आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वागतार्ह ‘स्वयम्’ (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून शिक्षणाचा प्रवाह अधिकाधिक मुक्त करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्रीय स्तरावरून हाती घेण्यात येत असून कालसुसंगत असाच हा निर्णय असल्याने त्याचे स्वागत करायला हवे. या योजनेचे एकंदर स्वरूप पाहता ते मुक्त विद्यापीठांच्या पुढचे पाऊल ठरावे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पातळीवरून मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (मूक) अंतर्गत ‘स्वयम्’ नामक नवी ऑनलाइन यंत्रणा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतच क्रांतिकारी बदल घडवण्याची क्षमता ‘स्वयम्’मध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकल्पाची आखणी आणि व्यापकता पाहता खरोखरच त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तर एक नवी शैक्षणिक व्यवस्थाच त्यातून आकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे स्वयम् हे व्यासपीठ आकार घेत असून त्याअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या मूक या योजनेत दोन हजार ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशभरातील तब्बल तीन कोटी विद्यार्थ्यांना या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. एकाच वेळी दहा लाख विद्यार्थ्यांना कुठूनही आणि कधीही या प्रणालीचा लाभ घेता येईल. शिवाय, या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचा ‘ई-कंटेंट’ सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना मोफत पुरवण्याचाही मानस आहे. एवढेच नव्हे तर परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) स्वरूपाचे सुमारे अडीच लाख तासांचे भांडार असणारा इलेक्ट्रॉनिक जगतातील हा शिक्षणाचा सर्वात मोठा स्रोत असेल, असेही सांगण्यात येत आहे. देशातील कुठल्याही विद्यार्थ्याला स्वयम््च्या माध्यमातून चांगल्यात चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मार्गसुद्धा मोकळा होणार आहे.

अशा अनेकविध खुबी दर्शवणाऱ्या या योजनेचा प्रारंभ येत्या १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या भव्यदिव्य योजनेचा शुभारंभसुद्धा तेवढाच दिमाखदार होईल यात शंका नाही. विशेषत: इव्हेंट मॅनेजमेंटच्या तंत्रात अत्यंत वाकबगार असलेल्या ‘टीम मोदी’चा कटाक्ष त्याचा पुरेपूर गाजावाजा होईल याकडे असेल. स्वत: पंतप्रधान मोदीसुद्धा आपल्या खास शैलीत त्याचा सर्वत्र उदो उदो केल्याशिवाय राहाणार नाहीत. अर्थात, त्यात काही गैर आहे असे नाही. कारण लोकहिताच्या अशा योजनांचा प्रचार-प्रसार जोरकसपणे व्हायलाही हवा. त्यानुसार येथवरचा प्रवास अगदी जोशात होईल. पण त्यानंतर खरा कळीचा मुद्दा असेल तो दर्जा आणि स्वयम््च्या प्रभावी अंमलबजावणीचा. त्यातही दर्जावर विशेष कटाक्ष राखावा लागेल. आपल्याकडे सिम्बायोसिससारख्या खासगी संस्थांनी दूरस्थ शिक्षणात बराच मोठा पल्ला गाठला आहे तो त्यांच्या दर्जामुळे. अनेकदा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात होते तेव्हा हा अभ्यासक्रम संबंधिताने कोठून केला आहे त्यावर बरेच काही अवलंबून असते. आपल्याकडे काही सन्मान्य अपवाद वगळता मुक्त विद्यापीठांच्या पदव्यांना फारशी प्रतिष्ठा नाही हे कटू वास्तव आहे. त्यामुळे अनेकदा केवळ अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे समाधान लाभते; पण त्याचा प्रत्यक्षात व्यावसायिक उपयोग फारसा होत नाही. हे टाळायचे असेल तर स्वयम््ला सर्वप्रथम अभ्यासक्रमांचा दर्जा अत्यंत उच्च ठेवावा लागेल. विशेषत: युरोप, अमेरिकेतील विदेशी शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रात जी मोठी मजल मारली आहे, त्यामागे दर्जा हेच प्रमुख कारण आहे. अशा दर्जेदार ज्ञानातून प्रतिष्ठा प्राप्त होत असते. आपल्याकडे नव्या पिढीतील अनेक जण डॉलर्समध्ये भरभक्कम शुल्क अदा करून विदेशी ऑनलाइन अभ्यासक्रमांकडे धावताना दिसतात त्यामागे प्रामुख्याने हेच कारण आहे. हा सगळा विचार करून त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रमांचा दर्जा राखला गेला तरच स्वयम््चा उद्देश फलद्रूप होऊ शकेल. दर्जासोबतच आणखी एक प्रश्न आहे तो स्वयम््च्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा. ऑनलाइनचा मार्ग अनुसरताना त्याची तांत्रिक बाजू अत्यंत सक्षम असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे वापरकर्त्यांना प्रत्यक्ष वापराच्या वेळी लागणारा ‘सपोर्ट’ही तेवढाच महत्त्वाचा असतो. अर्थात, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य आहे. फक्त त्यासाठी वेळोवेळी ‘अपडेट’ राहण्याची मानसिकता ठेवावी लागेल. अन्यथा तांत्रिक त्रुटींमुळे एवढ्या चांगल्या प्रकल्पात अडथळे उत्पन्न व्हायचे. कारण एखादी महत्त्वाकांक्षी योजना अथवा प्रकल्प आखतानाचा उद्देश आणि ती प्रत्यक्ष राबवताना उत्पन्न होणाऱ्या अडचणी असे अनुभव आपल्याकडे ठायी ठायी येतात. स्वयम््ची तशी गत होऊ नये असे वाटत असेल तर अगोदर तांत्रिक बाजू सक्षमतेने निर्माण कराव्या लागतील. तसे झाले आणि या अभ्यासक्रमांना उच्च दर्जाची जोड मिळाली तर तो पूर्ण करणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होऊ शकतील.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...