाली आहे. बराक ओबामा यांनीही त्यांच्या नावाला अनुमोदन देताना हिलरी या समर्थपणे अमेरिकेच्या प्रगतीला न्याय देऊ शकतात असे म्हटले आहे. ओबामांचे अनुमोदन हे डेमोक्रॅटिक पक्षातल्या अंतर्गत वैचारिक संघर्षाकडे पाहता महत्त्वाचे ठरते. कारण वेतन, करप्रणाली, आरोग्य योजना, नफेखोर बँकांना वेसण व परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवरून बर्नी सँडर्स व हिलरी क्लिंटन यांच्यात जोरदार घमासान अमेरिकी जनतेने पाहिले. एक वेळ अशी आली होती की, डेमोक्रॅटिक पक्षामध्ये उभी वैचारिक दुफळी पडली होती. सँडर्सच्या प्रचार मोहिमेचा एवढा वैचारिक दबदबा होता की त्यांच्या भाषणांमुळे अमेरिकेच्या बुद्धिजीवी, तरुण, कृष्णवर्णीय व हिस्पॅनिक वर्गातून त्यांना समर्थन मिळत गेले. पण सँडर्स यांना प्रत्यक्षात हा पाठिंबा मतांमध्ये रूपांतरित करता आला नाही. त्याउलट जनतेपुढे जाताना हिलरी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व ओबामा यांच्यासारखे आपण मुरलेले, कसबी राजकारणी नाही असे स्पष्ट केले. ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नाही असे त्या म्हणत. अमेरिकेच्या मीडियाने हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीबद्दल सुरुवातीला शंका उपस्थित केल्या होत्या. पण नंतर हिलरींनी परराष्ट्रमंत्रिपदाच्या काळातील पाठवलेले गोपनीय ई मेल व लिबिया-इराण प्रश्न हाताळताना केलेल्या चुका यांवर लक्ष केंद्रित केले. हिलरींच्या संभाषण कौशल्याचा मुद्दा सोशल मीडियात चवीने चर्चिला जात होता. ओबामा जसे उत्स्फूर्त बोलतात त्यापेक्षा हिलरी यांची भाषणे वकिली युक्तिवाद वाटतो, अशा टीका होऊ लागल्या. पण तरीही हिलरी यांनी सँडर्स यांच्यापेक्षा अधिक मते मिळवली ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील साधेपणामुळे.
वास्तविक अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत एकही महिला अध्यक्षपदी निवडून आलेली नाही किंवा एकाही महिलेने अध्यक्षपदाची अंतिम निवडणूक लढवलेली नाही. ज्या काही महिला होत्या त्यांची झेप परराष्ट्रमंत्रिपदापर्यंत होती. हिलरी यांचे वेगळेपण असे की, २००८च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी ओबामा यांच्या विरोधात पक्षांतर्गत निवडणूक लढवली होती. पण ओबामा यांची सरशी होऊन ते पुढे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष झाल्यानंतर हिलरी यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून ओबामा यांच्या मंत्रिमंडळात मानाचे परराष्ट्रमंत्रिपद स्वीकारले. या कार्यकाळात त्यांनी ओबामा यांचे मध्य व पश्चिम आशियातील शांतता प्रस्थापित करणारे धोरण, चीन-भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण, युरोपमधील मंदी, आंतरराष्ट्रीय दहशतवाद असे प्रश्न हाताळले होते. त्यांच्या ७७ हून अधिक देशांना दिलेल्या भेटी गाजल्या होत्या. आपल्या या राजकीय प्रवासाबद्दल त्या सांगतात, "अमेरिकेच्या अध्यक्षपदाची बायको (फर्स्ट लेडी), न्यूयॉर्कच्या सिनेटर, अरकान्सा राज्याच्या प्रतिनिधी, वकील, कायदा पदवीधर, महिला प्रश्नांवर काम करणारी कार्यकर्ती व तळागाळातल्या समाजाचे प्रश्न हाती घेणारी सामान्य स्वयंसेवक असा माझा संघर्षमय प्रवास आहे, आणि आज मी अखेरच्या टप्प्यात तुमच्यापुढे उभी आहे.' अमेरिकेतील स्त्री-पुरुष समानता हे जगासाठी आकर्षण असले तरी महिलांना प्रशासन व अन्य ठिकाणी मिळणारी सापत्नभावाची वागणूक हिलरी यांच्याही वाट्याला आली आहे. ६० च्या दशकात त्यांना स्त्री म्हणून नासाने प्रवेश नाकारला होता. पण या नकारामुळे त्यांचे पूर्ण जीवन बदलले. पती बिल क्लिंटन यांच्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात त्या खांद्याला खांदा लावून लढत होत्या. क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांच्यावर लैंगिक उत्पीडनाचे आरोप झाले होते (क्लिंटन यांनी नंतर अमेरिकी समाजाची माफीही मागितली होती) व जगभरात क्लिंटन यांची निंदानालस्ती होत असताना हिलरी आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. अमेरिकन समाजात व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य व सार्वजनिक आयुष्य यामध्ये ठळकरीत्या भेद स्पष्ट असतानाही व्यक्तीची नैतिक कसोटी हा समाज जोखत असतो. ही सगळी वादळे हिलरी क्लिंटन यांनी झेलली आहेत. आता हिलरी यांचा यापुढचा प्रवास त्यांच्या राजकीय आयुष्याचा क्लायमॅक्स असेल. कारण त्यांच्यापुढे रिपब्लिकन पक्षाचे वादग्रस्त नेते डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे आव्हान आहे. अमेरिका आज स्थलांतर, वेतन, आरोग्य सेवा, करप्रणाली, सामाजिक सुरक्षितता व महिलांचे प्रश्न यावरून दुभंगलेली आहे. हे लक्षात घेऊन अमेरिकेला त्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ, अशी स्वप्ने ट्रम्प दाखवत आहेत. ही स्वप्नेच आहेत हे हिलरी यांना पुढच्या लढाईत अमेरिकी समाजाला दाखवून द्यावे लागेल. इतिहास सेकंद-मिनिटात घडत नाही तर तो महिने-वर्षांनी घडत असतो. हिलरींकडून इतिहास घडण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...