आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया सज्ज! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून त्यासाठी भारताचा संघ मंगळवारी जाहीर झाला. संभाव्य ३० जणांच्या घोषणेच्या वेळीच निवड समितीने तरुण रक्ताला वाव देण्यात येणार असल्याचे धोरण स्पष्ट केले होते. त्यानुसारच या स्पर्धेसाठी क्रिकेट संघाची निवड झाली आहे. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा पुत्र स्टुअर्ट याचे वय तिशीपलीकडे गेलेले असूनही त्याची निवड झाली हे काही जणांना धक्कादायक वाटले. सर्वच खेळाडूंच्या निवडीबाबत एकमत होणे भारतासारख्या खंडप्राय देशात तरी अशक्य आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या गरजा वेगळ्या असतात. त्यासाठी गुणवत्ताही आगळीवेगळी असावी लागते. कसोटी क्रिकेटचा आत्माच जसा वेगळा तसेच मर्यादित षटकांच्या झटपट क्रिकेटलाही प्रत्येक आघाडीवर उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या खेळाडूंची गरज असते. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या युगात भारतात या गुणवत्तेची सुबत्ताच अवतरली. १९८३ मध्ये भारताने तमाम क्रिकेटविश्वाला आश्चर्यचकित करून विश्वचषक जिंकला तेव्हा संघात ७ ते ८ अष्टपैलू गुणवत्ता असणारे खेळाडू होते. २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली नवोदितांचा संघ पहिल्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेत गेला तेव्हा कुणीही हा संघ विजेता होऊन परतेल, अशी अपेक्षा केली नव्हती. भारतीय संघातील धोनीचे धुरंधर या वेळीही तसाच चमत्कार करू शकतील, अशी अपेक्षा करूया. मात्र, त्यासाठी आपल्याला ऑस्ट्रेलियातील परसि्थिती किती अनुकूल किंवा प्रतिकूल आहे याचा विचार व्हायला हवा. भारतीय संघ विश्वचषकाआधी कसोटी मालिका खेळून नंतर एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन प्रबळ संघांचा मुकाबला करणार आहे. भारताचे विश्वचषकाचे सामने ज्या मैदानांवर आहेत तेथे आधीही खेळण्याची संधी भारताला मिळत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात विश्वचषकादरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या अधिक कोरड्या व संथ असतील. भारतीय फलंदाजांना तसेच फिरकी गोलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो. अश्विन हा एकमेव नियमित फिरकी गोलंदाज संघात आहे. मात्र, रवींद्र जाडेजा, सुरेश रैना, अक्षर पटेल यांची फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची क्षमता उपयोगी ठरू शकेल. मध्यमगती गोलंदाजी ईशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची गोलंदाजी आणि तळाला फलंदाजी करण्याची क्षमता कामी येऊ शकेल.

राखीव यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीला सहायक ठरण्यासाठी करण्यात आलेली अंबाती रायडूची निवड मात्र समर्थनीय नाही. रायडूने भारतात दुबळ्या श्रीलंका संघाविरुद्ध काढलेल्या धावा हा एकमेव निवडीचा निकष लावण्यात आलेला दसितो. नाही तर त्याच्यापेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करणारा व सलामीला तसेच मधल्या फळीत खेळू शकणारा रॉबिन उथप्पा उपयुक्त ठरू शकला असता. राखीव यष्टिरक्षणाची जबाबदारी रोहित शर्माही पार पाडू शकतो. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियन सलामीला फलंदाजीस येऊन सातत्य राखणारा मुरली विजय याला संघात घेण्यासाठी पसंती मिळायला हवी होती; पण तसे घडले नाही. कारण विश्वचषकात दोन्ही टोकांकडून वेगवेगळे चेंडू वापरण्यात येणार आहेत. चेंडूची लकाकी (शाइन) अधिक काळ राहील. नवा चेंडू खेळण्यासाठी सक्षम सलामीवीर हवा होता. धवनच्या साथीला येणारा रोहित शर्मा किंवा अजिंक्य रहाणे मधल्या फळीतही खेळू शकतात. विराट, धोनी, रैना मधल्या फळीचे आधारवड असतील. मात्र, या फलंदाजीच्या कण्याला युवराजसिंगसारख्या घणाघाती फटकेबाज फलंदाजाचा आधार असायला हवा होता. गोलंदाज झहीर खानच्या अनुपस्थितीमुळे संघाने एक चांगला गोलंदाजच नाही, तर गोलंदाजीचा कप्तानही गमावला आहे. ईशांत शर्माच्या गोलंदाजीला झहीरच्या मार्गदर्शनानंतरची आलेली धार जाणवत नाही. गत विश्वचषक भारतीय उपखंडात झाला होता. भारताला स्वत:ला हव्या तशा खेळपट्ट्या तयार करण्याचे स्वातंत्र्य होते. परदेशातील विश्वचषकातील भारतीयांची कामगिरी पाहिली की बाद फेरीतच भारतीय संघ नेहमी गटांगळ्या खातो, असा अनुभव आहे. १९९२च्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील विश्वचषकात पूर्वार्धात चांगली सुरुवात करूनही भारतीय संघ बाद फेरीत पोहोचू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेत भारतीय मध्यमगती गोलंदाजीला अनपेक्षितपणे सूर गवसला आणि अडखळत सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने थेट अंतिम फेरी गाठली होती. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील स्पर्धेतही भारताला असाच सूर गवसल्यास बाद फेरी तर निश्चितच गाठता येईल. बाद फेरीत मात्र खरा संघर्ष असेल. कोणता प्रतसि्पर्धी कोणत्या मैदानावर समोर येतो तेदेखील निर्णायक ठरेल. अंतिम सामना परंपरेनुसार मेलबोर्नला होणार आहे. भारताने अंतिम फेरीत प्रवेश केल्यास वानखेडे स्टेडियमप्रमाणे मेलबोर्नवर खेळणे सोपे नसेल हेही कटू सत्य आहे. भारतीय संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कशा प्रकारे मार्गक्रमण करतो यावरच विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट डोक्यावर पुन्हा कायम राखणे भारतीयांना शक्य होणार आहे.