आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचल काँग्रेसची नामुष्की (अग्रलेख )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायकमांडला खबर नाही, प्रदेश कार्यकारिणीला पक्षाविरोधात पक्षांतर्गत काय धुमसतेय याचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याचे दिसत असेल तर देशातील काँग्रेस पक्ष आतून किती खिळखिळा झाला आहे हे अरुणाचल प्रदेशमधील घटनांवरून दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी भाजपने राज्यातील काँग्रेसचे सरकार पाडले होते. पण भाजपचा हा प्रयत्न काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून हाणून पाडला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये आत्मविश्वास आला होता. काँग्रेसचे प्रवक्ते मोदी सरकार घटनेची पायमल्ली करत असल्याचे आरोप करत होते. पण हा आत्मविश्वास अल्पकाळच टिकला. प्रत्यक्षात कुणालाही खबरबात न लागता मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ४२ आमदारांना घेऊन पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश (पीपीए) या पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेस हायकमांडलाच धक्का दिला. एवढेच नव्हे तर पीपीए हा पक्ष भाजपप्रणीत पूर्वोत्तर विकास आघाडीत लवकरच सामील होणार आहे. थोडक्यात, आसामनंतर ईशान्य राज्य पादाक्रांत करण्याची जी रणनीती केंद्रीय पातळीवरून भाजप आखत होता त्याला अरुणाचल प्रदेशात यश आले आहे. ईशान्य भारतात पाय रोवण्याचे भाजपचे स्वप्न काही नवे नाही. संघ परिवाराचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या राज्यात कित्येक वर्षे सुरू आहेत. पण राजकीय सत्तेपासून भाजप वंचित होता. अत्यंत महत्प्रयासाने आसाममध्ये सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने इतर ईशान्य राज्यांच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी तपासण्याचे काम सुरू केले होते. त्यात अरुणाचल काँग्रेसमधील धुमसता असंतोष भाजपने हेरला होता. केंद्रात मजबूत सरकार असल्याने काँग्रेसमधील असंतोषाला भाजपने चुचकारले व काँग्रेसचे असंतुष्ट आमदार कालिखो पुल (ज्यांचा मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या कार्यपद्धतीला विरोध होता, पण स्वत:चे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती) यांना आपल्या बाजूस फितवले. कालिखो पुल यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या पाठिंब्यासह २४ आमदारांसह पीपीए पक्षात प्रवेश केला व सरकार स्थापन केले. पण १३ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या निर्णयावर आक्षेप घेत पूर्वीचे नबाम तुकी सरकार स्थापन करण्याचा आदेश दिल्याने भाजपच्या रणनीतीला धक्का बसला होता. काँग्रेसने हे यश इतके मिरवले की त्या आनंदाच्या भरात त्यांनी आयत्यावेळी नबाम तुकी यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे सुपुत्र पेमा खांडू यांच्याकडे सोपवले व तुकी यांना नाराज केले. पण आज अशी वेळ आली की पक्षात केवळ नबाम तुकी राहिले असून सर्व पक्ष पेमा खांडू यांनी हायजॅक केला आहे. खांडू यांची ही चाल काँग्रेससाठी धक्कादायक अशी ठरली आहे. काँग्रेस पक्षातील सी. पी. जोशींसारखे धुरीण ज्यांच्याकडे अरुणाचल काँग्रेसची जबाबदारी आहे, त्यांनाही पक्षात काय चालले आहे याचा अंदाज आलेला नसावा. कारण खुद्द सी. पी.जोशी यांनी काँग्रेसचा कोणताही अामदार आपले गाऱ्हाणे, तक्रार घेऊन प्रदेश काँग्रेस समितीकडे किंवा दिल्लीत हायकमांडकडे गेला नव्हता किंवा अशा काही घडामोडी होतील याची माहिती पक्षाला नाही, असे कबूल केले. मग प्रश्न उरतो की खांडू यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणत्या राजकीय दबावातून दिली गेली. खांडू यांनी केलेल्या पक्ष गद्दारीबद्दल काँग्रेसची पुढील काय रणनीती असेल? सध्या तरी अरुणाचलमधील घडामोडींबद्दल काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. पण राजकीय विश्लेषकांच्या मते अरुणाचल प्रदेशसारख्या राज्याला केंद्राच्या मदतीवर संपूर्णपणे अवलंबून राहावे लागत असल्याने असे सत्तांतर झाले असावे.
अरुणाचल प्रदेशात काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्याचा भाजपचा हा काही पहिला प्रयत्न नाही. २००३ मध्ये केंद्रात वाजपेयी यांचे एनडीए सरकार असताना भाजपने काँग्रेसचे असंतुष्ट नेते गेगाँग अपांग यांना हाताशी धरून राज्यातील मुकुट मिथी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडले होते. अपांग यांनी भाजपचा पाठिंबा घेत युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट स्थापन करून ती भाजपमध्ये विलीन केली होती. पण २००४ मध्ये केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीचे सरकार आल्यानंतर अपांग यांनी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला व पुढील निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली होती. सध्या अरुणाचलमधील सत्तांतर भाजपच्या दृष्टीने ‘काँग्रेसमुक्त भारत’ या पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मिशनमधील एक यश आहे. भाजपचे पुढील लक्ष्य काँग्रेसशासित मणिपूर व मेघालय ही दोन राज्ये आहेत. या राज्यांमधील राजकीय परिस्थिती आपल्या बाजूने वळण्यासाठी भाजप अधिक आक्रमकपणे नव्या हालचाली करू शकतो. काँग्रेसला अरुणाचलमधील नामुष्की इतरत्र टाळायची असेल तर सतर्क राहावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...