आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi About Controversial Statements

अविवेकाचा आगडोंब (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखच्या वक्त्यावर योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. - Divya Marathi
शाहरुखच्या वक्त्यावर योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती.
कोणत्याही देशात, प्रदेशात सहिष्णुता नांदत असेल तर तिची अनुभूती अगदी स्वाभाविकपणे प्रत्येकास येते. त्यामुळे अशा देशांत ‘आमच्या येथे सहिष्णुतेचे वातावरण आहे' असा मतलबी प्रचार करण्याची पाळी तेथील राज्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांवर कधी येत नाही. मात्र, हे सुख पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजप पक्षाच्या वाट्याला आलेले नाही. याचे कारण भाजपमधील तोंडाळ नेत्यांची बेफाम वक्तव्ये! बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता शाहरुख खान याने आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत काही वक्तव्ये केली. ‘देशात कमालीचे असहिष्णुतेचे वातावरण आहे. लोक कोणताही विचार न करता कोणत्याही गोष्टींविषयी मते व्यक्त करत आहेत. भारत हा सेक्युलर देश आहे. त्याचे सेक्युलर रूप कायम न राहिल्यास, धार्मिक असहिष्णुता वाढल्यास देशातील युवावर्ग अशा गोष्टींच्या पाठी उभा राहणार नाही,' असे वक्तव्य शाहरुखने केले. त्याने ही प्रतिक्रिया देताच त्याच्या विरोधात भाजपमधील काही नेत्यांकडून आगडोंब उसळवण्यात आला. सध्या देशात विचारस्वातंत्र्याचा संकोच होत असल्याच्या निषेधार्थ अनेक साहित्यिक, चित्रपट व्यावसायिक आपल्याला आधी मिळालेले सरकारी पुरस्कार परत करीत आहेत, त्या कृतीचेही शाहरुखने समर्थन केले. या मतांमुळे खवळलेल्या भाजपच्या नेत्यांनी शाहरुख खानवर टीका करताना त्याचा धर्म काढला, त्याच्या देशभक्तीवर शंका घेतल्या! मात्र, भाजपचे समर्थक असलेल्या अनुपम खेरसहित बॉलीवूडमधील अनेक लोकांनी शाहरुखचीच बाजू घेतली आहे. सोशल मीडिया असो वा सामान्य माणूस तो शाहरुखच्या टीकाकारांवर नाराज आहे. आपल्यावरील टीका पचवण्याइतकी सहनशक्ती दाखवता न येणे यालाच असहिष्णुता म्हणतात. ही व्याख्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या मनावर बिंबवण्याची आता वेळ आली. शाहरुख खान ज्या चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतो तेथील बहुतांश लोक हे बिनकण्याचे, सत्ताधाऱ्यांपुढे झुकणारे असतात. चित्रपटसृष्टीमध्ये सडेतोड सामाजिक, राजकीय भूमिका घेणारे लोक कमी आहेत. प्रख्यात अभिनेते दिलीपकुमार यांनी सेक्युलर भूमिकाच घेतली होती. त्यामुळे त्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या लोकांच्या डोळ्यात कायम दिलीपकुमार खुपत असत. दिलीपकुमार यांचे मूळ घराणे पेशावरचे. त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान' हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी किताब मिळाल्यानंतर दिलीपकुमारांनी पाकिस्तानात निघून जावे, अशी शेरेबाजी शिवसेनेपासून अनेकांनी केलेली होती! त्यामुळे दिलीपकुमारांचा लौकिक कमी न होता त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा बदलौकिक जास्त झाला. योगायोग असा की शाहरुख खानचे मूळ घराणेही पेशावरचेच आहे, त्याच्या कुटुंबाने स्वातंत्र्य चळवळीला योगदान दिले होते व तोही सेक्युलर विचारांचाच आहे.

‘देशामध्ये सेक्युलॅरिझमच्या बाजूने बोलणारे कलावंत, लेखक हे राष्ट्रद्रोही, दहशतवादी विचार मांडत अाहेत आणि त्यांना पाठिंबा देणारा शाहरुख खान व मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्या भाषेत काहीच फरक नाही' असे अकलेचे तारे तोडणारे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करावयास हवी होती. त्याचबरोबर कैलाश विजयवर्गीय, साध्वी प्राची अशा सर्वांच्या जिव्हांना भाजप नेतृत्वाने कठोर कारवाई करून लगाम घालणे आवश्यक होते. मात्र, बेताल वक्तव्ये करू नका, असा व्हीप भाजपच्या नेतृत्वाने जारी करूनसुद्धा त्यांच्या पक्षातील नेतेमंडळी त्याला जुमानत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा की, भाजप अध्यक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांवरची पकड ढिली झाली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपची सत्ता केंद्रात आल्यामुळेच विरोधकांनी असहिष्णुता वाढल्याच्या टीकेचा भडिमार लावला आहे, असे भाजप समर्थकांना वाटते. हाच धागा जरा मागे न्यायचा झाला तर वाजपेयी पंतप्रधान असताना देशात असहिष्णुता वाढली असा प्रचार फारसा कधीही झाला नव्हता. कारण त्या वेळी वाजपेयी यांची उदारमतवादी प्रतिमा त्या सरकारला तारून नेत होती. मोदींच्या कारकीर्दीत तसे होताना का दिसत नाही याचे आत्मपरीक्षण भाजपने करायला हवे. शाहरुखच्या धर्माचा उद्धार करणे, त्याला पाकिस्तानात जायला सांगणे अशी अविवेकी वक्तव्ये करून भाजपची मंडळी पाकमधील विघातक प्रवृत्तींच्या हातीही कोलित देत आहेत. शाहरुख हा भारतीय नागरिक असून त्याला त्याचे विचार मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. ते अबाधितच राहायला हवे. शाहरुखच्या मताशी काही बाबतीत सहमत असलेले ‘जाने भी दो यारों' चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन शहा यांना मात्र भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखेच भोंगळ आहेत असे वाटते. त्यांच्या "पोलिस स्टेशन' या मालिकेवर काँग्रेस सरकारनेच बंदी आणली होती. आम्ही ‘काँग्रेसपेक्षा वेगळे' असा दावा करणाऱ्या भाजपनेही तसेच वर्तन करावे हे जनतेला न रुचणारे आहे. त्यातून भाजपच्या कथित चाणक्यांनी योग्य काय तो बोध घ्यावा.