आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी अनास्था (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या टप्प्यात भरपूर बरसलेल्या पावसाने झालेला आनंद महाडच्या दुर्घटनेमुळे हिरावला गेला. गेली चार वर्षे अवकृपा करणारा पाऊस या वेळी कसर भरून काढण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे समाधानाचे वातावरण होते. पहिल्या टप्प्यात पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी नाशिकसारख्या महत्त्वाच्या भागात ओढ घेतली होती. मराठवाड्यात पाऊस पडत होता, पण धरणसाठ्यांमध्ये पुरेसा नव्हता. त्यामुळे शेती ठीक झाली तरी पिण्याच्या पाण्याचे काय, ही चिंता सतावत होती. ही चिंता पूर्णपणे मिटली नसली तरी पिण्याच्या पाण्याचा ताण थोडा कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तो खरा ठरला. याची नोंद ऊठसूट हवामान खात्याची चेष्टा करणाऱ्यांनी ठेवायला हवी. मान्सूनबद्दल कधीच निश्चितपणे काही सांगता येत नाही. माणसाच्या स्वभावाप्रमाणेच हवामान हे अनिश्चित असते. अनेक घटक त्यामध्ये काम करीत असतात व प्रत्येक घटकाची कमीअधिक तीव्रता पावसावर परिणाम करते. पावसावर परिणाम करणारे प्रत्येक घटक सुटे-सुटे तपासण्यासाठी अतिशय अद्ययावत असे तंत्रज्ञान वापरावे लागते. ते अद्याप आपल्याकडे नाही. अन्य काही देशांमध्ये ते आहे. मात्र त्यासाठी भरपूर पैसा लागतो. परदेशात तो पैसा मुख्यत: उद्योग व व्यापार क्षेत्राकडून घेतला जातो. कारण हवामानाचा अंदाज घेऊन या क्षेत्रातील व्यावसायिक धंद्याची गणिते बसवत असतात. तितकी व्यापार क्षमता अद्याप आपल्याकडे नसल्याने यामध्ये सरकार वगळता कुणाची गुंतवणूक नसते. हवामान खात्याचा अचूक अंदाज न येण्यामागे ही खरी कारणे आहेत. तरीही सरकारने यामध्ये बरीच गुंतवणूक केली असून आपण बऱ्यापैकी अचूक अंदाज देऊ लागलो आहोत हे अलीकडील पावसाच्या अंदाजावरून दिसून येते.
मात्र या अंदाजानुसार पुढील पावले टाकण्याचे टाळल्यानंतर काय होते हे महाडमध्ये दिसले. महाडमध्ये पूल वाहून गेला व त्यावरील लहान गाड्यांसह दोन एसटी बसही पुरात ओढल्या गेल्या. हा पूल ब्रिटिशकालीन होता. शेजारीच आणखी एक पूल सोळा वर्षांपूर्वीच बांधलेला आहे. मात्र हा गर्दीचा रस्ता असल्याने जुना पूलही वापरण्यात येत होता. पूल वाहून गेल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली. आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे बाहेर निघण्याचा संभव असल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भाषणांचा सपाटा लावला असला तरी अजितदादांकडून वेगळ्या भाषणाची अपेक्षा होती. भाजप व सेनेचे नेते विरोधी पक्षात असताना असल्या मागण्या करीत. मात्र काही दशके मंत्रिपद मिळवल्यामुळे सरकारी कारभाराशी उत्तम परिचित असलेल्या अजितदादांनीही अशी मागणी करावी, याचे आश्चर्य वाटते. चंद्रकांत पाटील यांचे अलीकडील राजकीय डावपेचही अशा मागणीमागे असावेत. महाडच्या दुर्घटनेबद्दल सरकारला जाब विचारण्याबद्दल दुमत नाही. मात्र अशा दुर्घटनेची कारणे सरकारी अनास्थेचा एक भाग असणाऱ्या अभियांत्रिकी अनास्थेत दडलेली आहेत. उत्तमोत्तम उपकरणे आपल्याला माहिती देतात, पण त्या माहितीवर कोणती कार्यवाही करायची आणि ती किती त्वरेने करायची हे यंत्र ठरवत नाही. तेथे माणसाची गरज असते. सरकारी अभियंत्यांनी हा पूल मे महिन्यात तपासला होता व तो सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या माहितीचा आता मंत्री म्हणून त्यांनी पाठपुरावा करायला हवा. अभियंत्यांनी पुलाची किती खोलवर तपासणी केली होती, त्यासाठी कोणती उपकरणे वापरली होती व पूल ठाकठीक असल्याचा निष्कर्ष कसा काढला होता, याचे सोशल ऑडिट होण्याची गरज आहे. रविवार, सोमवारी महाबळेश्वरला अतोनात पाऊस पडला. सावित्रीचे पात्र फुगण्याचा धोका त्याच वेळी लक्षात आला होता. सावित्री नदीचे पात्र इतके उंचावेल हे लक्षात घेऊन नदीवरील पुलांबाबत दक्षता घेण्याचा इशारा त्वरित दिला गेला होता का, हा या दुर्घटनेतील मुख्य मुद्दा आहे. कोकणातील नद्यांना क्वचितच पूर येतो. मात्र पाण्याची ओढ जबरदस्त असते. पाण्याच्या ओढीमुळे जुन्या बांधकामांना जास्त धोका निर्माण होतो. महाडमध्ये तसे झाले असावे. या दुर्घटनेचा असा अनेक अंगांनी विचार झाला पाहिजे. अनेकदा योग्य माहिती हाती असते, पण अधिकाऱ्यांमध्ये अनास्था असते. ही अनास्था हेच सर्व दुर्घटनांचे मूळ आहे. ती निपटून काढणे हे मंत्र्यांचे काम असून त्याबद्दल त्याला जबाबदार धरले पाहिजे. पावसाचे रौद्ररूप लक्षात घेऊन नाशिकमधील प्रशासनाने पुलांबाबत वेळीच खबरदारी घेतली. तशी ती महाडमध्ये का घेतली गेली नाही हा कळीचा मुद्दा असून त्या दिशेने सर्व तपास केला पाहिजे. निसर्गाच्या कोपापुढे मानव हतबल असला तरी त्या हतबलतेची कारणे समजली तर हताश होण्याची वेळ येत नाही. भारतात हताश होण्याची परंपरा आहे, परदेशात ती नाही, हाच मुख्य फरक आहे.
बातम्या आणखी आहेत...