आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतांसाठी व्यूहरचना (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित विस्तार अखेरीस पार पडला. या दुसऱ्या विस्तारादरम्यान १९ खासदारांना राष्ट्रपतींनी मंत्रिपदाची शपथ दिली. मंत्रिमंडळाची कार्यक्षमता आणि गतिमानता वाढवण्याच्या दृष्टीने लायक मंत्र्यांची निवड केल्याचे भाजपचे म्हणणे फार मनावर घेण्याचे कारण नाही. मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिलांना प्रतिनिधित्व देत ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा बिंबवण्याचा मोदींनी केलेला प्रयत्न या विस्तारात स्पष्टपणे दिसतो. नव्या मंत्र्यांमध्ये सात मागासवर्गीय, दोन अल्पसंख्याक आणि दोन महिलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच नव्या मंत्र्यांची निवड करताना पंतप्रधान ‘इलेक्शन मोड’मधे जाणे स्वाभाविक मानले पाहिजे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपचे ७१ खासदार निवडून आले होते. यात वाराणसीतून स्वतः नरेंद्र मोदींचाही समावेश होता. पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत या धो-धो यशाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे सध्या तरी दृष्टिपथात नाहीत. मुलायमसिंह आणि मायावती या तगड्या प्रतिस्पर्ध्यांच्या ‘व्होट बँके’ला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला कंबर कसावी लागणार आहे. पंतप्रधान ज्या राज्यातून निवडून आले त्या राज्यात पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला तर केंद्रातल्या सरकारची प्रतिमा ढासळणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची निवडणूक मोदी-अमित शहा जोडगोळीसाठी प्रतिष्ठेची आहे. म्हणूनच नव्या चेहऱ्यांची निवड अत्यंत विचारपूर्वक झाल्याचे दिसते. मुलायम-मायावती यांना वगळून इतर छोटे पक्ष आणि छोट्या जातींची मोट बांधण्याची रणनीती भाजपने आखली आहे. ‘अपना दल’च्या अनुप्रिया पटेल यांना मंत्री करून कुर्मी समाजाशी नाळ जोडण्याचा मनसुबा याचाच भाग म्हणावा लागतो. महेंद्र पांडे (ब्राह्मण) आणि कृष्णा राज (दलित) या खासदारांना मंत्रिपदे देऊन उत्तर प्रदेशातील प्रभावी समूहांना जवळ करण्याचा प्रयत्नदेखील मोदींनी केला आहे. गुजरातमधल्या पटेलांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुमसणारा असंतोष शमवण्यासाठी दोन पटेल खासदारांना मोदींनी मंत्रिपदे दिली आहेत. हे दोघेही मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात होतेच. जुने विश्वासू सहकारी दिल्लीत आणून मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळातील स्वतःची एकाधिकारशाही अबाधित राखली आहे. मित्रपक्षांचा अपवाद वगळता इतर सर्व मंत्री ‘बिनचेहऱ्याचे’ असतील याचीही काळजी घेतली गेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे ढोबळ वर्णन ‘चुनावी जुमला’ असे केले तर वावगे ठरू नये.

महाराष्ट्रातून रामदास आठवले यांचे घोडे एकदाचे ‘विस्तार’गंगेत न्हाऊन निघाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुटकेचा निःश्वास सोडला असेल. आठवले यांच्या मंत्रिपदाचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला होऊ शकतो. शिवाय, मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळल्याचा संदेश देण्याचे कामही यातून झाले. पीयूष गोयल यांच्याऐवजी प्रकाश जावडेकरांना मिळालेल्या बढतीचे आश्चर्य त्यांना स्वतःलाही वाटले असणार. खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना झालेला राजकीय अपघात सुभाष भामरे यांच्या पथ्यावर पडला आणि महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद आले. बहुजनांना दाबले जात असल्याच्या आरोपातून सुटका होण्यासाठी भामरे यांची निवड भाजपला उपयुक्त ठरणारी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक कुतूहल होते ते शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार की नाही याचे. मात्र, तसे न घडूनदेखील शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेले दिसले. उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीशिवाय हे घडणे शक्य नव्हते हे उघड आहे. याचा अर्थ केंद्रात शिवसेनेला जागा मिळणार नसल्याची पुरती कल्पना शिवसेना नेतृत्वाला यापूर्वीच देण्यात आलेली होती. केंद्रातले पद मिरवण्याऐवजी राज्याच्या सत्तेत अधिक वाटा मिळवण्यासंदर्भातला शब्द शिवसेनेने घेतला असण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. तसे घडले असल्यास ठाकरे यांची राजकीय दूरदृष्टी चांगली असल्याचे म्हणावे लागेल. शिवसेना-भाजपत अलीकडे ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेबरोबर वाटाघाटी करण्यात भाजपला आलेले यश ही फडणवीसांसाठी सकारात्मक बाब आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा रखडलेला मार्गही मोकळा झाला आहे. देशपातळीवरील जातीय गणिते जुळवतानाच दहा राज्यांना मंत्रिपदे देऊन प्रादेशिक समतोल राखण्यात मोदी यशस्वी झाले; तोच कित्ता फडणवीस गिरवताना दिसतील.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...