आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या मर्मावर हल्ला (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुत्सद्देगिरीत आरोपांची राळ नसते किंवा उणीदुणी काढली जात नाहीत तर तर्कसंगतीने शत्रूची कुटिल भूमिका उघडकीस आणली जाते. आज जगाच्या इतिहासात झालेली विविध युद्धे आणि तह यांचा मागोवा घेतल्यास पडद्याआड चालणारे राजकीय डावपेच व मुत्सद्देगिरी यातून युद्धापेक्षा बरेच काही साध्य होते असे दिसून आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ‘फ्लॉप’ भाषणातून भारताला बरेच काही साध्य झाले. या भाषणामुळे भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला उघडे पाडण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्याची किमया परराष्ट्रखात्याच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांनी केली, हे महत्त्वाचे आहे. अशी अवघड कामगिरी भारतीय परराष्ट्रसेवेच्या अधिकारी इनम गंभीर यांनी अत्यंत धाडसाने व आत्मविश्वासाने पार पाडली. हे सर्व यश परराष्ट्र खात्यात पाकिस्तानविषयक कारभार पाहणाऱ्या खात्याचे आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने केलेल्या सेल्फ गोलचेही आहे. कारण बुधवारी नवाझ शरीफ यांनी काश्मीरमधील दहशतवादाचे समर्थन करण्याची भूमिका आश्चर्यकारकरीत्या मांडली. आजपर्यंत पाकिस्तानच्या प्रमुखाकडून आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादी संघटनेचे व दहशतवाद्याचे नाव घेऊन कधी समर्थन झाले नव्हते. पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या लष्कराच्या कारवाया झाकण्याचे काम करत असतो. या वेळी तसे झाले नाही. अंतर्गत दबावामुळे शरीफ यांची चिथावणीखोर भाषा हा पाकिस्तान लष्कराचा अजेंडाच होता, हे स्पष्टपणे दिसून आले.

पाकिस्तानने न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या पत्रकारांना आणले आहे व त्यांच्या माध्यमातून भारताविरोधात आघाडी उघडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानवर घाव घालणे महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने इनम गंभीर यांनी काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची संभावना ‘दहशतवादाची आकर्षक सदाहरित वेल’(Ivy League Of Terrorism) अशा शब्दांत करून शरीफ यांच्या स्वतंत्र काश्मीर चळवळीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेची टर उडवली. नवाझ शरीफ यांनी काश्मीरमध्ये चकमकीत मारला गेलेला हिज्बुल मुजाहिदीनचा सदस्य बुऱ्हान वानीचा स्वतंत्र काश्मीर चळवळीचा शहीद म्हणून गौरव केला होता. यावर इनम गंभीर यांनी बुऱ्हान वानी हा काश्मीरमधील नव्या पिढीचा नायक नव्हे तर तो एका दहशतवादी संघटनेचा कमांडर होता व तो जिहादची भाषा करत होता असे ठामपणे सांगितले. मोजक्याच पण समर्पक शब्दांच्या हल्ल्यातून प्रतिपक्ष जेवढा घायाळ होतो तेवढा तो बंदुकीतल्या गोळ्यांनी होत नाही असे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत मानले जाते. इनम गंभीर यांचे भाषण त्या शैलीतले होते. परराष्ट्र खात्याने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर हल्ले चढवण्यासाठी महिला अधिकाऱ्यांकडे सूत्रे देण्याचा निर्णय परिणामकारक ठरू शकतो. सोमवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे भाषण उद्बोधक ठरू शकेल, कारण या भाषणानंतर उभय देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळू शकते. भारत राजकीय मुत्सद्देगिरीतूनच पाकिस्तानची सर्वच बाजूंनी कोंडी करू शकतो. उरी हल्ल्याच्या निमित्ताने जगापुढे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे पुरावे पद्धतशीर, आकडेवारीने मांडण्याची पुन्हा एक नामी संधी मिळाली आहे. मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर अशीच व्यापक कोंडी भारताने केली होती. त्यानंतर मोठे दहशतवादी हल्ले भारतात झाले नाहीत. आज अंतर्गत सुरक्षा यंत्रणांवर चौफेर टीका होत असली तरी अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कट आपल्या यंत्रणेने नेस्तनाबूत केले आहेत. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव अशा बातम्या सरकारला जनतेपुढे आणता येत नाही. संयम पाळणे व दबावाचे राजकारण करणे यातून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. एकीकडे अमेरिका, रशिया, चीनच्या माध्यमातून पाकपुरस्कृत दहशतवादावर नियंत्रण आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील त्याचबरोबर पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध कसे आणले जातील याचीही राजकीय मांडणी भारताला करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र आमसभेत सरचिटणीस बान की मून व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे काश्मीर मुद्द्याचा उल्लेख करतील असा पाकिस्तानचा अंदाज होता, पण उरी हल्ल्यानंतर संशय पाकिस्तानकडे वळाल्याने या दोन्ही नेत्यांनी काश्मीरचा उल्लेखही करण्याचे टाळले. ही घटना भारताला फलदायी ठरली आहे. आता काश्मीरमधल्या दहशतवादाला पाठिंबा देऊन नवाझ शरीफ यांनी स्वत:च्या देशवासियांना व लष्कराला खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचा हा प्रयत्न दुबळा ठरणार आहे. उरीवरील हल्ला शरीफ यांचे राजकीय भवितव्य ठरवेल, असे म्हणण्यास वाव आहे.
बातम्या आणखी आहेत...