आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यथोचित न्याय (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अांतरराष्ट्रीय क्रीडा जगताला न्यायालयाकडून धक्का मिळालेल्या आणि आणखी काळीमा फासणाऱ्या दोन्ही घटना योगायोगाने बुधवारी घडल्या. त्यापैकी एक होती स्पेनची राजधानी माद्रिदमधील सर्वोच्च न्यायालयातली, तर दुसरी होती दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया येथील सर्वोच्च न्यायालयामधली. दोन्ही न्यायालयांचे निवाडे हे त्या त्या क्षेत्रातील अांतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्गज खेळाडूंना गुन्हेगार ठरवणारे, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध ठरवणारे आहेत. अर्जेंटिनाचा फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सी व दोन्ही पायांनी अपंग असलेला आफ्रिकेचा धावपटू आॅस्कर प्रिस्टोरियस हे दोघेही गुन्हेगार खेळाडू २९ वर्षांचे हा आणखीन एक योगायोग. पाच वेळा सर्वोत्कृष्ट फुटबाॅलपटू ठरलेला आणि जगातील फुटबाॅलप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला मेस्सी याला करचुकवेगिरीमुळे २२ लाख युरोज् (सुमारे १५ कोटी रुपये) दंड व २१ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने केली. याच आरोपावरून त्याचे वडील जाॅर्ज यांनाही तेवढाच तुरुंगवास व १५ लाख युरोज (सुमारे ११ कोटी रुपये) दंड केला. सर्वाधिक उत्पन्न मिळणाऱ्या जगातील खेळाडूंची यादी फोर्ब्ज या नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे. त्यात मेस्सी दहाव्या क्रमांकावर आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशावर कर द्यावा लागू नये म्हणून मेस्सीने ब्राझील, उरुग्वे, स्वित्झर्लंड या देशांमधील बोगस कंपन्यांचा वापर केला. करबुडव्यांसाठी स्वर्ग अशी या तिन्ही देशांची जगभर ख्याती आहे. २००५ मध्ये मेस्सी व त्याचे वडील जाॅर्ज या दोघांनीही स्पेनचे नागरिकत्व स्वीकारले होते. करचुकवेगिरीसाठीच मेस्सी पिता-पुत्रांनी हा मार्ग स्वीकारला होता. सरकारला कर द्यावा लागू नये म्हणून आणखी एका देशाचे नागरिकत्व मिळवण्याची उदाहरणे भारतातही बरीच आहेत.

तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीत पॅराआॅलिम्पिक खेळाडू आॅस्कर प्रिस्टोरियस याची सहा वर्षांसाठी न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली. प्रिस्टोरियस हा वयाच्या ११ व्या महिन्यातच अपंग झाला. त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून कापावे लागले. असे असतानाही त्याने पॅराआॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले. टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची अनेकांना स्फूर्ती देणारा प्रिस्टोरियस खुनाच्या आरोपात अडकला. त्याने त्याची प्रेयसी रिव्हा स्टीनकँप हिचा गोळ्या घालून खून केला. चोर समजून मी स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्याचा प्रिस्टोरियसचा बचाव न्यायालयाने मानला नाही. सहा वर्षांसाठी त्याची तुरुंगात रवानगी केली. त्याच्या गुन्ह्याला १५ वर्षांची शिक्षा आहे. त्याच्या वागणुकीमुळे ती सहा वर्षांवर आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारच्या निवाड्याने गुन्हेगार खेळाडूंच्या यादीत मेस्सी व प्रिस्टोरियस यांची भर पडली. बाॅक्सिंग चॅम्पियन माइक टायसनला बलात्काराच्या आरोपावरून दहा वर्षांची शिक्षा झाली होती. त्यातील तीन वर्षे त्याने भोगली. अमेरिकेचा फुटबाॅलपटू ओजे सिम्पसन यास चोरी व अपहरण प्रकरणी ३३ वर्षांची शिक्षा झाली. तो आजही तुरुंगात आहे. ई. डी. इव्हान्स हा इंग्लंडचा फुटबाॅलपटू बलात्काराच्या आरोपावरून पाच वर्षांची शिक्षा भोगतोय. अँड्यू जाॅन्सन हा फुटबाॅलपटू लहान मुलासोबत लैंगिक कृत्य केल्याबद्दल सहा वर्षांसाठी तुरुंंगात आहे. टीम माँटीगोमेरी हा धावपटू भ्रष्टाचार व अमली पदार्थाच्या व्यापारामुळे पाच वर्षांची शिक्षा भोगतोय.

दिग्गज खेळाडू किंवा सेलिब्रिटीज यांना अशी शिक्षा झाल्याची अनेक उदाहरणे विविध देशांमध्ये आहेत; पण भारतात मात्र याबाबत उलट स्थिती आहे. मेस्सीची करचुकवेगिरीच्या आरोपातून सुटका झाली नाही; पण भारतात मात्र कर चुकवून फेरारी कार देशात आणल्यानंतर त्याला कर सवलत देण्यासाठी त्या वेळच्या भाजप सरकारच्या नेत्यांना घाई झाली होती. प्रिस्टोरियसने खून केल्यानंतर जवळपास साडेतीन वर्षांनीच त्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. भारतात मात्र असले खटले वर्षानुवर्षे चालतात. २००२ मध्ये हिट अँड रन खटल्यात आरोपी असलेल्या सलमान खानची अजून सुनावणी चालूच आहे. करचुकवेगिरीचे आरोप असलेली अनेक बडी मंडळी देशात आहेत; परंतु ते कधी तुरुंगात गेल्याचे दिसत नाही. त्यांच्यावरील खटल्यांचा निकाल न्यायालयात लवकर लागत नाही. कधी कधी न्यायालयदेखील अशा लोकांसाठी विशेष सौम्यभाव स्वीकारते की काय, ते सलमान वरच्या खटल्याच्या सुनावणीतून वाटते. लोकशाहीमध्ये सर्व माणसे समान असतात; पण काही माणसे अिधक समान असतात, असे म्हटले जाते. याचा पुरेपूर अनुभव भारतात पदोपदी येतो. सलमानला जसा खटला लांबवता आला तसा एखाद्या सामान्य माणसाला तो कधीच लांबवता येणार नाही. त्यामुळे परदेशात दिसणारी न्यायनिष्ठूरता ही भारतात कधी दिसेल हे कोणीही सांगू शकणार नाही, हेही तितकेच खरे.
बातम्या आणखी आहेत...