आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्कड फडणविशी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मंत्रिमंडळ विस्तार अधिक अडचणीचा होता. कारण मोदींसारखी फडणवीसांची महाराष्ट्रातली सत्ता स्वबळावरची नाही. कमी पडलेल्या २२ जागांसाठी त्यांनी शिवसेना या प्रमुख पक्षासह इतर छोट्या पक्षांचा टेकू घेतला आहे. साहजिकपणे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर राजकीय परावलंबित्वाची छाया पडतेच. मंत्रिमंडळाचा विस्तार ही तर मोठी बाब. पक्षांतर्गत कुरघोड्यांचे भान ठेवावे लागते. जातीय, प्रादेशिक दबावगट लक्षात घ्यावे लागतात. जोडीला मित्रपक्षांच्या अपेक्षा. या पार्श्वभूमीवरचा विस्तार फडणवीसांची सरकारवरची पकड मजबूत करणारा असल्याचे म्हणावे लागते. जातीय समीकरणे त्यांनी जुळवलीच; त्याहून महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेची सोबत घेण्यात ते यशस्वी झाले. पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, संभाजीराव निलंगेकर यांच्या समावेशाने सरकारचा बहुजन चेहरा ठळक झाला. महादेव जानकर आणि राम शिंदे यांच्या रूपाने धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्रिपदे पहिल्यांदाच मिळाली.

पांडुरंग फुंडकर, संभाजीराव निलंगेकर आणि जयकुमार रावल या आर्थिक घोटाळ्यांमधल्या आरोपींना मंत्रिपदाची बक्षिसी का मिळाली, हा प्रश्न मात्र फडणवीसांच्या स्वच्छ चेहऱ्याला अडचणीत आणणारा आहे. शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ सत्तेपुढे म्यान झाल्याच्या वास्तवावरही एकदाचे शिक्कामोर्तब झाले. दिवंगत शरद जोशींनी अटलबिहारी वाजपेयींना पाठिंबा दिला तेव्हा याच शेट्टींनी तात्त्विकतेचा बुरखा ओढला. जातीयवाद्यांशी केलेली हातमिळवणी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा आव आणत शेट्टींनी जोशींपासून फारकत घेतली. त्याच शेट्टींनी दोन वर्षांपूर्वी भाजपशी मैत्री केली. भाजपची सत्ता आल्यापासून मंत्रिपद मिळत नसल्यावरून अनेकदा थयथयाटही केला. सदाभाऊ खोत शपथ घेत असताना शेतकरी संघटनेतल्या जुन्या-जाणत्यांना शेट्टींच्या राजकारणातले हे सोयीस्कर वळसे नक्कीच जाणवले असणार; त्याच वेळी खोत या मातीतून उगवलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याने गेली दोन दशके खाल्लेल्या खस्तांचे चीज झाल्याचा आनंददेखील अनेकांना झाला असेल. महादेव जानकरांचे मंत्रिपदसुद्धा फडणवीसांबद्दलचा विश्वास वाढवणारे ठरले. डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेची खासदारकी आणि जानकरांचे मंत्रिपद यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर धुमसणारे धनगर शांत होतील या भ्रमात मात्र भाजपने न राहिलेलेच बरे.

शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील राज्यमंत्री झाल्याने फडणवीसांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेत सरकारला धारेवर धरण्याची क्षमता असणारे हे आक्रमक शिवसैनिक स्वतःच मंत्री झाल्याने फडणवीसांच्या तोंडाला आराम मिळू शकेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे भाजपला नालायक ठरवणाऱ्या शिवसेना नेतृत्वाने सत्तेसमोर लोटांगण घातल्याचे चित्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर जनतेपुढे आले. उद्धव ठाकरे यांनी लाचार नसल्याचा कितीही कंठशोष केला तरी शिवसेनेच्या वाघाने सत्तेसाठी केलेली ‘म्यांव-म्यांव’ स्पष्टपणे लोकांना ऐकू गेली आहे. एकीकडे खुशाल सत्ता मिरवायची आणि दुसरीकडे त्याच सरकारला नावे ठेवायची असा दुतोंडीपणा शिवसेनेने यापुढेही चालू ठेवला तर यातून भाजपचा फायदाच होईल. फडणवीसांनी निवडलेल्या नव्या सहकाऱ्यांमुळे सरकारचे स्थैर्य वाढले आहे. आता लक्ष मंत्रिमंडळाच्या फेररचनेवर असेल. गृह राज्यमंत्रिपद शिवसेनेकडे जाणार असल्याने या पदावर शिवसेनेतून आपल्या पसंतीचा माणूस येईल, याची काळजी फडणवीसांना घ्यावी लागेल. महसूल, सहकार, कृषी, पशुसंवर्धन या खात्यांवर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचा शिक्का बसला आहे. त्यामुळे या खात्यांची जबाबदारी घेणारे नवे शिलेदार स्वच्छ राहतील, यावर मुख्यमंत्र्यांना नजर ठेवावी लागेल. अन्यथा नव्याने ‘गजानन पाटलां’ची उपज येथे झाली तर सरकारची प्रतिमा काळवंडेल. काही नवख्या आणि काही बोलघेवड्यांचा पाय घसरू न देण्याचे आव्हान फडणवीसांसमोर असेल. त्यांनी विस्तार तर फक्कड घडवून आणला; तरी सरकारचा एकखांबी तंबू अजून फडणवीसच आहेत. राजकीय, जातीय समतोल जपणाऱ्या या सरकारच्या खात्यावर फार काही जमा नाही. आघाडी सरकारला दूषणे देण्यात दोन वर्षे उडून गेली. मंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे हसू जनतेच्या चेहऱ्यावरही उमलावे, यासाठी अवधी फार नाही. ‘रात्र थोडी सोंगे फार’ या आव्हानाचा विसर फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांनी पडू देऊ नये.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...