आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादाचा विळखा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशची राजधानी ढाका येथील आर्टिझन बेकरी या स्पॅनिश हॉटेलवर शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला चढवून तरुषी जैन या भारतीय युवतीसह वीस विदेशी नागरिकांना गोळ्या घालून ठार केले. हे हत्याकांड घडविण्यामागे आपणच सूत्रधार असल्याचा दावा इसिस या दहशतवादी संघटनेने केला असला तरी बांगलादेश सरकारला मात्र त्या गोष्टीवर फारसा विश्वास नाही. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथी संघटनेने हातपाय पसरलेले आहेत. तिच्या हस्तकांमार्फत त्या देशामध्ये दहशतवादी कारवाया केल्या जातात, असा पूर्वानुभव आहे. त्याआधारेच शुक्रवारी झालेल्या हल्ल्यामागे जमात-ए-इस्लामी, जमातुल मुजाहिदिनी बांगलादेश या संघटना व पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा हात असल्याचा दावा बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी केला. बांगलादेशमध्ये अल कायदा व इसिस या संघटनांचे अस्तित्व बिलकूलच नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, असदुझ्झमान यांचे सर्वच वक्तव्य सत्याला धरून आहे असे समजण्याचे कारण नाही. पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान १९७१च्या युद्धानंतर विलग होऊन त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली आहे. एकाच धर्माची दोन्ही राष्ट्रे असूनही गतकाळातील राजकीय वैमनस्यामुळे बांगलादेश व पाकिस्तानात विस्तव जात नाही. त्यामुळे शुक्रवारच्या हल्ल्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानच्या आयएसआयवर ठपका ठेवणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आयएसआयने स्थानिक दहशतवादी गटांना हाताशी धरले. तोच प्रयोग आयएसआय बांगलादेशमध्येही करत असू शकते, पण बांगलादेशमध्ये जो हल्ला झाला त्याची कारणे केवळ आयएसआयच्या परिप्रेक्ष्यामध्ये शोधणे योग्य नाही. उलट बांगलादेशमधील या हल्ल्यामुळे दहशतवादी संघटनांचा भारतालाही असलेला धोका अजून कसा वाढला आहे, याची तीव्र जाणीवही झाली. अल कायदा या संघटनेचा दहशतवादी नेता ओसामा बिन लादेन याला या हल्ल्यानंतर काही वर्षांनी अमेरिकी सैनिकांनी पाकिस्तानात कारवाई करून ठार मारले.

भारताच्या सहकार्याने जागतिक पटलावर उदयाला आलेल्या बांगलादेशमध्ये सुरुवातीची काही वर्षे सोडली, तर राजकारण व शासनावर इस्लामी कट्टरपंथीयांचा पगडा राहिलेला आहे. याच गोष्टींमुळे बांगलादेशमध्ये मुस्लिम दहशतवादी संघटनांना हातपाय पसरायला सुपीक जमीन मिळाली. भारताच्या शेजारी राष्ट्रांपैकी पाकिस्तान हे जागतिक दहशतवादाचे नंदनवन आहे. बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, चीनचा काही भाग येथे इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच असतात. भारतामध्येही २००८ मध्ये मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आपल्या देशात अल कायदा, त्यानंतर इसिस संघटनेने आपले जाळे पद्धतशीरपणे विणल्याचे काही प्रसंगांतून दिसून आले. त्यामुळे बांगलादेशमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्याकडे पाहताना हा प्रश्न केवळ एका देशापुरता मर्यादित नसून आशियासह पाचही खंडांना दहशतवादाने विळखा घातल्याचे स्पष्ट होते. बांगलादेशमध्ये दहशतवाद्यांनी विदेशी नागरिकांना वेचून ठार केले. दहशतवाद्यांना जागतिक पातळीवर जे धर्म डोळ्यात सलत आहेत, त्या धर्मीयांनाही पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. व्यंगचित्र साप्ताहिक ‘चार्ली’च्या पॅरिस येथील कार्यालयावर ७ जानेवारी २०१५ रोजी इसिसच्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवून तेथील कर्मचाऱ्यांना ठार मारले होते. त्यानंतर ९ महिन्यांनी पुन्हा पॅरिसमध्येच इसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ले चढवून १३० लोकांना ठार केले होते. गेल्या जून महिन्याच्या अखेरीस इसिस संघटनेने तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरातल्या विमानतळावर घडवलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटांत ४४ हून अधिक जण ठार झाले. या हल्ल्यांची सूत्रे चेचेन्यामधून हलली होती. अफगाणिस्तान, काश्मीरमध्ये जसा आयएसआय अजूनही उत्पात घडवत असते, तसेच इसिसलाही सर्व जगातच दहशतवादाचे थैमान माजवायचे आहे. सिरिया व इराकमध्ये चाललेल्या कथित जिहादमध्ये सामील होण्यासाठी भारतापासून अनेक देशांतील माथी भडकवण्यात आलेले काही युवक तिथे रवाना झाले होते. महाराष्ट्रातही या गोष्टीचे लोण पोहोचलेले आहे. इसिस असो वा बोको हरम, आयएसआय किंवा त्यासारख्या धर्माच्या नावावर दहशतवाद माजवणाऱ्या अन्य संघटना, त्यांना निष्प्रभ करण्यासाठी जागतिक पातळीवर दोन मार्गांनी मुकाबला करावा लागत आहे. त्याचबरोबर या दहशतवादी संघटना धर्माचा वापर करून देशोदेशीच्या तरुणांची माथी भडकवतात, त्या अपप्रचाराला आळा घालणे हा दुसरा मार्ग आहे. तो यशस्वी व्हावा म्हणून देशोदेशीचे शासनकर्ते व समाजधुरीणांनी युवकांशी संवाद वाढवणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...