आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची आवई (अग्रलेख )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षात भाजप आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेला संघर्ष कोणाही सुज्ञाची करमणूक करणारा आहे. इंग्लंडमधील बाबासाहेबांच्या घरखरेदीपासून मुंबईतील इंदू मिलमधील स्मारकापर्यंत नरेंद्र मोदी झपाट्याने आंबेडकरांबद्दल आस्था प्रकट करत आहेत. गलितगात्र काँग्रेसही आंबेडकरांवरचा अधिकार कायम ठेवण्यासाठी झगडते आहे. आंबेडकरांच्या नावाने नागपुरात काँग्रेसने शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला. यात याचा प्रत्यय आला. ‘जमवलेल्या’ गर्दीपुढे सोनिया-राहुल आक्रमक झाले. का तर म्हणे आरक्षण संपणार म्हणून. ‘मनुवाद्यांकडून आरक्षणाला धोका’, अशी आरोळी ठोकून दलितांना संभ्रमित करण्याची काँग्रेस व तथाकथित सेक्युलरांची ही नेहमीची पद्धत आहे. संघाची वैचारिक बैठक वगैरे बाजूला ठेवून निव्वळ व्यावहारिक विचार केला तरी एक बाब पक्की ध्यानात घ्यावी लागते, ती म्हणजे कोणतीही विचारधारा सत्तेत आली तरी आरक्षणाला हात लावण्याचा मूर्खपणा करणार नाही. नजीकच्या भविष्यात अशी शक्यता दिसत नाही. देशातली सरासरी ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या घटनादत्त आरक्षणाची लाभार्थी असताना एवढ्या मोठ्या जनसमूहाला नाराज करण्याची राजकीय आत्महत्या कोण करेल? त्यामुळे आरक्षणाला नख लागण्याच्या दाव्याकडे संभ्रमाचे हत्यार म्हणूनच पाहावे लागते. याऐवजी आंबेडकरांचा अर्थविचार, त्यांची शेतीवरची मांडणी अभ्यासून सरकारला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसने करणे संयुक्तिक ठरले असते. त्यासाठी आवश्यक आवाका सोनिया-राहुल किंवा त्यांच्या भाषण लेखनिकांनी दाखवला नाही. ‘आरक्षण धोक्यात’ हे बोथट शस्त्रच काँग्रेसने परजले. तसेही इतिहासाशी फारकत घेण्याचा व प्रतीकांची पळवापळवी करण्याचा मक्ता संघाकडे नाहीच. संघाने निर्धाराने चालवलेले विवेकानंदांचे ‘भगवेकरण' किंवा नेहरूंवर मात करण्यासाठी सरदार पटेलांचा गौरव या तशा अलीकडच्या घटना. सोईस्कर इतिहास सांगण्यात आणि प्रतीकांवर मालकी गाजवण्यात आतापर्यंत काँग्रेसच संघाच्या पुढे राहिली आहे. म्हणून तर काँग्रेसच्या विरोधात हयात घालवणाऱ्या आणि महात्मा गांधींशी सतत संघर्ष करणाऱ्या आंबेडकरांना मृत्यूनंतर काँग्रेसने डोक्यावर घेतले.
आरक्षण धोक्यात आल्याची आवई उठवणाऱ्या काँग्रेसला एका प्रसंगाची आठवण जरूर करून द्यायला हवी. दलितांना आरक्षण सहजी मिळाले नाही. त्यासाठी आंबेडकरांना रक्ताचे पाणी करावे लागले. घटना समितीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांची तरतूद स्वीकारली गेली. त्यानंतरही काँग्रेसचा आरक्षण विरोध सुरू राहिला. १९५२मध्ये निपाणीच्या सभेत आंबेडकरांनी याचा समाचार घेतला. ते म्हणाले, “पं. नेहरूंनी नागपूरच्या हरिजन परिषदेत भाषण केले. त्यात अस्पृश्यांना आता सवलतीची काही गरज नाही, त्यांची सुधारणा झाली आहे, असे म्हटले. ज्यांना आपल्या देशातील लोकांची परिस्थिती माहिती नाही त्याला पंतप्रधान निवडावे हे देशाचे दुर्दैव होय.” घटना बदलण्याची चिंता वाहणाऱ्या याच काँग्रेसने मसुदा समितीत आंबेडकर येऊ नयेत यासाठी ताकद पणाला लावली. शेवटी आंबेडकरांना मुंबई सोडून बंगालमधून निवडून जावे लागले. नेहरूंशी आंबेडकरांचे कधीच जुळले नाही, हे पणतू राहुल यांनी लक्षात घ्यावे. काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दलचे आंबेडकरांचे मत काँग्रेसजनांना ऐकवणार नाही. तुरुंगात जाऊन अगर लढा करून काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवले हा भ्रमाचा भोपळा असल्याचे आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या निवडणूक प्रचारसभेत सांगितले होते. वर्गणीचे चार आणे आणि पांढऱ्या टोपीचे दोन आणे खर्चून मी काँग्रेसमध्ये जाईन, तर मी मागेन तो मान मला मिळेल हे मला ठाऊक आहे; पण असला मान मी ठोकरीने उडवतो, अशी खिल्ली आंबेडकरांनी उडवली होती. याच आंबेडकरांचे नाव घेत काँग्रेस आतापर्यंत दलितांना झुलवत आली. हे हुकमी प्रतीक आता नरेंद्र मोदी घेऊन चालल्याने काँग्रेस बिथरली आहे. समरसता मंचाच्या माध्यमातून दलित, ओबीसींमध्ये विस्तार करण्यात संघ यशस्वी होत आहे. संघाचा मुस्लिम राष्ट्रीय मंच मुस्लिम मतदारांमध्ये घुसू पाहतो आहे. काँग्रेसच्या पारंपरिक जनाधार असलेल्या या वर्गांना आपलेसे करून घेण्यासाठी आवश्यक थोरामोठ्यांची प्रतीके आणि निवडक इतिहासाचा वापर संघ करतो आहे. अन्यथा आंबेडकरांचा वैचारिक वारसा जसा काँग्रेसने कधी स्वीकारला नाही तसाच तो ‘अखंड हिंदूराष्ट्र'वाल्या संघालाही झेपणारा नाही. प्रतीके मिरवण्यातून प्रतिमा निर्माण होत असते. या राजकारणातली काँग्रेसची मिरासदारी मोडून काढण्यात तूर्तास संघ यशस्वी होऊ लागल्याने काँग्रेसचे बिथरणे स्वाभाविक आहे.