आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुलची पाठशाळा (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी सध्या भलतेच फॉर्मात आहेत. मोदी सरकारच्या विरोधात रोज तिखट शेरेबाजी करण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला दिसतो. भूसंपादन विधेयकावरून त्यांनी मोदी सरकारला चांगलेच खिंडीत पकडले आणि शेवटी ते विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे धाडण्यास भाग पाडले. सूटबूट की सरकार हे त्यांनी केलेले मोदी सरकारचे वर्णन जनतेच्या तोंडी बसले आहे व त्याबद्दल राहुल शाबासकीस पात्र आहेत. मात्र गुरुवारी त्यांनी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील टीका ही दुटप्पी स्वभावाचा नमुना म्हणता येईल. संघातील शिस्त व काँग्रेसमधील बेशिस्त याची तुलना करीत बेशिस्तीमध्ये सर्जनशीलता असते, असा जावईशोध राहुल गांधी यांनी लावला. काँग्रेसमध्ये अनेक जण बोलतात व त्यातून काही चांगले निष्पन्न होते, याउलट संघात सर्वजण रांगेत उभे राहतात व फक्त एकच जण बोलतो, ही नाझी जर्मनीची शिस्त आहे, असे राहुल यांचे म्हणणे आहे. यावर कडी म्हणजे कारभार जमत नसल्याने मोदी यांना सिंग यांच्याकडून धडे घेण्याची वेळ आली, असाही शोध राहुल गांधी यांनी लावला.
राहुल गांधींची टीका टाळ्या मिळवणारी आहे. काँग्रेसचे समर्थक व मोदीद्वेष्टे हे सर्व या शेरेबाजीवर खुश होतील. मोदींना व संघाला सणकावणारा काँग्रेसमधून पुढे आला की यांना हर्षवायूच होतो. तथापि, या टीकेमध्ये खरोखर वास्तव किती आणि राहुल गांधी जी बडबड करीत आहेत त्यामागे वैचारिक निष्ठा आहे की दांभिकता, हे शोधले पाहिजे. मोदींना वेसण घालणारा तगडा विरोधी पक्षनेता असावा यात शंका नाही; पण त्या नेत्याकडील दृष्टी ही देशाचा भविष्यकाळ घडवणारी असावी की देशाला गरिबीत खितपत ठेवणारी असावी, याचा विचार झाला पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेेवक संघात स्वतंत्र विचारांना वाव नाही, वेगळे बोललेले चालत नाही, असे गांधी म्हणाले ते खरेच आहे. संघ व सर्जनशीलता यांचे कधी जमले नाही. पण चिकाटी व संस्थाबांधणी हे गुण संघाकडे नक्कीच आहेत. या चिकाटीवरच संघाने दिल्ली हस्तगत केली हे विरोधकांनी मान्य केले पाहिजे. तथापि, काँग्रेसमध्ये तरी सोनिया-राहुलशिवाय अन्य कोणाच्या विचारांना वाव आहे? पंतप्रधानपदी असूनही मनमोहनसिंग यांची अवस्था कशी होती हे संजय बारूंच्या पुस्तकातून तपशीलवार सिद्ध झाले आहे. पंतप्रधानांचा आदेश - त्यांच्या अनुपस्थितीत - जाहीरपणे टरकावणे हे स्वातंत्र्याचे लक्षण होते काय? देशावर आणीबाणी लादणाऱ्या पक्षाच्या नेत्याने अन्य संघटनांमधील मुस्कटदाबीवर बोलावे यासारखा दांभिकपणा नाही. गांधी घराण्याचा कल लक्षात घेऊन बोलणे यापलीकडे काँग्रेसमध्ये कोणते स्वातंत्र्य नेत्यांना होते वा आहे, हे राहुल गांधींनी स्पष्ट केले तर बरे होईल. उच्चार व वर्तनस्वातंत्र्याचा देखावा काँग्रेसने नेहमीच चांगला केला व जनता त्याला भुलत गेली. मात्र काँग्रेसचा कारभार हा एकचालकानुवर्तीच राहिला, यात शंका नाही. याची असंख्य उदाहरणे देता येतील. तेव्हा संघाच्या मुस्कटदाबीवर बोलण्याचा अधिकार निदान राहुल यांना नाही.
मोदींनी मनमोहनसिंग यांच्याकडून धडे घेतले ही राहुल गांधींची माहिती खरी असेल तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. स्वागत यासाठी की देशाच्या अर्थनीतीत मनमोहनसिंग यांना खरोखर गती आहे. राहुल महाशयांनी देशाचा कारभार चालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मनमोहनसिंग यांना िदले असते तर मोदींना पंतप्रधानपद मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. सोनिया-राहुल व त्यांच्याभोवतीचे राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे कोंडाळे यांच्या विळख्यामुळे मनमोहनसिंग यांची घुसमट झाली व देशाची गाडी घसरली. मनमोहनसिंग यांना भेटण्यास मोदींनी खरे तर उशीर केला. मोदींनी याआधीच मनमोहनसिंग, चिदंबरम अशांची मदत घेतली असती तर अच्छे दिन अधिक स्पष्टपणे लोकांच्या नजरेस आले असते. मनमोहनसिंग यांच्या पाठशाळेची गरज मोदींपेक्षाही अधिक राहुल गांधी यांना आहे. कारण ते करीत असलेले गरिबीचे राजकारण मनमोहनसिंगांना कधीही मान्य नव्हते. निष्ठेपायी ते गप्प बसतात इतकेच. गरिबांना गरिबीतून बाहेर पडण्याची संधी न देता मते मिळवण्याचे काँग्रेसचे वर्षानुवर्षांचे डावपेच घातक ठरतील हे सिंग यांनी अर्थमंत्री असतानाच लक्षात आणून दिले होते. सोनिया व राहुल यांना ते मान्य झाले नाही.
गरिबांचा मतलबी कैवार व धर्मांध शक्तींची भीती या कालबाह्य ठरलेल्या प्रचारावर राहुल गांधी विसंबून असल्याने अज्ञातवासातील चिंतनातून त्यांच्या हाती नवीन काहीच लागलेले नाही. यामुळेच मोदींची लोकप्रियता कमी होत असली तरी राहुल गांधींची वाढलेली नाही. माध्यमे त्यांच्यावर सध्या फिदा असली तरी याच माध्यमांच्या सर्वेक्षणांनी मोदींबरोबर राहुल यांचीही लोकप्रियता घटलेली दाखवली आहे. याचे कारण देशातील बदलत्या मानसिकतेचे भान अजूनही राहुल गांधींना आलेले नाही. त्यांचे शालेय शिक्षण अद्याप अपुरेच आहे.
बातम्या आणखी आहेत...