आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्थिरतेचे धनी! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले नाही, त्यामुळे राजकीय राजधानी दिल्ली अस्थिर झाली आणि महाराष्ट्रात सरकार तर स्थापन केले; पण अस्थिरता संपलेली नाही, म्हणून आर्थिक राजधानी मुंबई अस्थिर! देशातील दोन सर्वात महत्त्वाची राज्ये जर अशी दीर्घकाळ अस्थिर असतील तर देश पुढे घेऊन कसा जाणार हा प्रश्नच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काय चालले आहे, ते सामान्य माणसाच्या मनातील राजकारणाचा तिटकारा आणखी वाढविणारे आहे. राजकारणाचा आचार आणि विचाराशी काही संबंध नसतो, संबंध असतो तो फक्त स्वार्थाचा म्हणजे खुर्चीचा, असे सरसकट म्हटले जाते; पण दुर्दैवाने ते राजकीय पक्षांनी खरे ठरविले आहे. केंद्रात सत्ता काबीज केलेल्या भाजपला महाराष्ट्रात सर्वात अधिक जागा मिळाल्या आहेत आणि प्राप्त परिस्थितीत त्या पक्षाने सरकार स्थापन करण्याचा कौल जनतेने दिला आहे. अर्थात त्यासाठी त्याला शिवसेनेची मदत घ्यावी लागेल, असा हा कौल आहे; पण गेल्या २५ वर्षांची युती मोडून हे पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. असे करून आपण मतदारांची प्रतारणा करत आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. भाजप आणि शिवसेनेने आपल्या युतीला छोट्या आणि मोठ्या भावाची उपमा वापरली आहे. इतके दिवस छोटा असलेला भाऊ म्हणजे भाजप निवडणुकीने मोठा भाऊ, तर शिवसेना छोटा भाऊ झाला आहे. भावाची उपमा वापरली म्हणून भाऊबंदकीचा असा ‘आदर्श’ घेण्याची काही गरज नव्हती. भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशा जाहिराती केल्या होत्या. त्या वादग्रस्त ठरल्यावर मागे घेण्यात आल्या. मात्र, आता महाराष्ट्र हाती दिल्यानंतरचे जे वर्तन आहे, ते पाहता पुढील काळात महाराष्ट्र नेमका कोठे नेऊन ठेवला जाईल, अशी भीती वाटू लागली आहे. आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, अशी सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि तो शब्द त्यांनी पाळला खरा; पण सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे केंद्रीय नेतृत्व कमी पडले आहे. शिवसेनेवर भाजप टीका करत नसला तरी शिवसेनेची कोंडी करण्याचे काम केले जाते आहे. ज्या मुद्द्यांवर शिवसेना उभी आहे, ते पळविण्याचे काम भाजपने मोठ्या खुबीने केले आहे. अर्थात निवडणूक प्रचार आपापल्या पद्धतीने करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र, निवडणूक निकालानंतर जे सामंजस्य दिसणे अपेक्षित होते, ते गेल्या २० दिवसांत कोठेही दिसले नाही. दिल्लीत सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले नाही, त्यामुळे राजकीय राजधानी दिल्ली अस्थिर झाली आणि महाराष्ट्रात सरकार तर स्थापन केले; पण अस्थिरता संपलेली नाही, म्हणून आर्थिक राजधानी मुंबई अस्थिर! देशातील दोन सर्वात महत्त्वाची राज्ये जर अशी दीर्घकाळ अस्थिर असतील तर देश पुढे घेऊन कसा जाणार हा प्रश्नच आहे.
मोठा भाऊ म्हणून भाजपची जबाबदारी अधिक असली तरी शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आपली भूमिका विसरला आहे, असेच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे शपथविधीला जाणार की नाही, याची बातमी होणे, केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी गेलेल्या नेत्याला दिल्ली विमानतळावरून परत बोलावणे, या सगळ्या गदारोळात आपला एक मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवावा की नाही, याचा निर्णय न होणे आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपला सोबत ठेवायचे की नाही, हे शिवसेना अद्याप ठरवू शकलेली नाही. आपल्याला मतदारांनी छोट्या भावाची भूमिका बजावण्यास सांगितले आहे, हे शिवसेनेला रुचले नाही, त्यावरून होणारे दु:ख समजण्यासारखे आहे; मात्र सारखे हट्ट धरून बसणे योग्य नाही. जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारला कंटाळली होती, म्हणून जनतेने बदल म्हणून भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर बसण्याचा कौल दिला आहे. भाजप आणि शिवसेनेने फार पराक्रम केला म्हणून दिलेला तो कौल नाही, याची जाणीव या दोन पक्षांच्या नेत्यांना दिसत नाही. पहिल्या दिवशी शिवसेनेने जो तमाशा केला तो तर अतिशय निषेधार्ह आहे. मराठी शाळांत उर्दूचा समावेश ऐच्छिक विषयांत करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. अशा निर्णयावर ताशेरे ओढून शिवसेनेने मंत्र्यांना हिरवी टोपी भेट देण्याची भाषा केली. याचा अर्थ जग बदलले तरी शिवसेना बदलायला तयार नाही. उद्धव ठाकरे ज्याला आक्रमक हिंदुत्ववाद म्हणतात, तो हा नव्हे. भावनिक मुद्द्यांवर गुजराण करणारी शिवसेना ताज्या निवडणुकीतून काही धडा घेण्याची शक्यता दिसत नाही. पाठिंबाही जाहीर करावयाचा नाही आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला जातो, यावरून आदळआपट करायची, हे न समजण्यासारखे आहे. थोडक्यात, आघाडी सरकारने महाराष्ट्राचे फार नुकसान केले, असा दावा करणारे भाजप, शिवसेनेचे नेते जर एकत्र येऊन सरकारही स्थापन करू शकत नसतील तर भविष्यात मतदार त्यांना माफ करणार नाहीत.