आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहौल बन चुका है.. (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मन बन चुका है, माहौल बन चुका है’, अशी खास उत्तर प्रदेशी ढंगाची घोषणा देत भाजपने तेथील आगामी विधानसभा निवडणुकीचे फासे टाकण्यास प्रारंभ केला असून यानिमित्ताने ‘रामलल्ला’चा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यात या पक्षाला यश आल्याचे म्हणावे लागेल. यश यासाठी की इतर सर्वच भाजप विरोधकांना या बाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी सध्या भाजप अयोध्येतील ज्या ‘रामायण म्युझियम’चा गवगवा करत आहे ती मूळ कल्पना काँग्रेसची असल्याचा दावा या पक्षातर्फे करण्यात आला आहे, तर सत्ताधारी समाजवादी पार्टीलाही अयोध्येतील प्रस्तावित ‘रामलीला थीम पार्क’ला चालना देण्यासाठीच्या कामाला अर्थसाह्याचा मुद्दा पुढे करणे भाग पडले आहे.

उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या तसेच राजकीयदृष्ट्या सजग आणि संवेदनशील राज्याची निवडणूक ही देशाच्या राजकारणावर संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या प्रभाव टाकणारी असते. कारण, तेथील संख्याबळावर प्रमुख राजकीय पक्षांची राज्यसभेतील गणसंख्येची गणिते बऱ्याच अंशी अवलंबून असतात. साहजिकच भाजप आणि काँग्रेससह सगळेच पक्ष आता निवडणुकीसाठी सरसावले आहेत. भाजपच्या दृष्टीने तर या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या पक्षाने पद्धतशीरपणे आखणी केल्याचे दिसते. त्यासाठी हिंदुत्व, राष्ट्रवाद, रामलल्ला असे भावनिक पत्ते बाहेर निघत आहेत. सर्जिकल स्ट्राइकनंतर राजकीय लाभ उठवण्यासाठी उत्तर प्रदेशात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लावलेल्या फलकांचा मुद्दा प्रथम चर्चेला आला. त्यावरून वादविवाद घडले असले तरी त्यातून या कारवाईबाबत भाजपच्या श्रेयाची रेषा अधिकच ठळक झाली यात दुमत नसावे. हा मुद्दा अजूनही तापवण्याच्या इराद्यानेच की काय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोनच दिवसांपूर्वी त्याबाबत ‘संघ शिकवणुकीमुळेच आम्ही सर्जिकल स्ट्राइक करू शकलो’ असे विधान करून नवा वाद ओढवून घेतला. हिंदुत्ववादी राष्ट्रवादाची मांडणी करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग असू शकतो. अर्थात, अशा महत्त्वाच्या कारवाईबाबत वारंवार वादग्रस्त विधाने करणे म्हणजे त्यातील गांभीर्य कमी करण्यासारखे आहे, हे किमानपक्षी संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांनी तरी लक्षात ठेवायला हवे. पण, राजकीय लाभाचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. पर्रीकरांचेही तसेच काहीसे झाले असावे. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील या कारवाईची तुलना इस्रायलच्या रणनीतीशी करून हा मुद्दा चर्चेत ठेवला हे लक्षात घेण्याजोगे आहे. दुसरीकडे नेमक्या याच सुमारास केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनीही अयोध्येतील प्रस्तावित ‘रामायण म्युझियम’च्या जागेची पाहणी करत त्यासाठी तब्बल १५१ कोटींच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आल्याचे जाहीर केले. वर रामाचे काम करायला मिळणे हे भाग्यच असल्याची पुस्ती जोडत शर्मा यांनी ‘मन बन चुका है, माहौल बन चुका है’ अशी सूचक टिप्पणीही केली. त्यामुळे त्यांचा दौरा एकदम चर्चेत आला. त्यातच अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद मतदारसंघाचे माजी खासदार व भाजपचे विद्यमान राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी राम मंदिर उभारणीचा ठराव लोकसभेत आणण्याची थेट मागणी करून रामलल्लाच्या मुद्द्याला चांगलीच हवा दिली. अशा सगळ्या माहौलमध्ये मग काँग्रेस आणि सत्ताधारी समाजवादी पार्टीची गोची व्हायला लागली. काँग्रेसने म्युझियमची कल्पना आपलीच असल्याचा दावा करून श्रेयाचा चतकोर तुकडा तरी आपल्या पदरात पडावा, अशी केविलवाणी धडपड सुरू केली. सपाने रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेपासून १५ किलोमीटर अंतरावरील प्रस्तावित रामलीला थीम पार्कसाठी वापरल्या जाणाऱ्या संगमरवराच्या कामासाठी आर्थिक तरतुदीची भूमिका घेतली. एरवी हिंदुत्व, धर्मकारण अशा बाबींपासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवणारे आणि संधी मिळेल तेथे भाजपवर यावरून वार करणाऱ्या सपा आणि काँग्रेसची ही एकप्रकारची जणू फरपटच सुरू आहे. कारण, यंदाची निवडणूक भाजपप्रमाणेच काँग्रेस, सपा आणि बसप या पक्षांसाठीदेखील अत्यंत कळीची आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी सपा अटापिटा करत आहे, तर काँग्रेससाठी ही अस्तित्वाचीच लढाई आहे. बसपची सारी भिस्त हक्काच्या मतपेढीवर असून प्राथमिक चाचण्यांमध्ये तरी मुख्यमंत्रिपदासाठी मायावतींचे नाव अग्रस्थानी असल्याने पक्षाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. सामाजिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंत असलेल्या या राज्यातील निवडणुकीत जात, धर्म, विविध समाजगट यांचा हिशेब अगदी बाराकाईने करण्याशिवाय तरणोपाय नसतो. सर्जिकल स्ट्राइक आणि अयोध्येच्या मुद्द्यांवरून भाजपने त्याची मांडणी करत ‘माहौल’ बनवण्यात पुढाकार घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...