आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा "जनता' प्रयोग (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या राजकारणात जनता पार्टीने इतिहास घडवत १९७७ मध्ये इंदिरा गांधी सरकारचा दारुण पराभव करून पहिल्यांदा केंद्रात बिगर काँग्रेस सरकार स्थापन केले होते. देशात काँग्रेसच्या राजकारणाला विरोध करणारे समांतर राजकारण असावे, अशी राममनोहर लोहिया यांची इच्छा होती व त्यांच्याच विचारसरणीतून पुढे जनता पार्टी आकारास आली. पण या पक्षाचे सरकार पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, हेवेदावे व प्रत्येक नेत्याचे नैतिक अहंभाव यामुळे केवळ दोन वर्षांत कोसळले व देशव्यापी काँग्रेसविरोधी राजकारण उभे करण्याचा प्रयत्न फसला. नंतर सुमारे १२ वर्षांनी १९८९मध्ये बोफोर्स प्रकरणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात पुढे आणत काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी जनता पार्टीची पुन्हा मोट बांधली आणि राजीव गांधी यांचा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पराभव केला. विश्वनाथ प्रताप सिंग यांची त्या वेळची लोकप्रियता मध्यमवर्गाला आकर्षित करणारी होती, पण मंडल आयोग अमलात आणण्याच्या निमित्ताने त्यांचे सरकार गोत्यात आले. पुढे १० वर्षे जनता पार्टी राष्ट्रीय राजकारणात केवळ अस्तित्वापुरती होती. पण राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस व भाजप हे दोन पक्ष कमकुवत होताच निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत स्वत:च विस्कळीत असलेल्या जनता पार्टीने १९९६ व १९९८मध्ये तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून केंद्रात आपले सरकार आणण्याची किमया केली. पण हाही प्रयोग दोन वर्षांपेक्षा अधिक चालला नाही. जनतेने या पक्षाला केंद्रीय राजकारणातून झिडकारले व त्यांचे उरलेसुरले अवशेष दोनचार राज्यांत शिल्लक राहिले. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक वर्ष काँग्रेस जशी अशक्त होत गेली व भाजपला बहुमत मिळणार नसल्याची शक्यता पाहता पुन्हा जनता पार्टीचा म्हणजे तिसऱ्या आघाडीचा प्रयोग उभा करण्याचा प्रयत्न झाला. पण तो कागदावरच राहिला. त्यानंतर केंद्रात भाजपला एकट्याला बहुमत मिळाल्याने राजकारणाचा पोतच बदलून गेला आणि ज्या काँग्रेसविरोधी राजकारणातून जनता पार्टीचा जन्म झाला, त्याच्यापुढे आता काँग्रेस नव्हे, तर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या व मुक्त भांडवलशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपचे आव्हान निर्माण झाले. या वर्षअखेर बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असून तिथे भाजपला रोखण्यासाठी बुधवारी हे सर्व जनता नेते एकत्र आले होते. त्यांचे हे मनोमिलन ही त्यांच्या अस्तित्वासाठीची गरज होती. कारण तसे झाले नसते तर या नेत्यांचे उरलेसुरले राजकारणही धोक्यात आले असते.

जनता पार्टीचा हा प्रयोग नव्याने आकारास येण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, जनता दल (संयुक्त), जनता दल (सेक्युलर), इंडियन नॅशनल लोकदल, समाजवादी जनता पार्टी या विखुरलेल्या जनता नेत्यांना मोठ्या प्रमाणात धोबीपछाड दिला होता. सध्या या सर्व जनता नेत्यांची लोकसभेतील सदस्यसंख्या १५ व राज्यसभेत ३० आहे आणि देशातील बिहार व उत्तर प्रदेश ही दोनच राज्ये त्यांच्याकडे आहेत. मध्यंतरी बिहारमध्ये जितनराम मांझी यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात बंड केल्यामुळे बिहारचे राजकारण ढवळून गेले होते. मांझी यांनी बंडातून जनता दल(सेक्यु.)चा महादलित मतदार आपल्याकडे वळवल्यामुळे भाजपसाठी ते पथ्याचे झाले होते. त्यात भाजपने लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सर्वच वर्गांना आपल्याकडे खेचून घेण्याची कामगिरी केल्याने नितीश कुमार व लालूप्रसाद यादव या दोघा नेत्यांच्या राजकारणाला धक्का बसला होता. दुसरीकडे उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपने ८० पैकी ७२ जागा जिंकल्यामुळे व तेथील समाजवादी पार्टीचा कारभार यथातथाच असल्याने पक्षात भूकंप झाला होता. भाजपने उत्तर प्रदेशात मिळवलेले हे ऐतिहासिक यश निश्चितच मुलायम सिंह व अखिलेश यादव यांच्या दृष्टीने धोक्याचा इशारा होता. एकंदरीत भाजपची धास्ती घेतल्यामुळे बुधवारच्या जनता पार्टीच्या मनोमिलन सोहळ्यात पक्षाचे नेतृत्व मुलायम सिंह यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला गेला. कारण मुलायम सिंह हे तसे जुने लोहियावादी बुजुर्ग नेतेच आहेत व राष्ट्रीय राजकारणात ते तोडफोडीचे, जोडाजोडीचे राजकारण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या राजकारणाचा नितीश, लालू, देवेगौडा आदींना थेट उपद्रव नाही. म्हणजे प्रादेशिक नेत्यांच्या राजकारणावर अध्यक्षाचा अंकुश राहू नये व पक्षाच्या अध्यक्षावरही पार्टीमधील संघर्षाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे बिहार हा लालू, नितीशमध्ये वाटून देण्यात येईल, देवेगौडांना कर्नाटक तर अभय चौटाला-कमल मोरारका यांना हरियाणा देण्यात येईल. मुलायम तसे नामधारी राहतील, पण या जनता प्रयोगाने बिहारमध्ये भाजपपुढे संकटे उभी राहतील; शिवाय केंद्रीय राजकारण भाजप विरुद्ध काँग्रेस असे दुरंगी होणार नाही, त्यात आपलाही एक रंग पेरण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला आहे. हा प्रयोग किती दिवस टिकतोय, हे पाहणे महत्त्वाचे आहे.