आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम मोदी सज्ज (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारचा गाडा ओढणारे नेते विश्वासातील, कुशल प्रशासक आणि स्वच्छ प्रतिमेचे असतील, अशी खबरदारी नरेंद्र मोदी यांनी घेतलेली दिसते. आगामी सहा महिने सरकारच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा काळ ठरणार आहे. त्यासाठी सरकारमध्ये टीम मोदी सज्ज झाली तर ते सर्वांच्याच हिताचे आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांचे ओझे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणवू लागले असून एकट्याच्या करिष्म्यावर हा प्रचंड गाडा हाकणे शक्य नाही, आपल्याला चांगली साथ देणारे साथीदार तर लागतीलच; पण त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन सरकारला वेग दिला पाहिजे, हेही मोदी यांना पटले आहे, याची प्रचिती म्हणजे रविवारी झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार होय. वेगळा विचार करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना गेल्या सहा महिन्यांत देशाने स्वीकारले आहे आणि देशात सकारात्मक वातावरणही तयार होते आहे. अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात गती आली आहे. मात्र ज्या वेगाची भाषा केली गेली, तो वेग अजूनही दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या कामकाजावर टीकेला आता सुरुवात झाली आहे. जनतेची नस ओळखणाऱ्या मोदी यांनी हे जाणलेच असणार. त्यामुळेच एरवी राज्य, जात, धर्म अशा संतुलनाला महत्त्व देण्यात येते, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात, विशेषतः कॅबिनेट मंत्रिपदांवर निर्णय प्रक्रिया वेगवान करण्यासाठी पुढाकार घेणारे, सक्षम आणि विश्वासू सहकारी मोदींनी निवडले आहेत. पक्षावर संपूर्ण नियंत्रण मिळाल्यानंतर आता सरकारला एका दिशेने काम करण्यास भाग पडण्याचा संकल्प यात दिसतो आहे.

ताज्या विस्तारात चार कॅबिनेट, १४ राज्य आणि तीन स्वतंत्र कारभार पाहणारे अशा २१ जणांना मंत्री करण्यात आले. गोव्यात उत्तम कारभार करून दाखवणारे मुख्यमंत्री, उच्चशिक्षित आणि अतिशय साधी राहणी असलेले आणि मोदींचे कट्टर समर्थक असलेले मनोहर पर्रीकर यांना मोदींनी केंद्रात खास बोलावून घेतले आहे. कालपर्यंत शिवसेनेचे असलेले सुरेश प्रभू यांनाही भाजप–शिवसेनेच्या वादाची पार्श्वभूमी असताना एका दिवसात भाजपत घेऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी उद्योग, पर्यावरण आणि ऊर्जा अशी महत्त्वाची खाती अतिशय यशस्वीपणे सांभाळली होती. ऊर्जा क्षेत्रात खासगीकरणाला गती दिल्याशिवाय सरकार वेगाने काम करू शकणार नाही. प्रभू हे खासगीकरणाचे समर्थक आहेत. तसेच अर्थकारणाची सांगड ते चांगली घालू शकतात. असे विषय हाताळणाऱ्या प्रभू यांची शिवसेनेत कोंडी होणे, अगदी साहजिक आहे. तिसरे कॅबिनेट मंत्री जे.पी. नड्डा हे मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहांच्या जवळचे तसेच संघालाही जवळचे मानले जातात. चौथे कॅबिनेट मंत्रिपद मात्र राजकीय म्हणावे लागेल. चौधरी वीरेंद्रसिंह हे जाट आहेत. हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी आता जाट नसल्याने त्या समूहाचे समाधान करणे आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीला समोर ठेवून ही निवड केलेली दिसते. नवे राज्य तेलंगणात भाजप वाढण्यासाठी बंडारू दत्तात्रेय यांना तर लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांना हरवण्याचा पराक्रम केल्याबद्दल बिहारचे राजीव प्रताप रुडी यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. रुडी यांना वाजपेयी मंत्रिमंडळात नागरी हवाई वाहतूक मंत्रिपदाचा अनुभव आहे. भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात काम करतो, अशी एक धारणा असून त्याचा प्रतिवाद नेटाने करणारे मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असा अंदाज होता. मात्र जेडीयूचे नेते साबीर अली यांना भाजपत प्रवेश देताना वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने नक्वी यांना शिक्षा देण्यात आली आहे, असे दिसते. रामकृपाल यादव यांचा समावेश बिहारच्या पुढील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. लालूप्रसाद यांचे एकेकाळचे विश्वासू असलेल्या रामकृपाल यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपत येऊन निवडणूक जिंकली. बिहारमध्ये यादव समाज मतदानाच्या टक्क्यात महत्त्वाचा ठरतो. स्वच्छ चेहऱ्याचे हरीभाई चौधरी आणि मोहनभाई कुंडारिया यांच्या समावेशाने गुजरातचा कोटा भरण्यात आला आहे. विशेषतः गुजरातमध्ये प्रबळ असलेल्या पटेल समूहाला कुंडारिया यांच्या समावेशाने खुश करण्यात आले आहे. सर्वच्या सर्व २५ जागा मिळवून देणाऱ्या राजस्थानला पुरेसे स्थान मिळाले नव्हते. आता सांवरलाल जाट, राज्यवर्धनसिंह राठौड यांच्या समावेशाने ती नाराजी दूर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील रामशंकर कठेरिया, पंजाबमधील विजय सांपला यांच्या समावेशाने दलितांना भाजपत योग्य प्रतिनिधित्व दिले जाते, हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. राज्यांचे आणि जातीचे प्रतिनिधित्व ही राजकारणाची अपरिहार्यता मान्य केली तरी हा गाडा ओढणारे नेते विश्वासातील, कुशल प्रशासक आणि स्वच्छ प्रतिमेचे असतील, अशी खबरदारी नरेंद्र मोदी यांनी घेतलेली दिसते. आगामी सहा महिने मोदी सरकारच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा काळ ठरणार आहे. त्यासाठी सरकारमध्ये टीम मोदी सज्ज झाली तर ते सर्वांच्याच हिताचे आहे.