आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial For 16th April In Dainik Divya Marathi

वांद्रे पराभवाचे अर्थ (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील वांद्रे मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणे व काँग्रेस यांच्या पराभवाचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. एका विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून फार काही अर्थ काढू नयेत, असे म्हटले जाते. ते खरे असले तरी काही तात्कालिक अर्थ नक्की काढता येतात. वांद्रे मतदारसंघ शिवसेनेने राखला यापेक्षा राणे यांचा तेथे पराभव झाला ही महत्त्वाची बातमी ठरली. माध्यमांचा प्रभाव हे याचे मुख्य कारण. मतदारसंघातील वास्तव व माध्यमांतून होणारी चर्चा यामध्ये बरेच अंतर होते. राणे आल्यामुळे मतदारसंघातील वारे फिरले आहेत व शिवसेनेचे घामटे निघत आहे, असे चित्र इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये उभे राहिले. काही पत्रकार तर छातीठोकपणे राणे यांच्या विजयाची खात्री देत होते. एमआयएमचे नाणे चालणार नाही, उत्तर भारतीय मतदार सेनेला मतदान करणार नाहीत, राणेंसारखा तगडा उमेदवार समोर आल्यामुळे मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने पुन्हा काँग्रेसकडे वळतील, भाजप शिवसेनेला मदत करणार नाही अशा तर्कांतून सुरू झालेले विश्लेषण नंतर राणे विधानसभेत गेले की देवेंद्र फडणवीस यांना कसे जेरीस आणतील इथपर्यंत गेले होते. परंतु माध्यमांना मतदारांचे मन कळले नाही. राणेंच्या उमेदवारीमुळे शिवसेनेमध्ये त्वेष आला व त्याचा फायदा मोठा विजय मिळवण्यात झाला. त्वेष, चढाई, ईर्षा ही शिवसेनेची वैशिष्ट्ये आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्याचा सफाईने उपयोग करून घेतला. राणे उभे राहिल्यामुळे चिडीला येऊन शिवसैनिक कामाला लागले. सेनेचे हे पाणी राणे यांना कळले नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी तरी राणे यांना नाकारले आहे व नकारामध्ये सातत्य आहे हे लक्षात घेऊन त्यांनी काही दिवस विश्रांती घेतलेली बरी. शिवसेनेमध्ये त्यांच्याबद्दल चीड आहे, तर काँग्रेसने त्यांना कधीच आपले मानलेले नाही. आता तर त्यांची उपयुक्तता फारच कमी होईल. ती कशी वाढवायची हा मोठा प्रश्न राणेंसमोर राहील. केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर छद्मी टीका करून काम भागणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सर्वच टीकाकारांनी हे लक्षात घेतलेले बरे.

काँग्रेससाठी हा पराभव अधिक गंभीर आहे. राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसप, काही दलित संघटना यांनी एकत्रित ताकद लावूनही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पराभव झाला असला तरी मतांची संख्या वाढली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ती फसवी आहे. राणेंनी स्वत:ची ताकद लावली नसती व अन्य पक्ष बरोबर नसते तर काँग्रेसची मते दहा-बारा हजारांच्या पुढे गेली नसती. मोदी लाट दिल्लीत अस्ताला गेल्यानंतर आपल्याला संधी आहे, असे काँग्रेस मानत होती. त्याला धक्का बसला. मुस्लिम मते एमआयएमकडून काँग्रेसकडे वळली असली तरी ती राणे यांच्या व्यक्तिगत प्रभावामुळे. पक्ष म्हणून काँग्रेसबद्दल मुस्लिमांना आता आशा वाटत नाही. विधानसभा निवडणुकीत ते प्रकर्षाने जाणवले. मात्र, मुस्लिम मतांवर आपला हक्क प्रस्थापित करण्यात एमआयएमही अपयशी ठरली. सेना-भाजपच्या विरोधातील उमेदवार कितपत सक्षम आहे यावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होते. मुस्लिम मते फिरवणारे अन्य घटकही असतात व तेथे एमआयएमला काही करता येत नाही. हे वास्तव लक्षात घेऊन एमआयएमने पुढील वाटचाल करायला हवी.

तथापि, या निकालातून पुढे आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस सरकारबद्दल अलीकडे जे काहूर माजवले जात होते त्याला मतदारांनी िदलेले उत्तर. गोवंश हत्याबंदी व मराठी चित्रपटांसाठी राखीव वेळ या मुद्द्यांमुळे मुंबईचे मुंबईपण हरवून गेले आहे, असा जावईशोध अलीकडे काही जणांनी लावला आहे. ९५मध्ये युतीचे सरकार प्रथम सत्तेवर आले तेव्हाही अमराठी लोकांना मुंबईत राहणे मुश्कील झाले आहे, अशी ओरड सुरू करून चौकशीसाठी केंद्रातून विशेष पथक आले होते. तोच प्रकार आता सुरू आहे. गोवंश हत्याबंदी निर्णय योग्य की अयोग्य, याच्या तपशिलात जाण्याचे हे स्थळ नव्हे; परंतु अरुण जेटली यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समाज काही गोष्टींबद्दल भावनाशील असतो व त्याची कदर करावी लागते. तेव्हा गोवंश हत्याबंदीमुळे काही मुस्लिम नाराज असले तरी बहुसंख्य मतदारांनी या विषयाला फार महत्त्व दिले नाही. मराठी चित्रपटांच्या सक्तीमुळे उत्तर भारतीय मतदार खवळला, असेही म्हटले जात होते. हा मतदारसंघ कॉस्मोपॉलिटन असल्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सामान्य माणसाच्या स्वातंत्र्याची गळचेपी सुरू असल्याचा प्रचार सध्या काही गटांकडून सुरू झाला आहे. त्याकडे मतदारांनी लक्ष दिले नाही, कारण मतदारांना तसे वाटत नाही. सेना-भाजपच्या कामकाजावर मतदार खुश नसले तरी अद्याप नाराज झालेले नाहीत व संधी देण्यास तयार आहेत, तसेच काँग्रेसला अजूनही जनमानसात स्थान मिळवता आलेले नाही हे तात्कालिक अर्थ या निवडणुकीतून नक्की काढता येतात.