आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखावा की वास्तव?(अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रजासत्ताकदिनी राजधानीत बरेच देखावे निघतात. मात्र या वेळी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीच राजधानीने
ओबामा भेटीचा देखावा पाहिला. हा देखावा सुखावणारा होता यात शंका नाही. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला हजर
राहण्याचे निमंत्रण ओबामा यांनी स्वीकारले यात मोठा अर्थ आहे. हे संचलन भारताच्या आर्थिक, लष्करी प्रगतीचे प्रदर्शन
असते. त्याला अमेरिकेच्या अध्यक्षाची हजेरी ही भारताच्या उपयुक्ततेला मिळालेली पावती आहे. भारत हा आमच्यासाठी
महत्त्वाचा देश आहे, असा संदेश यातून अमेरिकेने जगाला दिला. अमेरिकेसारख्या युद्धखोर, नफेखोर, आपमतलबी राष्ट्राच्या
पावतीची गरज काय, असा प्रश्न नैतिकतेची नकारघंटा वाजवणारे करतील. पण आपल्याला अमेरिकेबद्दल काय वाटते याला
जग महत्त्व देत नाही. जगाच्या मते अमेरिका ही महासत्ता आहे व त्या सत्तेच्या मित्रवर्तुळात ज्यांचा प्रवेश होतो त्यांना
जगाच्या आर्थिक, लष्करी घडामोडीत वजन मिळते हे वास्तव आहे. अमेरिकेबाबत अस्पृश्यता पाळणारे आमचे बुद्धिमंत
रशियाच्या वळचणीला बसण्यास तयार असतात. आजच्या घडीला भारताला आर्थिक व लष्करी क्षेत्रात चमकदार कामगिरी
करून दाखवायची असेल तर अमेरिकेची मदत महत्त्वाची ठरते. रशियाधार्जिणे परराष्ट्र धोरण चालणार नाही हे नरसिंह राव
यांच्या प्रथम लक्षात आले. वाजपेयी यांनी त्याला स्पष्ट दिशा दिली. या दिशेमुळेच मनमोहनसिंग अणुकरार करू शकले.
राव, वाजपेयी व सिंग यांच्या धोरणात सातत्य होते. मात्र, यूपीए सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात मनमोहनसिंग यांची
कुचंबणा करण्यात सोनिया गांधींच्या मित्रमंडळींनी धन्यता मानली व अमेरिकेची मैत्री वास्तवात आणून आर्थिक झेप
घेण्याची संधी घालवली.
मोदी आता ती संधी साधत आहेत. अमेरिका व्यवहारवादी आहे. व्यवसायाची भाषा त्या देशाला बरोबर समजते. अमेरिकेने
मोदींना प्रवेश नाकारला होता, पण लोकशाही पद्धतीने मोदींनी आपली ताकद दाखवून दिल्यावर अमेरिकेने त्वरित
सहकार्याचा हात पुढे केला. गुजराती मोदींमध्ये व्यवहार साधण्याचा गुण पुरेपूर उतरल्यामुळे अपमान बाजूला ठेवून त्यांनी
अमेरिकेच्या मैत्रीस प्राधान्य दिले. इतकेच नव्हे तर जपान, ऑस्ट्रेलियासह आशियातील अमेरिकेच्या मित्रदेशांशी मैत्रीचे
संबंध प्रस्थापित केले. मंदीतून बाहेर येणाऱ्या अमेरिकेला भारताची बाजारपेठ खुणावते आहे. भारतात व्यवसायाच्या संधी
खुल्या होणे हे अमेरिकेसाठी भाग्यकारक ठरेल. ओबामांच्या भारतप्रेमामागे हा व्यवहारवाद आहे. स्वराष्ट्राचा धंदा
वाढवण्यासाठी ते उदार होत आहेत आणि त्यामध्ये काहीही गैर नाही. अमेरिकेसारखीच दृष्टी ठेवून अमेरिकेच्या मदतीने
आपण आपला धंदा किती वाढवतो यावर पुढील प्रगती अवलंबून आहे. कालबाह्य झालेल्या वैचारिक गुंत्यामध्ये अडकून
अमेरिकेच्या नावाने शिमगा करीत आपण पुन्हा आर्थिक क्षेत्रात काही सैतानी कायदे करीत राहिलो तर जगाच्या स्पर्धेत
मागे फेकले जाऊ.

अणुकराराला खोडा घालणारा उत्तरदायित्वाचा कायदा हा असा सैतानी कायदा होता व तो भाजपनेच घडवून आणला होता.
हा कायदा नसता तर गेल्या पाच वर्षांत काही अणुभट्ट्या उभ्या राहिल्या असत्या. यातून वीज मिळाली असती व त्याचा
थेट फायदा उद्योगधंद्यांना झाला असता. जपानमधील फुकुशिमासारख्या घटना घडल्यामुळे आपण उत्तरदायित्वाचा कायदा
आणला. स्फोट झाल्यास भट्ट्या बनवणाऱ्यांनाच त्यामध्ये जबाबदार धरले होते. यातील जबाबदारीच्या तत्त्वामध्ये
कोणाचा आक्षेप नव्हता. आक्षेप होता तो अंमलबजावणीच्या तरतुदींबाबत. पुढील काळात आपल्याला अतोनात वीज
लागणार आहे व ती वीज केवळ धरणे, कोळसा यातून मिळणार नाही. अश्मयुगात राहण्याची इच्छा करणाऱ्या
पर्यावरणवाद्यांच्या नादी लागून आपण आर्थिक प्रगती थांबवू शकत नाही. सर्व ठिकाणी तारतम्य बाळगले पाहिजे व
अणुऊर्जाही त्याला अपवाद नाही. परराष्ट्र धोरणापासून अणुऊर्जेच्या वापरापर्यंत सर्वच पातळ्यांवर सोनिया सरकारने
तारतम्याला तिलांजली दिली होती. ती चूक दुरुस्त करण्याची संधी मोदींना आहे.
मात्र ते करताना अडवाणी, सुषमा स्वराज यांचे राजकारण त्यांना पुसून काढावे लागेल. अणुकराराला याच दोघांनी विरोध
केला होता. आता प्रशासकीय व्यवस्था उभारून अणुकराराला मोदींनी चालना दिली की अडवाणी, स्वराज यांची आठवण
काढून माध्यमे व करार विरोधक प्रखर टीका करतील. एकूणच मोदींचे अमेरिकाप्रेम हा मोठ्या टीकेचा विषय होणार आहे.
मात्र संरक्षण, अर्थ व स्ट्रॅटेजिक क्षेत्रात अमेरिकेबरोबर घट्ट संबंध निर्माण करण्याचे धाडस मोदी दाखवत आहेत. या
संबंधांच्या तपशिलात आता जाता येणार नाही. पण टेक्नो-इकॉनॉमिकल, टेक्नो-डिफेन्स अशा प्रकारचे, तंत्रज्ञानाला
प्राधान्य देणारे हे परस्परसंबंध राहणार आहेत. नजर स्वच्छ ठेवली व व्यवहार साधण्यावर लक्ष ठेवले तर जपान-जर्मनी
व चीनप्रमाणे अमेरिकेच्या जिवावर महासत्तेचे वास्तव प्रत्यक्षात येऊ शकते. अन्यथा ही भेट हा देखावाच राहील.