आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेम मुंबईवर; सरकार पणाला (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलबिहारी वाजपेयी-अडवाणी यांची बरोबरी करणारा राष्ट्रीय पातळीवरचा राजकीय दबदबा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होता. समाजावर प्रभाव टाकणारा करिश्मा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि वक्तृत्वात होता. बाळासाहेबांची काही अंशी सर असणारा कोणी सध्याच्या शिवसेनेत नाही. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला मागे टाकले. साहजिकच बाळासाहेबांच्या काळातले शिवसेनेचे वर्चस्व सोसण्याचे कारण भाजपला उरलेले नाही. आकड्यांचा खेळ लोकशाहीत अटळ असल्याने भाजप-शिवसेना यांच्या राजकीय नात्यातला ‘थोरले’पणा गेली दोन वर्षे निर्विवादपणे भाजप मिरवताना दिसतो. हा राजकीय व्यवहार पटणारा असला तरी शिवसेनेला तो अद्याप पचवून घेता आलेला नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली झालेली शिवसेना-भाजपची अडीच दशकांपेक्षा जुनी युती विधानसभा निवडणुकीवेळीच रीतसर संपुष्टात आली. त्यानंतर दिमाखात सत्तेबाहेर राहून स्वतंत्र बाणा जपण्याचा मार्ग शिवसेनेपुढे होताच. शिवसेना पक्षप्रमुखांना मर्द, स्वाभिमान, मराठी माणसाचा सन्मान असे शब्द भलतेच प्रिय आहेत. खासकरून भाजपसंदर्भात बोलताना तर या शब्दांच्या फोडणीशिवाय त्यांचे भाषण आटोपत नाही. तरीदेखील केंद्र आणि राज्याच्या सत्तेतली मिळतील ती मंत्रिपदे स्वीकारण्यात शिवसेनेने धन्यता मानली. एका बाजूने सत्ता भोगायची आणि दुसरीकडे शक्य तेव्हा सरकारला धारेवर धरायचे, ही दुहेरी कसरत करत शिवसेनेने दोन वर्षे ढकलली. शिवसेनेचा जीव की प्राण असलेल्या मुंबई-ठाणे महापालिकेची निवडणूक मात्र ज्या वेगाने जवळ येते आहे त्या वेगाने शिवसेनेची आक्रमकता वाढली आहे.

महापालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदांच्या अागामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाचा पसारा वाढवण्याची संधी दोन्ही सत्ताधाऱ्यांपुढे आहे. केंद्रात-राज्यात सत्ता असूनही पक्ष वाढवायचा नाही तर केव्हा? त्यामुळेच शिवसेनेने सध्या ‘आक्रमण हाच उत्तम बचाव’ हे सूत्र स्वीकारल्याचे दिसते. भाजपसोबत जायची वेळ आली तर काय आणि स्वतंत्र लढायचे झाल्यास काय, अशा दोन्ही उमेदवार याद्या तयार ठेवण्याच्या सूचना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेत भाजपने शिवसेनेला अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले होते. तीच खेळी या वेळी शिवसेना खेळत आहे. सत्ताधाऱ्यांच्या सुदैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रबळ विरोधकांमध्ये राज्य पातळीवर आघाडी होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे. लोकसभा-विधानसभेतील दारुण पराभवानंतर यापेक्षा वाईट होण्यासारखे काही नसेल तर मग आघाडीची तडजोड स्वीकारण्यापेक्षा आपापला पक्ष वाढवू, असा मतप्रवाह दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. निवडणुकीनंतर सत्ताग्रहण करण्याची वेळ आलीच तर युती किंवा आघाडी करण्याचे दरवाजे सताड उघडे असतातच. म्हणूनच राज्यातल्या चारही प्रमुख पक्षांचे प्राधान्य पक्षविस्तारास असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाणे जिंकण्यासाठी शिवसेनेने किंवा पुणे-नागपूर जिंकण्यासाठी भाजपने स्वबळाच्या बेंडकुळ्या दाखवल्या तर ते योग्यच आहे. तीन वर्षांनी येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम या निमित्ताने होईल.

शिवसेनेने मुंबई जिंकल्यास राज्य सरकारला अधिक अडचणीत अाणण्याची पावले उचलली जातील अाणि सत्तेत अधिक वाटा मागितला जाईल; हाच धोका भाजपपुढे आहे. त्या परिस्थितीमध्ये फडणवीस सरकारला बरीच कसरत करावी लागेल. म्हणूनच शिवसेनेकडून आक्रमक विधाने होत असतानाही भाजप नरमाईच्या भूमिकेत आहे. सन्मानाने युती करण्याची, युतीचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर सोडल्याची सावध भाषा भाजप नेत्यांच्या तोंडी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निवडणुकांवरचा प्रभाव काय राहील हे त्यांनाही या क्षणी सांगता येणार नाही. तरीही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक पट्ट्यात राज यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कोणी करणार नाही. बंडखाेर मनसेमार्फत सर्वांनाच त्रास देऊ शकतात. मुंबईतले वर्चस्व सिद्ध करून राज्याच्या सत्तेत कुरघोडी करण्यासाठी शिवसेना जीवतोड प्रयत्न करणार आहे. त्याला सुरुंग लावताना भाजपला जपून पावले टाकावी लागतील. शिवसेनेचा नेम मुंबईवर असला तरी धोका राज्याच्या सत्तेला आहे. भाजपची ही गोची शिवसेनेला चांगलीच उमजली आहे. मुंबई कोणाची हा संघर्ष प्रतिष्ठेपुरता मर्यादित नाही; युतीचे ‘वय’ आणि दोघांमधले ‘थोरले’पण यातून निश्चित हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...