आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक लेखणीचे दुखणे (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत धारदार व लक्षवेधी लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तिखट व तेज लेखणीचे जाहीर कौतुक बाळासाहेब ठाकरे करीत असत. अशा कौतुकास ही लेखणी पात्र होती यात शंका नाही. बाळासाहेब होते तोपर्यंत त्यांच्या चालीने ही लेखणी चालत होती. त्यामागे काही डावपेच असत आणि ते शिवसेनेला समोर ठेवून केलेले असत. बाळासाहेबांच्या पश्चात चित्र बदलले. अलीकडे राऊतांची लेखणी सेनेला बळ पुरवण्याऐवजी सेना नेतृत्वाला खिंडीत पकडण्यासाठी चालवली जाते काय, अशी शंका लोकांनाच नव्हे तर शिवसैनिकांनाही येते. शिवसेना ही भाजपबरोबर सत्तेत असली तरी राऊतांची लेखणी विरोधकाची भूमिका बजावते. सच्च्या विरोधकाची नव्हे तर खिंडीत गाठणाऱ्या विरोधकाची. मुस्लिम लोकांबद्दल जहाल विधान करून राऊतांनी नवा वाद पेटवला. यापूर्वी मोदी-शहा जोडीला त्यांनी फटके लगावले होते. शीर्ष नेत्यांवर गोळीबंद शाब्दिक मारा करून जेरीला आणण्याचे कसब राऊतांना चांगले अवगत आहे. राऊतांची दिल्लीच्या राजकारणात तशी चांगली ऊठबस आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची काँग्रेसशी लगट सुरू असताना शिवसेना-राष्ट्रवादी गणित जुळवण्याची शिष्टाई राऊत करीत होते असे बोलले जाते. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले असल्याने त्यांच्या मताला पक्षातही गांभीर्याने घेतले जात होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी नव्याने संघटना बांधण्यास सुरुवात केली तेव्हा राऊतांना बाजूला सारण्यात आले. त्यांचे प्रवक्तेपदही काढून घेण्यात आले. पण राऊतांसारखी धारदार लेखणी चालवण्याचे कसब उद्धवसाहेबांच्या कारकून मंडळात नव्हते. माध्यमातून ‘सामना’ करण्यासाठी राऊतच हवे होते. त्यामुळे ती जहागिरी कायम राहिली. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील प्रसंग असो वा एमआयएम या संघटनेच्या वाढत्या प्रसाराचा विषय असो िकंवा मोदी-शहा जोडगोळीने सेनेला दिलेली सापत्नभावाची वागणूक असो, राऊतांच्या लेखणीची चपराक कोणाचीच तमा बाळगीत नाही. रविवारच्या लेखामध्ये असेच झाले आहे. मात्र, मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे हा रोखठोक बाणा सेनेच्याच अंगलट येणारा आहे. तसा तो येणार असल्याचा अंदाज असल्यानेच ‘व्होट बँकेची सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा,' असा बाळासाहेबांच्या वक्तव्याचा दाखला त्यांनी आधीच देऊन ठेवला आहे. म्हणजे ‘मातोश्री’तून विचारणा झाली तर बाळासाहेबांची ढाल पुढे आहे. मताधिकाराच्या विधानात कितपत तथ्य आहे हे तपासण्यात अर्थ नाही. सामना काय, रोखठोक काय, हे शैलीदार फटकेबाजीचा आनंद घेण्यासाठी वाचायचे असतात, विचारपूर्वक लिखाणासाठी नव्हे. व्होट बँकेचे तर्कशास्त्र लावले तर मराठी माणसाचाही मतदानाचा हक्क काढून घ्यावा लागेल. कारण मराठी व्होट बँकेवरच शिवसेनेची भरभराट झाली आहे. राज्यघटनेत मतदानाचा अधिकार हा व्यक्तीच्या, समाजाच्या आर्थिक कुवतीवर किंवा त्यांच्या धर्म, जातींवर दिलेला नाही, तर सरसकट सर्वांना देण्यात आला आहे. हा लोकशाहीतला मूलभूत अधिकार आहे. जातीय अस्मिता, सवलती यांचे राजकारण कोणता राजकीय पक्ष करत नाही? शिवसेना जन्मास आली ती मराठी अस्मितेच्या जोरावर व तिला अधिक कडवे करण्यात राऊतांची लेखणी आघाडीवर होती. आज ओवेसी बंधू तेच डावपेच राज्यघटनेच्या आधाराने खेळत आहेत. त्याला लोकशाही मार्गानेच उत्तर दिले पाहिजे. लोकशाही मार्गानेच शिवसेना वाढली. आज मुंबईत सत्ता व दिल्लीत सहभाग अशी दुहेरी संधी समोर आल्यावर राऊतांच्या लेखणीकडून वेगळ्या कामगिरीची अपेक्षा होती. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे व रोजगार वाढवण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना लोकांची तशी मानसिकता घडवणे, अस्मितेच्या भ्रांत राजकारणातून जनसमूहाला बाहेर काढून आर्थिक उन्नतीच्या मार्गाला लावणे, हे राऊतांच्या लेखणीकडून अपेक्षित होते. तथापि, वक्रोक्तिपूर्ण फटकारे मारणे तुलनेने सोपे असते. अर्थशास्त्राचा वा प्रशासनशास्त्राचा आधार घेऊन एका बाजूला सरकारला प्रश्न करणे व दुसऱ्या बाजूला जनतेची मनोभूमिका बनवणे हे कष्टाचे असते. दोन्हींमध्ये बराच फरक आहे. शिवसेनेचे संघटनेकडून राष्ट्रीय पक्षाकडे उन्नयन झालेले नाही असे राजकीय विश्लेषक म्हणतात. राऊतांच्या लेखणीबाबतही तसेच म्हणावे लागते. भाजप सेनेला धडपणे वागवत नाही हे खरे. बारामतीतील मोठ्या साहेबांच्या काळात राऊतांना दिल्लीत जो मान होता तो मोदींच्या दरबारात मिळत नाही, ते पाचहजारी सरदारही राहिले नाहीत हेही खरे आहे. मंत्रिपदाची मनसब मिळण्याचीही शक्यता नाही. पण त्या दुखण्याची कळ राऊतांच्या लेखणीने मुस्लिम समाजावर काढू नये. यातून मातोश्री व मोदी या दोघांनाही इशारा देण्याचा उद्देश असेल तर स्वपक्षाचाच त्यामध्ये घात होतो आहे. रोखठोक लेखणीनेही दुखणे बाजूला ठेवून प्रबोधनकारांचा वारसा उचलावा.
बातम्या आणखी आहेत...